जिद्द २६ गुंठ्यात द्राक्षशेती यशस्वी करण्याची

सातनदुधनी (ता. अक्कलकोट) येथील हिरगप्पा कुंभार २६ गुंठ्यांत रासायनिक पद्धतीने द्राक्षशेती करायचे. मात्र ती परवडत नसल्याने चार वर्षांपूर्वी नैसर्गिक शेतीला सुरवात केली. आज त्यात कष्ट व सातत्य ठेवल्याने उत्पादनात बऱ्यापैकी स्थिरता आणत खर्च कमी करणे त्यांना शक्य झाले आहे. यंदा सहा टन उत्पादन व ६५ ते ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर त्यांनी मिळवला. कमी क्षेत्र असूनही पुढे जाण्याचा प्रयत्न, जिद्द व प्रयोगशील वृत्ती हे कुंभार यांचे गुण प्रशंसनीय म्हणावे लागतील.
द्राक्षाच्या घडांनी लगडलेल्या बागेत हिरगप्पा कुंभार
द्राक्षाच्या घडांनी लगडलेल्या बागेत हिरगप्पा कुंभार

सातनदुधनी (ता. अक्कलकोट) येथील हिरगप्पा कुंभार २६ गुंठ्यांत रासायनिक पद्धतीने द्राक्षशेती करायचे. मात्र ती परवडत नसल्याने चार वर्षांपूर्वी नैसर्गिक शेतीला सुरवात केली. आज त्यात कष्ट व सातत्य ठेवल्याने उत्पादनात बऱ्यापैकी स्थिरता आणत खर्च कमी करणे त्यांना शक्य झाले आहे. यंदा सहा टन उत्पादन व ६५ ते ८० रुपये प्रतिकिलोप्रमाणे दर त्यांनी मिळवला. कमी क्षेत्र असूनही पुढे जाण्याचा प्रयत्न, जिद्द व प्रयोगशील वृत्ती हे कुंभार यांचे गुण प्रशंसनीय म्हणावे लागतील.

सोलापूर जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्‍याच्या पुढे मैंदर्गीपासून चार किलोमीटरवर सातनदुधनी हे छोटंसं गाव आहे. डोंगराळ, माळरानात वसलेल्या या गावच्या पश्‍चिमेच्या टोकाला हिरगप्पा कुंभार यांची ३४ गुंठे एवढीच अल्प शेती आहे. पाणीही जेमतेमच. मात्र शेतीवरच्या प्रेमापोटी त्यांनी शेतीतच काहीतरी घडवायचे असा निश्‍चय केला.

द्राक्ष पिकातील अनुभव साधारण २००९ च्या दरम्यान २६ गुंठे क्षेत्रात द्राक्ष पीक घेणे सुरू केले. सुरवातीची पाच वर्षे रासायनिक पद्धतीने उत्पादन घेतले. पण त्यातून हाती काहीच लागत नव्हते. उत्पादन जेमतेम तीन ते साडेतीन टन यायचे. अर्थकारण जुळत नव्हते. सुमारे चार वर्षांपूर्वी नैसर्गिक शेतीबाबत कुंभार यांना माहिती झाली. त्याचा बारकाईने अभ्यास केला आणि त्याचेच प्रयोग सुरू केले.   रासायनिक ते नैसर्गिक द्राक्षशेती  कुंभार सोनाका वाणाची लागवड करतात. या क्षेत्रात सलगता नाही. काही क्षेत्र उंचवट्यावर तर काही क्षेत्र तळात आहे. जमीन हलकी-मध्यम आहे. नैसर्गिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याबरोबरच कलमजोड केलेल्या भागाच्या वरच्या खोडाच्या काडीपासूनही माल घेण्याचे ठरवले. त्यामुळे कुंभार यांची बाग झाडाच्या बुडापासून ते वरपर्यंत द्राक्षघडांनी लगडलेली दिसते. शेंडा मारणे, वांझफूट काढणे यांसारखी कामे करतानाही जाणीवपूर्वक बुडापासून वरपर्यंत पाने, वेलींची ते आवर्जून काळजी घेतात.

