दक्षिण महाष्ट्रात कांद्यासाठी सोलापूरचेच मार्केट

दक्षिण महाष्ट्रात कांद्यासाठी सोलापूरचेच मार्केट
दक्षिण महाष्ट्रात कांद्यासाठी सोलापूरचेच मार्केट

कांद्यासाठी प्रसिद्ध नाशिक, लासलगावच्या बाजाराशी आज सोलापूरची कांदा बाजारपेठ स्पर्धा करते आहे. शेजारील राज्यांत दळणवळणाच्या सुलभ सोयी, शेतकऱ्यांसाठी तयार केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सुविधा अशा बाबींमुळे आज सोलापूर कांदा मार्केट वेगाने विस्तारत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात यंदाच्या हंगामात तर कांद्याच्या दराने चांगलीच उसळी घेतली. गेल्याच आठवड्यात तब्बल ५१ हजार क्विंटल आवक एकाच दिवशी झाली अन्‌ बाजार समितीच्या इतिहासातील आवकेचा उच्चांक मोडला. सोलापूर हे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या सीमेवर असल्याने सोलापूर बाजार समितीत कांद्याची उलाढाल चांगली होते. सोलापुरातून या राज्यांत दळण-वळणाची सहज सुविधा हे मुख्य कारण त्यामागे आहे. प्रामुख्याने ऑक्‍टोबर ते फेब्रुवारी-मार्चपर्यंत कांदा मार्केट हंगाम चालतो. खरिपातील उशीराचा आणि रब्बीतील कांदा या हंगामात मार्केटमध्ये येतो. याच दरम्यान कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही कांद्याला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे सोलापूरचे कांदा मार्केट या कालावधीत चांगलेच चर्चेत येते. साहजिकच अलीकडील वर्षात सोलापूर मार्केटला कांद्याच्या बाजारामुळे वेगळी ओळख मिळाली आहे. सोलापूरचे प्रसिद्ध मार्केट नाशिक, लासलगाव, पिंपळगाव बसवंत या राज्यातील महत्त्वाच्या कांदा बाजारपेठा आहेत. गेल्या काही वर्षांत मात्र सोलापूर बाजार समितीतील कांद्याची वाढती आवक, दरातील स्थिरता आणि आंध्र प्रदेश, कर्नाटक यांसारख्या राज्यांची सोलापूर बाजार समितीतील कांदा खरेदीसाठी असलेली पसंती या बाबी लक्षात घेण्याजोग्या आहेत. त्यामुळेच या बाजाराशी सोलापूर बाजार समिती स्पर्धा करीत अाहे. लाल, गरवा कांद्यासाठी ओळख मुख्यतः लाल, पांढरा, गरवा कांदा सोलापूर बाजार समितीत येतो. सोलापूर जिल्ह्यात बार्शी, उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा, मंगळवेढा या भागात कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. मध्यम, हलक्‍या जमिनी आणि एकूणच अनुकूल हवामानामुळे इथल्या कांद्याचा आकार, चव आणि रंगही वेगळा असतो. त्यातही सर्वाधिक लाल कांद्याचे उत्पादन घेतले जाते. साहजिकच त्याला मार्केटही चांगले मिळते. बाजारपेठेची वैशिष्ट्ये -ऑक्‍टोबरपासून कांद्याची आवक सुरू होते. तेव्हा ती २०, ४०, ५० गाड्या अशा प्रमाणात असते. ऐन नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या कालावधीत हीच आवक तब्बल २०० ते ४०० गाड्यांपर्यंत पोचते. दिवसाची उलाढाल किमान आठ ते नऊ कोटी रुपयांपर्यंत पोचते. बाजार समितीमध्ये जवळपास दहा सेलहॉल उभारले आहेत. येथे ३०० आडते कांद्याचे व्यवहार करतात. तर १२५ हून अधिक खरेदीदार प्रत्यक्ष लिलावात सहभागी होतात. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील खरेदीदारांची संख्याही त्यात मोठी आहे. खुले लिलाव, रोख पट्टी इथल्या बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे लिलावाआधी काटा होतो. विक्री झाल्यानंतर त्याची रोख पट्टी दिली जाते. याच दोन मुख्य बाबींमुळे हाच बाजार शेतकऱ्यांना तसेच व्यापाऱ्यांनाही सोयीचा वाटतो. बाजार समितीचे प्रशस्त आवार, वाहनांमध्ये कांद्याची आवक-जावक करण्यासाठी माथाडी कामगारांचे पुरेसे मनुष्यबळ इथे उपलब्ध आहे. या सर्व कारणांमुळे कांदा बाजार नावारुपास येतो आहे.  दर अन् आवकेचा उच्चांक  सन २०१५ च्या ३१ ऑगस्ट रोजी बाजार समितीमध्ये १३८२ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. त्यावेळी सर्वाधिक दर प्रतिक्विंटल ७४०० रुपये इतका मिळाला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी दर काहीसे टिकून असले तरी आवकेचा मात्र ऐतिहासिक उच्चांक झाला. यंदा पहिल्यांदाच १६ डिसेंबर, २०१७ मध्ये सर्वाधिक ५० हजार ९६१ क्विंटल इतकी आवक झाली. दर मात्र चारहजार रुपये प्रति क्विंटलवर होता. या एकाच दिवसाची उलाढाल तब्बल ११ कोटी ३३ लाख ८८ हजार २२५ रुपये इतकी झाली.

