चला मिरचीच्या आगारात राजूरा बाजारात........

राजूरा बाजार समितीत मिरचीची झालेली आवक
राजूरा बाजार समितीत मिरचीची झालेली आवक

मिरचीचे आगार अशी ओळख अमरावती जिल्ह्यातील राजूरा बाजारने मिळविली आहे. खास हिरव्या मिरचीसाठी हा बाजार देशभरात नावारूपास आला आहे. सायंकाळी सातनंतर भरणाऱ्या या बाजारात रात्री उशिरापर्यंत व्यवहार चालतात. यावर्षीच्या हंगामात रोजची सरासरी आवक १००० ते १३०० क्‍विंटलपर्यंत झाली आहे. त्वरित चुकारे मिळत असल्याने या बाजाराला शेतकऱ्यांची चांगली पसंती मिळत आहे.

अमरावती जिल्ह्यात दर गुरुवारी भरणाऱ्या राजूरा बाजारात तसेच बुधवारच्या वरुड येथील आठवडी बाजारात १९८५- ८६ च्या कालावधीत हिरव्या मिरचीची काही प्रमाणात आवक व्हायची. शेतकरी थोड्या क्षेत्रावर लागवड करून ती बाजारात घेऊन यायचे. शेख अब्दुल रहीम, भरत ठवरे, श्री. पाटील असे व्यापारी त्या वेळी खरेदी करायचे. खरेदीदार उपलब्ध असल्याने टप्प्याटप्प्याने आवक वाढू लागली, असे बाजार समिती निरीक्षक भास्कर रडके सांगतात. शेतकऱ्यांना नगदी पैसा मिळू लागल्याने परिसरातील अन्य शेतकरीही मिरची लागवडीसाठी प्रोत्साहीत झाले. पुढे अनेक प्रयत्नांनंतर बाजार समितीने आपल्या मालकीच्या जागेवर बाजार भरविण्याचा निर्णय घेतला.

देशभर लौकीक

आज वरुड बाजार समितीअंतर्गत मिरची बाजाराचे व्यवस्थापन होते. गेल्या २५ वर्षांपासून हा बाजार भरत असल्याचे येथील मुन्ना चांडक यांनी सांगितले. हिरव्या मिरचीची स्वतंत्र बाजारपेठ असा लौकीक देशभरात झाल्याने दिल्ली, बांगला देश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, कोलकता भागातील खरेदीदार या ठिकाणी येतात.

खुल्या लिलावाची पद्धत

मुंबई, दिल्ली बाजारातील व्यापाऱ्यांशी राजूऱ्याचे व्यापारी संपर्क साधतात. त्यांच्याकडून दर जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी दर खुलतात. दरांवर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये मिरचीचा दर्जा हा मुख्य मुद्दा असतो असे चांडक सांगतात. दर ठरल्यानंतर शेतकऱ्यांना त्वरित रोखीने ‘पेमेंट’ होते.

मिरची- आवक ते वितरण व्यवस्था

  • शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची अडत आकारली जात नाही. ती खरेदीदाराकडून वसूल केली जाते.
  • शेतकऱ्याने माल आणल्यानंतर वाहनातून खाली करताना पाच रुपये प्रती क्‍विंटल याप्रमाणे हमाली आकारली जाते.
  • माल उतरविल्यानंतर मालाचे वजन करून त्यानंतर चुकारे
  • आवक झालेल्या सर्व मिरचीचे ढीग लावले जातात. पोत्यात भरलेली ही मिरची बाहेरील खरेदीदारांना दाखवून पुढील व्यवहार. त्यांच्याकडून खरेदी न झाल्यास अन्य राज्यांतील बाजारांमध्ये संपर्क साधत स्थानिक व्यापाऱ्यांकडून मालाचे वितरण
  • हिरवी मिरची नाशवंत असल्याने ट्रकमध्ये भरून पाठवण्याचेही योग्य नियोजन. खरेदी व मिरची ट्रकमध्ये भरणे ही कामे सोबतच होत राहतात.
  • राजूरा बाजार - उलाढाल व दृष्टिक्षेप