नैसर्गिक पद्धतीचे व्यवस्थापन

  • एप्रिलमध्ये खरड छाटणी केली जाते. पुढे १५ दिवसांनंतर बागेत वेलींना फुटवे फुटले की कामांना सुरवात होते.
  • तत्पूर्वी झाडाच्या बुडात उसाचे पाचट, गवत यांचे आच्छादन केले जाते. बागेच्या क्षेत्रातील गवत कधीही खुरपून काढले जात नाही वा ते काढण्यासाठी तणनाशकाचा वापर केला जात नाही. गवत किंवा काडीकचरा जागेवरच कुजवला जातो.
  • खत म्हणून जीवामृताचाच मुख्यत्वे वापर केला जातो. पिकाच्या वाढीनुसार महिन्याला तीनपर्यंत फवारण्या केल्या जातात. तर छाटणीनंतर ठरावीक दिवसांच्या अंतराने ड्रीपमधून ते दिले जाते.
  • किडी-रोग येऊ नयेत म्हणून झाडांना काटक करण्याचा प्रयत्न असतो. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दशपर्णी अर्काची फवारणी केली जाते. गरजेनुसार ताकाचीही फवारणी होते.
  • झाडाच्या बुडात प्रत्येकी ५० ते १०० ग्रॅम घनजीवामृताचा वापर होतो.
  • नैसर्गिक कीडनाशके म्हणून गोमूत्र, कडूलिंब, सीताफळ, करंज यांच्या पानांचा ठेचा, हिरवी मिरची, गावरान लसूण आदींचा वापर केला जातो. तर दहा किलो गायीचे शेण अधिक एक किलो बेसन अधिक एक किलो गूळ अधिक एक लिटर गोमूत्र यांचा वापर करून जीवामृत तयार केले जाते. 
  • मण्यांमध्ये पाणी भरण्याच्या अवस्थेत देशी गायीच्या दुधाची फवारणी केली. त्याशिवाय शहाळाच्या पाण्याचाही टॉनिक म्हणून वापर केला. द्राक्षाला चकाकी देण्याचे काम त्यामुळे झाल्याचे कुंभार सांगतात.  
  • क्षेत्र अत्यंत कमी असल्याने द्राक्षात चवळी, हरभरा, मिरचीचे घरी खाण्यापुरते उत्पादन घेतले. काही प्रमाणात जनावरांसाठी चाराही घेतला.  
  • द्राक्षांना नैसर्गिक गोडी रासायनिक शेती पद्धतीतील द्राक्षांची गोडी आणि नैसर्गिक पद्धतीने पिकावलेल्या द्राक्षांची गोडी यामध्ये मोठा फरक जाणवतो. सध्याच्या बागेतील सरसकट घड साखरेच्या गोडीप्रमाणे लागतात. आंबट द्राक्षांचे प्रमाण नगण्य मिळते. त्यामुळेच शहरी ग्राहकांच्या पसंतीला आपली द्राक्षे उतरली असल्याचे कुंभार सांगतात.   उत्पादन नैसर्गिक शेतीला सुरवात केल्यानंतर पहिल्या वर्षी फारसे चांगले उत्पादन मिळाले नाही. मात्र दुसऱ्या वर्षी चार टन उत्पादन मिळाले. त्या वर्षी बेदाणा तयार केला. त्यास प्रतिकिलो १२० रुपये दर मिळाला. गेल्या वर्षीही पाच टन एकरी उत्पादन मिळाले. त्यापासून दीड टनांपर्यंत बेदाणा तयार झाला.यंदा मात्र ‘टेबल ग्रेप्स’ म्हणून द्राक्षांची विक्री केली. यंदाचे उत्पादन सहा टन मिळाले.

    विक्री बांधावर, व्यापाऱ्यांची पसंती द्राक्षांसाठी यंदा मार्केट शोधण्याची गरज भासली नाही. नैसर्गिक द्राक्षे म्हणून विविध व्हॉटस ॲप ग्रुप तसेच यू ट्यूबवर त्यांचा प्रसार झाला. त्यातून व्यापाऱ्यांनी स्वतःहून संपर्क साधला. पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी किलोला ६५, ७० ते कमाल ८० रुपयांप्रमाणे दर मिळाला. एकूण क्षेत्रात सुमारे ४० हजार रुपयांचा खर्च झाला. तर तीन ते साडेतीन लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न हाती पडले. द्राक्षाची चव पसंत पडल्यानंतर दरवर्षी आम्हाला ही द्राक्षे पुरवा असा आग्रहदेखील व्यापाऱ्याने धरल्याचे कुंभार यांनी आवर्जून सांगितले.  तज्ज्ञांची प्रतिक्रिया कुंभार यांना झाडाच्या बुडापासून ते वरच्या भागापर्यंत द्राक्षाचे उत्पादन घेतले आहे. त्याबाबत राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. जी. सोमकुंवर म्हणाले, की या पद्धतीला स्थानिक भाषेत अंगावर माल घेणे असे म्हटले जाते. रूटस्टॉकच्या बागेत जेथे कलमजोड केले आहे त्याच्या साधारण सव्वा फूट वरती खोडाच्या काड्यांपासूनही माल घेण्यात येतो. मात्र या पद्धतीत काड्या व पाने खालच्या भागात असल्याने जमिनीला त्याचा संपर्क होतो. यामुळे डाऊनी मिल्ड्यू किंवा तत्सम रोगांचा प्रादुर्भाव होण्याचाही मोठा धोका असतो. या पद्धतीची शिफारस आम्ही करीत नाही. महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे म्हणाले की अशा प्रकारचे प्रयोग आम्हीही द्राक्षबागेत करून पाहिले आहेत. यात एखाद्या वर्षी उत्पादन चांगले मिळू शकते. मात्र पुढे ते कमी होऊ लागते असा आमचा अनुभव आहे. शिवाय रोगांच्या प्रादुर्भावाचाही मोठा धोका या पद्धतीत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पद्धतीचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा व अनुभवी बागायतदारांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. दहा वर्षांतील द्राक्षशेतीतील अनुभवातून बरेच शिकलो आहे. नैसर्गिक शेती पद्धतीत खर्च कमी केला जाऊ शकतो. उत्पादनही चांगले मिळते. थोडा संयम बाळगावा लागतो. यापुढे स्वतःच द्राक्षांचे ‘मार्केटिंग’ करण्याचा विचार आहे. हिरगप्पा कुंभार,९७६६६०७४३९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com