पूरक व्यवसायातून महिलांनी साधली आर्थिक प्रगती

माधवनगर येथे गटाने सुरु केलेले कापड दुकान आणि अगरबत्ती तयार करताना  सौ. मनीषा चौगुले
माधवनगर येथे गटाने सुरु केलेले कापड दुकान आणि अगरबत्ती तयार करताना सौ. मनीषा चौगुले

केवळ एकच उद्योग न करता वेगवेगळे उद्योग केले तर व्यवसायात अधिक वाढ होते. हे लक्षात घेऊन सांगली शहरातील प्रयोगशील महिलांनी कल्याणी महिला बचत गट स्थापन केला. गेली तेरा वर्षे या बचत गटाचा शेळी पालन ते प्रक्रिया, दुकान आणि शेतीपूरक व्यवसाय असा प्रवास सुरू आहे. विविध पूरक उद्योगांच्या उभारणीतून या महिलांनी आर्थिक स्थिती भक्कम केली आहे.

सांगली कर्नाळ रस्त्यावर काकानगर आहे. याच भागात  सौ. मनीषा चौगुले रहातात. महिलांनी एकत्र येऊन उद्योग करावा अशी पहिल्यापासून त्यांची इच्छा होती. त्यानुसार परिसरातील महिलांशी त्यांनी चर्चा सुरू केली. पण भागभांडवल कसे उभे करायचे ? असा प्रश्‍न सातत्याने येत होता. त्यांनी सुरवातीला भागभांडवलाचा विचार थोडासा बाजूला ठेवला. सर्वप्रथम महिलांना एकत्रकरून पूरक उद्योग करण्यासाठी प्रोत्साहित करणे त्यांना आवश्‍यक वाटले. प्रत्येक महिलेला वेळेप्रमाणे उद्योग आणि बचत गटाबाबत माहिती देण्यास त्यांनी सुरवात केली. त्यामुळे परिसरातील महिलांना बचत गटाचे फायदे समजले. एका विचारांती दहा समविचारी महिलांनी बचत गट तयार केला. २००५ मध्ये महिला बचत गटाला कल्याणी हे नाव दिले आणि सुरवात झाली बचत गटाच्या वाटचालीची. सांगली कुपवाड मिरज महानगरपालिका क्षेत्रात हा भाग येत असल्याने महिलांनी महानगरपालिकेतील दिनदयाळ अंतोदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालयातील सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिरीष काळे, व्यवस्थापक सौ. ज्योती सरवदे, समूह संघटक सौ. वंदना सव्वाखंडे यांची भेट घेतली. गटातील महिलांना पूरक उद्योग सुरू करण्यासाठी काय करावे लागेल, याची माहिती घेतली. चर्चेतून कोण कोणते उद्योग करता येईल याचा सल्ला त्यांना तज्ज्ञांच्याकडून मिळाला. जमा झाले भागभांडवल : सन २००५ मध्ये कल्याणी बचत गटाची नोंदणी करण्यात आली. या गटामध्ये  सौ. मनीषा चौगुले अध्यक्षा तर नंदा सरगर सचिव आहेत. सौ. जयश्री कोरे, सौ. मंगल सरगर, सौ. वनिता सूर्यवंशी, श्रीमती सुजाता सूर्यवंशी, सौ. माया जाधव, सौ. सुवर्णा कोरे, श्रीमती शैनाज बागवान, सौ. शहिदा सनदी सहभागी आहेत. या गटातील महिलांनी आपल्या आवडीच्या उद्योगांची निवड करून बचत गटाच्या उपक्रमाला सुरवात केली. सुरवातीला उद्योगासाठी भांडवल उभे करणे आवश्यक होते. त्यासाठी प्रति महिला प्रति महिला ५० रुपये त्यानंतर प्रति महिला १०० रुपये याप्रमाणे तीन वर्षांत ६४ हजार रुपये भागभांडवल जमा झाले. हे भांडवल उद्योग उभारणीसाठी उपयुक्त ठरले. सन २०१६ पासून प्रति महिला २०० रुपये प्रमाणे २४ हजार रुपये बचत गटातील उद्योगाला भागभांडवल गोळा केले आहे. बचत गटाचा प्रवास : सन २००८ मध्ये गटातील महिलांनी समूह पध्दतीने शेळीपालन व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गटाने देना बॅंकेतून दोन लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. प्रत्येक महिलेच्या वाट्याला तीन शेळी आल्या. महिलांनी घराजवळच शेळी पालन व्यवसाय सुरू केला. शेळी, बोकडांच्या विक्रीसाठी मिरज येथील जनावरांच्या बाजाराचा आधार घेतला. शेळी विक्रीतून पैसेही चांगले मिळाले. प्रत्येक महिलेला तीन वर्षांत ९० हजार रुपये मिळाले. त्यातून आत्मविश्‍वास वाढला. मिळालेली रक्कम बचत गटासाठी ठेवली. याच दरम्यान समूह पद्धतीने उद्योग न करता विविध उद्योग करण्याची कल्पना डोक्‍यात आली. प्रत्येक महिलांच्या आवडीनुसार व्यवसायाची उभारणी केली तर नक्कीच फायदा होईल, असे लक्षात आले. त्यानुसार बचत गटाची बैठक झाली. या बैठकीला दिनदयाळ अंतोदय राष्ट्रीय उपजीविका योजनेच्या अधिकाऱ्यांना बोलवण्यात आले. त्यांच्यासमोर गटातील महिलांनी संकल्पना मांडली. महिलांना कोणते व्यवसाय करणे सोपे जाईल याबाबत चर्चा झाली. बचत गट ठरला फायद्याचा : बचत गटाच्या प्रगतीबाबत सचिव नंदा सरगर म्हणाल्या की, बचत गटातील महिलांनी वेगवेगळे उद्योग सुरू केले आहेत. त्यामुळे आर्थिक प्रगती होत आहे. महिला प्रामाणिकपणे काम करत आहेत. याचा फायदा गटाला होतो. प्रत्येक विभागातील मिळणारी रक्कम पहिल्यांदा कर्जाच्या हप्त्याची रक्कम म्हणून दिली जाते. त्यानंतर उर्वरित रक्कम प्रत्येकाला समान दिली जाते. बचत गटामुळे आर्थिक स्थिरता आली. नवनवीन पूरक व्यवसायाला चालना मिळाली आहे.

