एकात्मिक खत व्यवस्थापनातून दर्जेदार डाळिंब

सरकोली (जि.सोलापूर) : दर्जेदार डाळिंब फळे दाखविताना दत्तात्रय भोसले
सरकोली (जि.सोलापूर) : दर्जेदार डाळिंब फळे दाखविताना दत्तात्रय भोसले

सरकोली (जि. सोलापूर) येथील प्रयोगशील शेतकरी दत्तात्रेय भोसले दर्जेदार डाळिंब उत्पादनासाठी सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर करतात. विशेषतः निर्यातक्षम डाळिंबासाठी चांगला फायदा होत आहे. सरकोली शिवारात दत्तात्रेय भोसले यांची २८ एकर शेती आहे. यामध्ये पाच एकर डाळिंब, आठ एकर द्राक्ष आणि बारा एकरांत ऊस लागवड आहे. दत्तात्रेय स्वतः बी.एस्सी. (वनस्पतिशास्त्र) पदवीधर आहेत. शास्त्रीय पद्धतीने पीक व्यवस्थापन करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे पिकांची एकरी उत्पादकता, गुणवत्ता चांगली राहते. डाळिंब उत्पादकतेबरोबरीने गुणवत्ता, रंग, चव, आकार, वजनाबाबत ते जागरूक आहेत. त्यांच्या डाळिंब बागेची एकरी उत्पादकता सरासरी आठ टनांच्या पुढे आहे.

असे आहे खत नियोजन :

  • विश्रांती काळ - फळ काढणी पूर्ण झाल्यानंतर भरपूर पाणी देऊन वाफसा स्थितीत प्रतिझाड ४०० ग्रॅम १०ः२६ः२६, मॅग्नेशियम सल्फेट १५० ग्रॅम, सूक्ष्म अन्नद्रव्य खत ७५ ग्रॅम दिले जाते.
  • पानगळीनंतर बेसल डोस दिला जातो. त्यानंतर पहिल्या हप्त्यात प्रतिझाड एसओपी १५० ग्रॅम, नीमपेंड १ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट पावडर १ किलो आणि ४० किलो कंपोस्ट खत दिले जाते.
  • डाळिंबाचे सेटिंग पूर्ण झाल्यानंतर दुसरी मात्रा दिली जाते. त्यामध्ये प्रतिझाड ४०० ग्रॅम १५ः१५ः१५, नीम पेंड ३०० ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट १५० ग्रॅम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य १०० ग्रॅम ही मात्रा दिली जाते.
  • तिसरी आणि अंतिम मात्रा फळकाढणीअगोदर ६० दिवस दिली जाते. त्यामध्ये प्रतिझाड ३०० ग्रॅम १०ः२६ः२६, एसओपी २०० ग्रॅम, मॅग्नेशियम सल्फेट १५० ग्रॅम आणि सरकी पेंड १ किलो दिली जाते.
  • कंपोस्ट खताचा वापर : भोसले जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी बागेमध्ये कंपोस्ट खताचा जास्तीत जास्त वापर करतात. कंपोस्टमधून नत्र, स्फुरद आणि पालाश या मुख्य अन्नद्रव्यबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्येही मिळतात. उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी कंपोस्ट खत उपयोगी ठरते. मुख्यतः तेलविरहित नीमपेंड, सरकी पेंड, मुरवलेले कोंबडी खत, मासळी खत आणि बोनमिल आदींचा वापर ते करतात. बहर धरताना ४० किलो कंपोस्ट खत, एक किलो निमपेंड, १ किलो बोनमील प्रतिझाड दिले जाते. डाळिंब काढणी अगोदर ६० दिवस सरकी पेंड १ किलो प्रतिझाड दिली जाते.

    योग्य वापरावर भर : रासायनिक खतांच्या वापरात प्रामुख्याने प्रतिझाड सिंगल सुपर फॉस्फेट पावडर एक किलो कंपोस्ट खतात मिसळून दिली जाते. त्याचबरोबर १०ः२६ः२६ किंवा १५ः१५ः१५ याबरोबर दुय्यम अन्नद्रव्य उपलब्धतेसाठी कॅल्शियम नायट्रेट, मॅग्नेशियम सल्फेट किंवा सल्फरचा वापर केला जातो. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा हा ठिबक आणि फवारणीद्वारे केला जातो. हाय फॉस्फेट खतांबरोबरीने सूक्ष्म अन्नद्रव्य खतांचा वापर कधीही करत नाहीत, कारण असे केल्यास ही खत जमिनीत साठून राहतात आणि पिकांना उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रासायनिक आणि सेंद्रिय असा संतुलित वापर फायद्याचा ठरतो. जेवढे झाड सशक्त तेवढा कीड, रोगांचा प्रादुर्भाव कमी असा त्यांचा अनुभव आहे. एकरी सरासरी आठ टनांपर्यंत उत्पादन घेताना निर्यातक्षम डाळिंबांना प्रतिकिलो १४५ रुपये, असा दर भोसले यांना मिळाला आहे.

    संपर्क : दत्तात्रेय भोसले, ९९२२८८४९५३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com