agricultural success story in marathi, Partapur, tal. Mehkar, dist.Buldana | Agrowon

डोळस पीक पद्धतीने उघडले आर्थिक उन्नतीचे द्वार
गोपाल हागे
सोमवार, 5 मार्च 2018

मेहकर तालुक्यातील परतापूर (जि. बुलडाणा) येथील घनश्याम व हरिदास बेडवाल या दोन बंधूंनी नियोजनपूर्वक शेती सुधारणेची पावले उचलली. पारंपरिक पिकांना शेडनेट, बिजोत्पादन आणि दुग्ध व्यवसायाची जोड दिली. एकजुटीने शेती नफ्यात आणली. मुलामुलींची लग्ने, शिक्षण, लग्न, घरातील वयस्करांचे आजारपण या साऱ्या महत्त्वाच्या आणि तितक्याच आवश्यक घटनांमध्ये अजिबात कर्ज न काढता पार पडण्यासाठी त्यांचे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरले. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडता आल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यात दिसते.

मेहकर तालुक्यातील परतापूर (जि. बुलडाणा) येथील घनश्याम व हरिदास बेडवाल या दोन बंधूंनी नियोजनपूर्वक शेती सुधारणेची पावले उचलली. पारंपरिक पिकांना शेडनेट, बिजोत्पादन आणि दुग्ध व्यवसायाची जोड दिली. एकजुटीने शेती नफ्यात आणली. मुलामुलींची लग्ने, शिक्षण, लग्न, घरातील वयस्करांचे आजारपण या साऱ्या महत्त्वाच्या आणि तितक्याच आवश्यक घटनांमध्ये अजिबात कर्ज न काढता पार पडण्यासाठी त्यांचे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरले. आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडता आल्याचे समाधान त्यांच्या बोलण्यात दिसते.

परतापूर येथील घनश्याम व हरिदास बेडवाल या भावांकडे एकत्रित नऊ एकर शेती अाहे. कुटुंबे विभक्त असली तरी शेती मात्र एकत्र केली जाते. पिकांचे लागवडीपासून काढणीपर्यंतचे सर्व नियोजन दोन्ही भाऊ चर्चेने करतात. विदर्भ म्हटले की कोरडवाहू शेती, आणि तीच ती पारंपरिक पिके असा लोकांचा समज होतो. त्यामुळे आतबट्ट्याची ठरत असलेली शेती, हेच सार्वत्रिक चित्र. मात्र, आता येथील शेतकरीही काळानुरुप बदलू लागला आहे. त्यात या भावांचाही समावेश होतो.

आपण घरच्याच शेतात मजुरी करतोय का?
वडिलांचे निधन लवकर झाल्याने वयाच्या १२ व्या वर्षापासून घनश्याम हे शेतीत उतरले. सुरवातीला बेडवाल कुटुंबाकडील नऊ एकर शेतीमध्ये अन्य शेतकऱ्यांप्रमाणेच सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पारंपरिक पिके घेतली जात. यातून खर्च वजा जाता कसेबसे लाख सव्वा लाख रुपये शिल्लक राहत. कधी कधी एवढेही पैसे मिळत नसत. थोडक्यात स्वतःच्या शेतात मजुरी केल्याप्रमाणे ही मिळकत असल्याचे घनश्याम यांच्या लक्षात आले. कुटुंबाचा उदरनिर्वाह उत्तमपणे करायचा असेल, तर पीकबदलाशिवाय पर्याय नसल्याचे समजून आले. शेतीच्या बाबतीत प्रगत मानल्या जाणाऱ्या भागातील शेतकरी नेमके काय करतात, यासाठी २००४ मध्ये विविध शेतकऱ्यांना भेटी दिल्या. त्यातून घनश्याम बेडवाल यांनी द्राक्ष लागवड केली. या बागेतून २०१२ पर्यंत सातत्याने उत्तम नफा मिळाला. मात्र, पुढे सिंचनासाठी पाण्याची अडचण झाल्याने द्राक्षबाग धोक्यात आली. इच्छा नसतानाही २०१२ मध्ये बाग काढावी लागली. द्राक्षासाठी उभारलेल्या तारांच्या अाधारावर वेलवर्गीय पीक घेणे सुरू केले.

बिजोत्पादनाला सुरवात ः
सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता, बदलते वातावरण, पिकावरील कीड-रोग, उत्पादन खर्चात झालेली वाढ याचा सारासार विचार करून बेडवाल कुटुंबाने बिजोत्पादनात पाऊल टाकले. २०११ मध्ये दहा गुंठ्यात इनसेक्टिनेट उभारली. बिजोत्पादन करताना वेगवेगळ्या प्रकारची कामे करण्यासाठी कुशल मजुरांची गरज असते. ही सर्व कामे कुटुंबीयांनी शिकून घेतली. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक कामासाठी मजुरांवर अवलंबून राहण्याची वेळ त्यांच्यावर येत नाही.