  • एकूण व्यापारी ३५
  • ऑगस्टच्या अखेरीस मिरचीची आवक होण्यास सुरवात
  • त्यानंतर मार्चपर्यंत उलाढाल होत राहते.
  • मार्च-एप्रिलनंतर खरिपाचे दिवस जवळ आल्याने शेतकरी शेतीकामांत व्यस्त होतात. परिणामी बाजारातील आवक मंदावते. त्यामुळे ऑगस्ट ते मार्च हाच मिरची बाजाराचा मुख्य हंगाम मानला जातो.
  • सायंकाळी सात नंतर सुरू होते आवक. प्रामुख्याने अमरावती जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतून.
  • यावर्षीच्या हंगामात रोजची सरासरी आवक १००० ते १३०० क्‍विंटलपर्यंत आवक. ती दोन हजार क्‍विंटलपर्यंतही जाते.
  • यंदाच्या १३ ऑक्‍टोबर रोजी आवक ८०० क्‍विंटलच्या घरात. विशेषतः सण, उत्सवाच्या काळात आवकेवर परिणाम होतो
  • चांगल्या प्रतिच्या मिरचीला यंदा २० ते २१ रुपये तर त्याहून कमी प्रतिच्या मिरचीला १५ ते २० रुपये प्रति किलो सध्या दर.
  • भुसार मालांप्रमाणेच शेकडा एक रुपया पाच पैसे सेस आकारणी. त्या उत्पन्नातून बाजार समितीकडून विविध सुविधा उपलब्ध
  • चार एकरांच्या परिसरात बाजार भरतो.
  • बाजार भरण्यापूर्वी परिसरात पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळे मिरचीमुळे होणारा ठसका कमी करता येतो. दररोज ही खबरदारी बाजार समिती प्रशासन घेते.
  • दिवसभर तोडणी करून सायंकाळी विक्री करण्याचा पर्याय उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा बाजाराला चांगला प्रतिसाद
  • बाजार समितीकडून या ठिकाणी ३० इलेक्‍ट्रॉनीक्स वजनकाट्यांची सुविधा. वजनातील अनागोंदी किंवा शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी त्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्‍ती
  • परिसराला तारेचे कुंपण. सोबतच २४ तांसाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक
  • परिसरात स्वच्छतेवर भर. विहिरीवरून पाण्याचा पुरवठा
  • मिळाली हक्‍काची बाजारपेठ दैनंदिन गरजांसाठी लागणाऱ्या पैशांची सोय मिरची पिकातून होते. त्यामुळे शेतकऱ्यांना नगदी पिकाचा पर्याय या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. वरुड, मोर्शी, आर्वी, काटोल, अचलपूर या तालुक्‍यांतील शेतकरी मिरचीकडे वळले आहेत. त्यामुळे या भागातील अर्थकारण बदलण्यास मदत झाली आहे.

    शेतकरी अनुभव वडाळा (ता. वरुड) येथील संजय विठ्ठलराव देशमुख यांची दीड एकरांवर मिरची आहे. गेल्या दोन वर्षांपासून या पिकात त्यांनी सातत्य ठेवले आहे. गेल्या वर्षी पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे उत्पादन खर्चाची भरपाई होऊ शकली नाही असेही अनुभव येतात. मात्र लागवड क्षेत्र कमी होण्याऐवजी ते वाढतेच आहे. यावर्षी दोन तोड्यांच्या माध्यमातून ५५ क्‍विंटल माल मिळाला. पहिल्या तोड्याला १४०० ते १५०० रुपये प्रति क्‍विंटल दर मिळाला. दुसऱ्या तोड्याला १८०० ते २००० रुपये दर मिळाला. तोडणीसाठी मजुरीवरच एकूण उत्पादनाच्या सुमारे २० टक्‍के खर्च होतो.

    संजय देशमुख - ९३७२७९३६६१ मुन्ना चांडक - ९९७०७२५३८१ भास्कर रडके - ८५५४९५४०८५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com