नोव्हेंबर-डिसेंबर (२०१६)मधील आवक (क्विंटल)  

महिना  आवक
नोव्हेंबर   चार लाख ७४ हजार ६५३ क्विंटल
डिसेंबर सात लाख २८ हजार १२९ क्विंटल

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर (२०१७)

 ऑक्‍टोबर   दोन लाख चार हजार ४५ 
 नोव्हेंबर    पाच लाख,४३ हजार ००३ 
 डिसेंबर (१६ डिसेंबरपर्यंत)  तीन लाख ९४ हजार ३५८ 

नोव्हेंबर-डिसेंबर (२०१६) मधील दर प्रति क्विंटल  (रु.)

 महिना  किमान  कमाल  सरासरी दर
 नोव्हेंबर   १००  २०००  ६००
 डिसेंबर  १००  १५२५  ५५०

ऑक्‍टोबर-नोव्हेंबर -डिसेंबर (२०१७)

ऑक्‍टोबर   १००  ४१००  १५००
नोव्हेंबर  १००  ५२५०  २३००
डिसेंबर (१६ डिसेंपर्यंत)  २००  ५१००  २२००

सोलापूर बाजारपेठेची वैशिष्ट्ये

  • लिलावाआधी वजन, खुले लिलाव, रोख पट्टी
  • तीनशे अडत व्यापारी, १२५ खरेदीदार
  • कांद्यासाठी दहाहून अधिक प्रशस्त सेलहॉल
  • ऑक्‍टोबर ते मार्चपर्यंत खरेदी-विक्रीचा हंगाम
  • आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यात दळण-वळणाची सोय
  • चोवीस तास सुरक्षा रक्षक
  • प्रतिक्रिया रोख आणि चोख व्यवहारामुळेच शेतकरी आणि व्यापारी आमच्याकडे येतात. शिवाय खरेदीदाराची स्वतःची गुंतवणूक मोठी आहे. पुरवलेल्या सोयी सुविधा आणि बाजार समितीतचे योग्य नियंत्रण, हाताळणी या बाबींमुळे हे शक्‍य होते आहे. -सुरेश काकडे, प्रशासक, सोलापूर बाजार समिती, सोलापूर   लिलावासाठी प्रशस्त सेलहॉल, माथाडी कामगारांसह पुरेशा मनुष्यबळाचा योग्य वापर आणि सोयीसुविधा हेच सोलापूर बाजाराचे वैशिष्ट्य आहे. -विनोद पाटील, प्रभारी सचिव, सोलापूर बाजार समिती, सोलापूर    रोख पट्टी आणि खुल्या लिलावामुळेच सोलापूर बाजारात कांद्याची आवक वाढते आहे. खरेदीदारांनाही सोलापूर हे सोयीचे मार्केट वाटते. या सगळ्याचा परिणाम बाजार वाढण्यात होतो आहे. -संजय जावळे, आडत व्यापारी, सोलापूर बाजार समिती, सोलापूर दरवर्षी मी एक-दोन एकरांपर्यंत पाण्याच्या उपलब्धतेनुसार कांदा घेतो. सोलापूर बाजारपेठेत खुले लिलाव होतात. वजनही आधीच होते ही आमच्यासाठी महत्त्वाची बाब आहे. शिवाय पट्टीही रोख मिळते. त्यामुळे अन्य बाजारांच्या तुलनेत सोलापूर फायद्याचे मार्केट वाटते. - अप्पा कोरके, शेतकरी, गुळवंची, ता. उत्तर सोलापूर   संपर्क- सोलापूर बाजार समिती -०२१७-२३७४६७८

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com