दुग्ध व्यवसायाची मुहूर्तमेढ ः
शेतीला पूरक म्हणून दुग्ध व्यवसाय सुरू केला. आज बेडवाल यांच्याकडे तीन म्हशी व एक गाय आहे. दररोज २० लिटर दूध मेहकर शहरात रतीबाने विकले जाते. सकाळ-संध्याकाळ दोघे भाऊ आळीपाळीने दूध वाटतात. प्रति दिन ८०० रुपये मिळतात. खर्च वजा जाता ५०० रुपये निव्वळ नफा राहतो.

शेतीचे नियोजन दृष्टिक्षेपात...
१) २०११ मध्ये दहा गुंठ्यांत बेडवाल कुटुंबाने एका इनसेक्टिनेटसह बिजोत्पादनाला सुरवात केली होती. त्यातून चांगला पैसा मिळाला. बिजोत्पादन कंपन्यांचेही पाठबळ मिळाले. त्या जोरावर दुसरी, तिसरी असे करत चार इनसेक्टिनेट उभ्या अाहेत. या एक एकरमध्ये काकडी, मिरची, टोमॅटो या भाजीपालावर्गीय पिकांचे बिजोत्पादन घेतले जाते.

 • सध्या शेतामध्ये एक एकर शेडनेटमध्ये टोमॅटो (६००० रोपे), सिमला मिरची (३००० रोपे) बिजोत्पादन.
 • दीड एकर अन्य शेतीमध्ये खरबूज (२५ गुंठे) लागवड असून, कारले(३० गुंठे)चे नियोजन सुरू आहे.

२) उर्वरित आठ एकरामध्ये खरिपात सोयाबीन, मूग, उडीद, कापूस, ज्वारी, तर रब्बीत गहू, हरभरा आदी पिके घेतली जातात.

तुलना ः शेडनेटमधील बिजोत्पादनाच्या पिकातील एक एकराचे उत्पन्न खर्च वजा जाता सहा लाख रुपये प्रति वर्ष इतके राहते. तर आठ एकरातील पिकांचे उत्पन्न खर्च वजा जाता दोन ते अडीच लाखापर्यंत राहत असल्याचे हरिदास बेडवाल सांगतात. थोडक्यात बिजोत्पादनाचा निर्णय फायद्याचा ठरला.

३) उत्तम दर मिळणाऱ्या काळात उत्पादन निघण्यासाठीचे नियोजन ः
अ) टोमॅटोला २५ एप्रिलनंतर प्रति कॅरेट ३०० रु. पेक्षा अधिक दर मिळत असल्याचा अनुभव. या काळात उत्पादन मिळण्यासाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लागवड.
ब) काकडी १५ जूननंतर किंवा ऑगस्ट अखेर बाजारात आवक कमी होते. त्या काळात प्रति क्विंटल १५०० ते २००० रु. असा दर मिळत असल्याचा अनुभव. या काळात उत्पादन मिळण्यासाठी ५ ते १५ मे या काळात पहिली आणि १ ते ५ जुलै या काळात दुसरी लागवड करतात.
क) खरबूज संपत आल्यानंतर १५ दिवस आधीच (साधारणतः १२ फेब्रुवारीपर्यंत) कारल्याची लागवड करतात. त्यामुळे उत्पादनाला १० ते १२ मे पासून सुरवात होते. या काळात प्रति किलो ४० ते ६० रुपये असा दर मिळतो.

४) खरबुजाची विक्री २२ कि.मी. अंतरावरील लोणार येथे स्वतः दोन ते तीन ठिकाणी स्टॉल लावून करतात. गत वर्षी ३० रुपये प्रति किलो असा दर मिळाला होता. या वर्षीचे उत्पादन चालू होत आहे.

५) खर्चातील बचतीसाठी...

 • आधीच्या पिकातूनच पुढील पिकांच्या खर्चाचे नियोजन केले जाते.
 • रासायनिक खतांचा वापर कमी करत केवळ ३० टक्क्यांपर्यंत आणला आहे. तो शून्यापर्यंत आणण्याचे नियोजन केले. त्यासाठी शेणखताचा भरपूर वापर, बोरू, धैंचा अशा हिरवळीच्या खत पिकांची लागवड करतात.
 • भाजीपाला शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतींचा अवलंब ८० टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.

डोळस शेतीनेच दिले सर्व काही

 • नुसतेच काबाडकष्ट करण्याऐवजी विचाराने शेती करण्याकडे कल.
 • सतत वेगवेगळे प्रयोग करण्याची धडपड. पारंपरिक पिकांऐवजी नवीन पिकांचे प्रयोग शेतात करतात. त्यासाठी आवश्यकता भासल्यास कृषी विद्यापिठातील तज्ज्ञ, कृषी विभागातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन बेडवळ घेतात.
 • अडचणी, नैसर्गिक आपत्ती तर येणारच, त्यावर मात करत पुढे जाण्याची जिद्द. सकारात्मक विचारांनी ताकद मिळत असल्याचे बेडवाळ यांचे मत.
 • संभाव्य घटनांसाठी पैसा बाजूला टाकण्याची संपूर्ण कुटुंबालाच सवय आहे. त्यामुळे कोणत्याही कठीण प्रसंगी कोणाकडेही हात पसरण्याची वेळ येत नाही.
 • यामुळेच घनश्याम यांचा मुलगा शिवप्रसाद याचे बीफार्मचे शिक्षण पूर्ण करता आले. तर दीपक हा पदीवनंतर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहे. हरिदास यांची मुले (विवेक व आशिष अनुक्रमे सहावी व चौथीत) अद्याप लहान असली तरी त्यांच्या भविष्यातील शिक्षणाची तजवीज केली जात आहे. 
 • आईच्या आजारपणामध्ये सुमारे पाच ते सहा लाखांचा खर्च करणे शक्य झाले.
 • दोन्ही मुलींची लग्ने प्रतिष्ठेला साजेशी करता आली.

