सौरऊर्जेच्या माध्यमातून घडले सिंचनात परिवर्तन

जंगलांमुळे वीज वितरण कंपनीला पोल टाकून विजेची उपलब्धता करणे अवघड किंवा अशक्‍यच होते. त्यामुळे सौरऊर्जेच्या माध्यमातून संरक्षित सिंचनाची सोय केली. आता पीक फेरपालट करणे शक्‍य झाले. व्यावसायिक शेती करता येणार आहे. बारमाही भाजीपाला पिकांसाठी पाण्याची उपलब्धता सौरयंत्रणेमुळे शक्‍य झाली आहे. मका, वांगी, मिरची, टोमॅटो यासारखी पिके आम्ही घेतो. नितीन पदा- ७७४४९६०४६५ पैडी, ता. एटापल्ली
अहेरी तालुक्‍यातील रामा मसराम यांच्याकडील सौर सिंचन
अहेरी तालुक्‍यातील रामा मसराम यांच्याकडील सौर सिंचन

बारमाही वाहणाऱ्या नद्या त्यासोबतच सिंचनाकरिता मालगुजारी तलावाचा पर्याय; तसेच मुबलक सूर्यप्रकाश गडचिरोली जिल्ह्यात आहे. या नैसर्गिक स्रोतांचा वापर आणि वीज उपलब्धतेच्या अडचणींवर सौरऊर्जेच्या माध्यमातून येथील शेतकऱ्यांनी मात केली आहे. सिंचन सुविधा बळकट करण्याकडे वाटचाल केली आहे. विशेष म्हणजे राज्यात चर्चेत आणि शासनाने घोषणा केलेल्या पाइप सिंचन पद्धतीचा अंगीकारही प्रथमच या भागात करण्यात आला आहे.   गडचिरोली जिल्ह्यात नद्या आणि मालगुजारी तलावांचे जाळ आहे; परंतु दुर्गम, घनदाट जंगल असल्याने यातील पाणी उपसा करण्याच्या दृष्टीने वीज व्यवस्थापन तितके सोपे नाही. मात्र शेतकऱ्यांनी सौरऊर्जेच्या माध्यमातून यावर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रयत्नांना कृषी विभागाच्या योजनेची जोड मिळाली. आदिवासी शेतकरी गटांना सामूहिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना गडचिरोली जिल्ह्यासाठी खास तयार करण्यात आली. त्याअंतर्गत साडेसात अश्‍वशक्‍ती (एचपी) पंप, एक किलोमीटर पाइपलाइन, प्रतिलाभार्थी तुषारसंच या घटकांचा समावेश आहे. त्यासाठी ९० टक्‍के अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. एका गटात सरासरी दहा शेतकरी असावेत असा निकष आहे. शेतकऱ्यांना केवळ पाइपलाइनसाठी खोदाई व तो भाग व्यवस्थित बुजविणे अशी कामे करावी लागतात. विदर्भात पाइपलाइनद्वारे सिंचनाची योजना या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम राबविण्यात यश आले आहे. एक किलोमीटर पाइपलाइनद्वारे नदी किंवा मालगुजारी तलावाचे पाणी पोचविले जाते. गटातील शेतकऱ्यांच्या शेतात ‘अंडरग्राउंड व्हॉल्व्ह’ बसविण्यात आले आहेत. पाण्याच्या काटेकोर वापरासाठी तुषार संच देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांचा योजनेला वाढता प्रतिसाद असल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी सांगितले. सिंचनामुळे सुबत्तेस हातभार गडचिरोली हा बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या भागात मालगुजारी तलावाची संख्या मोठी आहे. या पाण्याच्या बळावर पीक फेरपालटाचे प्रयत्न कृषी विभागाकडून केले जात आहेत. अहेरी, एटापल्ली अणि भामरागड तालुक्‍यात या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे चित्र आहे. सिंचन व्यवस्थेमुळे गहू, हरभरा, भाजीपाला यांसारखी पिके घेणे शक्‍य झाले आहे. अहेरी आणि सिंरोचा तालुक्‍यात सुमारे आठ हजार