असे आहेत व्यवसाय : अगरबत्ती निर्मिती व्यवसाय : अगरबत्ती निर्मितीबाबत सौ. मनीषा चौगुले म्हणाल्या की, अगरबत्ती करण्याचे यंत्र मी मैत्रिणीकडे पाहिले होते. ते पाहिल्यानंतर मी अगरबत्ती निर्मिती व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यानुसार मी प्रशिक्षण घेतले. या उद्योगासाठी लागणारे यंत्र एक लाख २५ हजार रुपयांना विकत घेतले. मोगरा, गुलाब, चाफा, रातराणी या सुवासाच्या अगरबत्या मी तयार करते. या उद्योगामध्ये शहिदा सनदी, शैजान बागवान यांची मदत मिळते. प्रति तासाला ५ ते ७ किलो अगरबत्ती तयार होते. आजमितीस प्रतिदिनी १५० ते २०० किलोची मागणी असते. त्यानुसार त्याचे उत्पादन केले जाते. साधी अगरबत्तीची विक्री ७० रुपये प्रति किलो या दराने केली जाते. तर सुगंधी अगरबत्ती प्रति किलो २८० रुपये या दराने विक्री होते. आम्ही तिघीही परिसरातील दुकानामध्ये अगरबत्ती विक्री करतो. दर महिन्याला अगरबत्ती उद्योगातून वीस हजारांची उलाढाल होते. साडी विक्री, किराणामालच्या दुकानाची सुरवात : सौ. नंदा सरगर, श्रीमती सुजाता सूर्यवंशी, सौ. वनिता सूर्यवंशी या तिघींनी साडी विक्री दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला घरीच हे दुकान थाटले. पण कमी अधिक विक्री होत असल्याने माधवनगर येथे दुकान सुरू करण्याचे ठरले. यासाठी बॅंकेतून ५ लाखांचे खर्च घेतले. भाडेतत्त्वावर गाळा घेऊन कपड्याचे दुकान माधवनगर सुरू झाले. दुकानासाठी कोल्हापूर येथून साड्यांची खरेदी केली जाते. दररोज सुमारे १ हजार ५०० ते २००० रुपये अशी उलाढाल होते. यातून सर्व खर्च वजा जाता महिन्याला चार ते पाच हजार रुपये निव्वळ नफा राहतो. सौ. माया जाधव, सुवर्णा कोरे यांनी किराणामालाचे दुकान सुरू केले आहे. दुग्ध व्यवसायास प्रारंभ : गटातील सदस्या सौ. जयश्री कोरे, सौ. मंगल सरगर यांना शेतीची आवड आहे. त्यांची शेतीदेखील आहे. त्यामुळे त्यांनी म्हैसपालन व्यवसाय करण्याचे निवडले. बचत गटाच्या माध्यमातून दोघींनी चार म्हशी घेतल्या. सध्या तीन दुधामध्ये आहेत. तीन म्हशींचे दोन वेळचे ३६ लिटर दूध मिळते. ग्राहक दूध खरेदीसाठी घरीच  येतात. त्यामुळे विक्रीची अडचण नाही. प्रति लिटर ५० रुपये या दराने दूध विक्री केली जाते.

संपर्क : सौ. मनीषा चौगुले, ७०३८०८३३३७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com