शेतीमध्ये श्रमाइतकीच प्रतिष्ठाही...

 • दोन्ही भाऊ व त्यांच्या कुटुंबांचा भल्या पहाटे दिवस सुरू होतो. पहाटे पाच वाजता गोठ्याची सफाई होते. ठरलेल्या पाळीप्रमाणे म्हशींचे दूध काढून एक भाऊ मेहकर येथे रतीबासाठी जातो. दुसरा भाऊ घरातील महिलांसह दैनंदिन कामे अाटोपून शेतीत पोचताे. सकाळी सात वाजता सर्वजण शेतात असतात. नऊ एकर क्षेत्रामधील कामांसाठी शक्यतो मजूर सांगितले जात नाहीत. अत्यंत तातडीच्या कामांसाठीच मजुरांची मदत घेतात. उत्पादन खर्चात बचत होते. कष्टाने शरीर झिजत नाही, तर व्यवस्थित कार्यरत राहत असल्याचे घनश्याम यांचे मत आहे.
 • २०११ मध्ये गावामध्ये उभारण्यात आलेल्या पहिल्या दोन शेडनेटमध्ये त्यांचा सहभाग होता. २०१५ पर्यंत प्रोत्साहन देऊन चार शेडनेट असलेल्या गावामध्ये आज एकूण ८० शेडनेट झाले आहेत. हजारांमध्ये खेळणाऱ्या गावात आता कोट्यवधींची उलाढाल होत आहे.
 • गावातील शेतीमध्ये सुधारणेसाठी करडा येथील कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या साह्याने स्वतः पुढाकार घेत शेतीमध्ये प्रशिक्षणे, शेतीशाळांचे आयोजन करतात. परिणामी आजूबाजूच्या गावातील अनेक शेतकरी जोडले गेले.

संपकर् ः घनश्याम बेडवाळ, ९९२२०३५४७३

 

 

फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
शेतीतूनच होते औद्योगिक विकासाची पायाभरणीची नमधील कम्युनिस्ट पक्षाच्या राज्यकर्त्यांनी...
कसा टळेल मानव-वन्यप्राणी संघर्ष? अलीकडे वन्यप्राण्यांकडून शेतपिकांचे होणारे नुकसान...
'मंडळात एकच छावणी'च्या निकषात बदल नगर  : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात...
पंधरा एकरांत उत्कृष्ठ हरभरा नंदुरबार जिल्ह्यातील ब्राह्मणपुरी (ता. शहादा)...
विविध प्रयोगांमधून वाढवले उत्पन्नाचे...यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा येथील महेश व दीपक या...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर ः परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
किमान विक्री मूल्यवाढीने साखर उद्योगात...कोल्हापूर : साखरेचे किमान विक्री मूल्य २९००...
जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।।जन्मोजन्मी दास । व्हावे हेचि माझी आस ।। पंढरीचा...
शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी...तासगाव, जि. सांगली ः छत्रपती शिवाजी महाराज, डॉ....
दीड हजार कोटींचा दुसरा हप्ता...मुंबई  ः गेल्या वर्षी खरीप हंगामात अपुऱ्या...
राज्यात गारठा पुन्हा वाढण्याची शक्यतापुणे : उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह येऊ...
पंतप्रधान मोदी आज करणार महिला बचत...यवतमाळ ः पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (ता...
पदव्युत्तर कृषी अभ्यासक्रमात पुढील...नागपूर ः कृषी अभ्यासक्रमात आजची परिस्थिती आणि...
दुष्काळात पीकविम्याचा आधारमुंबई ः यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
पाकच्या मुस्क्या आवळणार; विशेष राष्ट्र...नवी दिल्ली: पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ...
चीनमधील शेतीची विस्मयकारक प्रगतीविसाव्या शतकाच्या मध्यावर भारताला स्वातंत्र्य...
सेस, सेवाशुल्क आणि संभ्रमप्रक्रियायुक्त शेतमाल, फळे-भाजीपाला आणि शेवटी...
कृषी पथदर्शक राज्य साकारण्याची संधी :...पुणे : “शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती तंत्र...
डिजिटल परवान्यासाठी लढा देणार : राजू...पुणे : कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाकडून...
`महानंद'मधील गैरव्यवहाराची चौकशी सुरूमुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ अर्थात...