हेक्‍टरवर नगदी पिके घेतली जातात. त्यामुळे या भागात काही प्रमाणात आर्थिक सुबत्ता नांदण्यास हातभार लागला आहे. शेतकऱ्यांत आली जागृती अहेरी उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांच्या म्हणण्यानुसार, या तालुक्‍यात सुमारे साडेतीनशे हेक्‍टरवर भाजीपाला घेतला जातो. मका, कापूस, मिरची याखालील क्षेत्रही वाढीस लागले आहे. पूर्वी शेतकऱ्यांचा पाट पाणी देण्यावरच भर राहायचा. परिणामी गेल्या वर्षी तुषार सिंचन अनुदानाकरिता एकच प्रस्ताव मिळाला. काही शेतकरी लगतच्या तेलंगणा राज्यातूनही तुषार व ठिबकची खरेदी करीत होते. यंदा मात्र एकाच आठवड्यात तब्बल १४५ शेतकऱ्यांचे प्रस्ताव ठिबक, तुषार अनुदानासाठी कृषी विभागाकडे आले. गाव किंवा परिसरात ठिबक, तुषार विक्री केंद्रांचा अभाव असल्यानेही शेतकऱ्यांत पाणीबचतीच्या या साधनांविषयी जागृती नव्हती, असेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा कल वाढल्याने आता कृषी व्यवसायिकांनीही ठिबक आणि तुषार संच विक्रीसाठी ठेवणे सुरु केले आहे. धानपट्ट्यात वाढला कापूस पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया व नागपूर आदी जिल्ह्यांत भाताखालील एकूण क्षेत्र सात लाख हेक्‍टरपेक्षा अधिक आहे. गडचिरोली जिल्हा मुख्यत्वे धान (भात) शेतीसाठी ओळखला जातो. या भागातील शेतकरी पीक फेरपालटाकडे वळले आहेत. अहेरी व सिरोंचा तालुक्‍यात मागील वर्षी कापूस लागवड पाच हजार हेक्‍टरवर होते. यंदा दोन तालुक्‍यातील कापूस लागवडक्षेत्र सात हजार हेक्‍टरवर पोचले आहे. जिल्ह्यात पहिले पाच शेडनेट संरक्षित शेतीचा पॅटर्न दुर्गम, आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात रुजू लागला आहे. ताटीगुडम तीन, चंद्रा व कोरोली या गावांमध्ये एक याप्रमाणे पाच शेडनेटस उभी राहिली आहेत. त्यात मिरची घेण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. शेततळ्यांना पसंती पूर्व विदर्भातील हमखास पावसाचा जिल्हा अशी गडचिरोलीची ओळख; परंतु नजीकच्या काळात या भागातदेखील पाऊस बेरभवशाचा झाला आहे. शेतकऱ्यांतही व्यावसायिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे भाजीपाला व नगदी पिकांना संरक्षीत सिंचनाचे कवच असावे यासाठी शेतकरी शेततळ्यांकडे वळले आहेत. यंदा अहेरी तालुक्‍यात मागेल त्याला शेततळे व जलयुक्‍त शिवार अभियानातून सुमारे साडेसातशे शेततळी घेण्यात आली. त्या माध्यमातून पिकांची उत्पादकता वाढविण्यात शेतकरी यशस्वी झाले आहेत. सिंचन योजनेतील ठळक बाबी -तुषार सिंचनामुळे पाणीवापरात ३० ते ३५ टक्‍के बचत; तर उत्पादनात १० ते १५ टक्‍के वाढ होणार अाहे. आदिवासी शेतकऱ्यांनाही नव्या तंत्रज्ञानाची उपलब्धता होईल. -योजनेत ११ शेतकरी गटांचा समावेश. त्यात अहेरी व भामरागड तालुक्‍यातील प्रत्येकी एक; तर एटापल्ली तालुक्‍यातील नऊ गटांचा समावेश. -जिल्ह्यात धानाऐवजी कापसाला पसंती. - विजेची उपलब्धता नसलेल्या भागात सिंचनाचा पर्याय झाला उपलब्ध.     संपर्क- वैभव तांबे-९४०३४८२८४२ उपविभागीय कृषी अधिकारी, अहेरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com