सणासुदीत अर्थकारण उंचावणारे पेरीडकरांचे रताळे

पेरीड गावात ठिकठिकाणी अशी रताळ्यांच्या राशी दिसून येतात.
पेरीड गावात ठिकठिकाणी अशी रताळ्यांच्या राशी दिसून येतात.

गणपती उत्सवापासून ते अगदी दसरा, दिवाळीस तुळशीच्या विवाहापर्यंत रताळ्याला असलेली मागणी पेरीड गावच्या (जि. कोल्हापूर) शेतकऱ्यांनी अोळखली. कमी कालावधीत गरजेच्या किंवा सणासुदीच्या काळात पैसे देणारे पीक म्हणून हे पीक त्यांचे अर्थकारण उंचावणारे ठरले आहे. म्हणूनच गावाने या पिकात आपली अोळख तयार केली आहे.   कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर मलकापूरपासून तीन किलोमीटरवर पेरीड (ता. शाहूवाडी) गाव आहे. सुमारे साडेतीन हजार लोकसंख्येचे हे गाव डोंगर दऱ्यांच्या कुशीत दडले असून चार महिने सातत्याने पाऊस असतो. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागातील पट्‌ट्याप्रमाणे भात, ऊस घेतला जातो. गेल्या काही वर्षांपासून रताळे हे पीक येथील ग्रामस्थांच्या अर्थव्यवस्थेला उभारी देणारे ठरत आहे.

रताळ्याचे गाव म्हणून अोळख

खरे तर रताळी म्हटले की शाहूवाडी, चंदगड ही तालुक्‍यांच्या गावांची नावे घेतली जातात. पण शाहूवाडी तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात रताळे घेणारे एकमेव गाव म्हणून पेरीडकडे पाहण्यात येते. गावात सुमारे शंभर हेक्‍टरहून अधिक क्षेत्र या पिकाच्या लागवडीखाली आले असावे, असा जाणकरांचा कयास आहे. सणासुदीच्या काळात हमखास दर मिळत असल्याने गेल्या काही वर्षांत रताळ्याला या भागातील शेतकऱ्यांनी पसंती दिली. दहा गुंठ्यापासून ते चार ते पाच एकरांवर त्याचे क्षेत्र असते. पैशांची गरज असते त्या वेळी म्हणजे दसरा, दिवाळीला मदत करणारे पीक म्हणून रताळ्याची अोळख झाली आहे. गणेशोत्सवापासून ते तुळशी विवाहापर्यंत पेरीडमध्ये या पिकाची मोठी उलाढाल होते.

लागवड पद्धती

रताळ्यासाठी डोंगराळ भागातील निचरा होणारी जमीन अनुकूल ठरते. पेरीडला असे नैसर्गिक वरदान लाभले आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर जूनमध्ये वेलीची लागवड होते. तत्पूर्वी गुढीपाडव्यापासूनच पूर्वनियोजन सुरू होते. वेल व्यवस्‍थित करून ते लागवड योग्य करणे, सऱ्या सोडून जमिनी तयार करण्याची कामे एप्रिल, मे महिन्यात चालतात. पाऊस सुरू झाला की तीन फुटांच्या सरीत वेली लावण्यात येतात. रताळ्याची काढणी झालेली असते त्यावेळीच त्या शेताकडेला ठेवलेल्या असतात.

पोषक हवामान

लागवडीनंतर एकरी सरासरी पाच ते सात पोती मिश्र खते दिली जातात. फवारण्या फारशा कराव्यात लागत नाहीत. कितीही पाऊस झाला तरी निचऱ्याची जमीन असल्याने पाणी साठून राहात नाही. त्यामुळे कंदांची वाढ चांगली होते. अती पाऊस चालत नाही. एक दोन महिने पाऊस झाल्यानंतर उघडीप दिल्यास चालते. शाहूवाडी तालुक्‍यात अशी परिस्थिती असल्याने हे वातावरण रताळ्यास पोषक ठरते. नोव्हेंबर, डिसेंबरपर्यंत काढणी सुरू राहते

काढणीचे नियोजन

साधारणत: गणेशोत्सवापासून हळूहळू हंगाम सुरू होतो. नवरात्र ते दिवाळीपर्यंतचा कालावधी काढणीसाठी महत्त्वाचा असतो. जमिनीत खोलवर असल्याने रताळे काढणी ट्रॅक्‍टरच्या साह्याने होते. त्यानंतर ढीग करून ती स्वच्छ धुतली जातात. पोत्यात भरून बाजारात नेण्यात येतात. या काळात गावात जागोजागी रताळ्याने भरलेली पोती, ट्रक्स, रताळे धुण्यासाठी पाणवठ्यावर झालेली गर्दी ही दृश्‍ये सर्रास पाहण्यास मिळतात.

गटाद्वारे पाठवणी

रताळे उत्पादकांनी आपले गट तयार केले आहेत. दुसऱ्या दिवशी किती रताळ्यांची काढणी होऊ शकते याचा अंदाज आदल्या दिवशी घेत ट्रकची मागणी नोंदवली जाते. माल वाशी (मुंबई), पुणे, कोल्हापूर आदी बाजारपेठांत पाठवला जातो. वाशी बाजारपेठेत अन्य बाजारसमित्यांपेक्षा किलोस एक ते दोन रुपयांनी दर अधिक मिळतो असा पेरीडच्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

नवरात्रीचा कालावधी सर्वाधिक मागणीचा

नवरात्रीच्या काळात दररोज मागणी असल्याने घटस्थापनेच्या दोन दिवस आधीपासून ते दसरा होईपर्यंत दहा ते बारा दिवस रताळे शेतकऱ्यांची लगबग सुरु असते. गणेशोत्सवात रताळ्याची आवक कमी असल्याने सुरवातीला दर चांगला मिळतो. या काळात किलोस पंचवीस रुपये तर नवरात्रीत आवक वाढल्यानंतर हेच दर १५ रुपयापर्यंत खाली येतात. पाऊस व हवामानानुसार एकरी उत्पादन अडीच ते तीन टनांच्या आसपास मिळते. सुमारे ४५ किलोचे पोते असते. एका ट्रकद्वारे दोनशे पोती भरली जातात. उत्पादन खर्च जाऊन समाधानकारक रक्कम हाती राहते.

रताळ्याचे पीक आम्हा पेरीडच्या अल्पधूधारक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरले आहे. कमी कालावधीत व सणासुदीच्य काळात ते रक्कम हाती देते असा अनुभव आहे. संभाजी खोपडे- ८००७७१९१५०

अनेक वर्षांपासून रताळ्याच्या शेतीत आहे. सुमारे दोन ते तीन एकरांवर हे पीक असते. बाजारपेठ अोळखून तसे नियोजन केल्याने दर हाती लागण्याचा फायदा होतो. कमी कालावधीत उत्पन्न देणारे हे पीक आहे. याच पिकातून उदरनिर्वाहाला मोठा हातभार लागला आहे. नागोजी कुंभार, संताजी केसरे

पूर्वी पारंपरिक पद्धतीने रताळ्याची लागवड व्हायची. अलीकडील काळात रताळ्याचा दर्जा वाढविण्याबद्दल शेतकरी जागरुक झाले आहेत. मुख्य खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये, सिलीकॉन आदींचा वार ककरण्याचे प्रमाण वाढत असल्याने रताळ्याची जाडी व एकूणच दर्जा वाढून परिणामी दर चांगला मिळत आहे. संतोष कुंभार, कृषी निविष्ठा विक्रेता, मलकापूर

पेरीड- गाडेवाडी भागाचे रताळ्याचे एकूण क्षेत्र सुमारे ऐंशी हेक्‍टरच्या आसपास आहे. उत्पादन हेक्‍टरी सरासरी ७ टन आहे. हंगामत किलोला १५ ते २० रुपये दर मिळतो. सणासुदीच्या दिवसात चांगले दर मिळतात. हंगामात गावात या पिकातून सरासरी एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल होत असावी. प्रमोद खोपडे-९४०४९९०८३३ कृषी सहायक, पेरीड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com