उत्कृष्ट शेळीपालन व्यवसायाचा आदर्श

शेडमधील शेळ्यांचे संगोपन व चारा खाण्यासाठी ट्रेची व्यवस्था
शेडमधील शेळ्यांचे संगोपन व चारा खाण्यासाठी ट्रेची व्यवस्था

परभणी जिल्ह्यातील वडाळी येथील ढोले बंधूंनी शेळीपालन व्यवसायातून उत्पन्नाचा पर्यायी स्रोत निर्माण केला आहे. दहा शेळ्यांपासून सुरवात केलेल्या व्यवसायाचा चार वर्षांत विस्तार झाला आहे. आज त्यांच्याकडे सहा-सात जातींच्या ३५० ते ४०० शेळ्या आहेत. त्यांच्या विक्रीतून फायदा मिळतो आहेच, शिवाय लेंडीखत उपलब्ध झाल्याने जमिनीची प्रत वाढण्यास मदत होत आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर या तालुका ठिकाणाजवळील वरुड नृसिंह गावापासून सुमारे तीन किलोमीटरवर वडाळी हे डोंगराळ भागातील गाव आहे. गावच्या उत्तरेस डोंगररांग तर दक्षिणेस लघुसिंचन तलाव आहे. शिवारात डोंगर उतारावरील दगडगोटे, उथळ जमिनीचे प्रमाण अधिक आहे. गावातील उत्तमराव कठाळू ढोले यांना माणिकराव, विनायक, भास्कर, अच्युत ही चार मुले आहेत. या संयुक्त कुटुंबाचे २० सदस्य आहेत. त्यांची एकूण ६० एकर जमीन आहे. सिंचनासाठी तीन विहिरी आहेत. वडाळी तलाव तसेच गावाजवळील विहिरीवरून अशा प्रत्येकी दीड किलोमीटरवरून पाइपलाइनद्वारे पाणी आणून सिंचनाची व्यवस्था केली आहे. खरिपात सोयाबीन, मूग, तूर, कपाशी, हळद तर रब्बीत गहू, हरभरा तर उन्हाळी हंगामात भुईमुगासारख्या पिकाचे उत्पादन घेतले जाते.

शेळीपालनात प्रगती ढोले यांनी शेतीला पूरक म्हणून शेळीपालन व्यवसाय करण्याचे निश्चित केले. त्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांचे अनुभव जाणून घेतले. सन २०१४ मध्ये गावरान तसेच उस्मानाबादी मिळून एकूण १० शेळ्या खरेदी केल्या. सुरवातीला ६० हजार रुपये खर्च आला. शेतातील आखाड्यावर शेळ्यांसाठी निवाऱ्याची उभारणी केली. अर्ध-बंधिस्त पद्धतीने शेळ्यांचे संगोपन केले.व्यवसायातील पहिली विक्री १८ बोकडांपासून झाली. त्यातून मिळालेले उत्पन्न विस्तारासाठी वापरण्याचे ठरविले. सन २०१५ मध्ये ३५ शेळ्या खरेदी केल्या. शेळीपालनातून मिळू लागणाऱ्या उत्पन्नाला शेतीतील उत्पन्नाची जोड दिली. मार्केटची गरज अोळखून जमनापारी, सिरोही, सोजत, राजस्थानी, काश्मिरी, तोतापरी अशा विविध जातींच्या शेळ्या खरेदी केल्या. संख्या वाढल्यामुळे शेडचाही विस्तार केला. चारा, पाण्याची सुविधा त्यात केली.

सुविधायुक्त निवारा आखाड्यावरील १२० बाय ९० फूट आकाराच्या जागेला तारेचे कुंपण केले. त्यामध्ये १२० बाय ४० फूट आकाराचा पत्र्यांचा निवारा उभारला. त्यात शेळ्या तसेच कोकरांसाठी वेगवेगळे कप्पे तयार केले. बोकडांसाठी स्वतंत्र निवारा केला.

शेळ्यांची नोंद सर्व शेळ्यांना ‘इअर टॅगिंग’ म्हणजेच क्रमांक देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक शेळीची सविस्तर नोंद ठेवली जाते. विविध रोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात येते. जंतनाशके दिली जातात. शेताशेजारी माळारान असल्यामुळे शेळ्यांना फिरण्यासाठी मोकळी जागा मिळते.

जागेवरूनच होते विक्री शेळ्या- बोकडांची वजनावर विक्री होते. त्यासाठी इलेक्ट्राॅनिक वजन काटा बसविण्यात आला आहे. व्यापारी शेतावर येऊनच खरेदी करतात. याशिवाय परभणी, बोरी, येलदरी (जि. परभणी), मंठा (जि. जालना) येथे भरणाऱ्या बाजारामध्ये शेळ्या विक्रीसाठी नेल्या जातात. बकरी ईदनिमित्त बोकडांची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. नर-मादी व जातींनुसार वेगवेगळे दर मिळतात. साधारण हे दर किलोला ३००, ३५० व त्याहून अधिक असतात.

कामांची विभागणी मोठे माणिकराव बोरी (ता. जिंतूर) येथील संस्थेमध्ये सहशिक्षक आहेत. विनायक यांच्याकडे शेळीपालन तर भास्कर इलेक्ट्राॅनिक्स व्यवसाय सांभाळतात. अच्युत यांच्याकडे ट्रॅक्टर व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. विनायक यांना दोन मुले असून, अविनाश हे कृषी पदवीधर असून खत कंपनीच्या सेवेत आहेत. अजय यांनी वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. विनायक यांना अजय आणि गणेश अच्युत ढोले हे शेळ्यांच्या व्यवस्थापनासाठी मदत करतात.

अॅग्रोवन प्रेरणादायी ढोले बंधू अॅग्रोवनचे सुरवातीपासून वाचक आहेत. त्यातील यशकथांमुळे शेळीपालन सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचे ते सांगतात. विविध पिकांच्या व्यवस्थापनाबाबत सोप्या भाषेतील लेखांमुळे शेतीत सुधारणा करत आली, असेही त्यांनी सांगितले.

व्यवसायाचे प्रशिक्षण ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘एसआयआयएलसी’तर्फे आयोजित शेळीपालन विषयावरील प्रशिक्षण अजय ढोले यांनी, तर नांदेड येथे आयोजित प्रशिक्षण माणिकराव यांनी घेतले आहे.

लेंडी खतामुळे वाढली जमिनीची सुपीकता शेळ्यांपासून दरवर्षी सुमारे १०० ट्राॅली लेंडीखत तर गाई, बैल आदी जनावरांपासून २५ ते ३० ट्रॉली शेण खत मिळते. या खतांमुळे दरवर्षी सुमारे पाच- सहा एकराला सेंद्रिय खत उपलब्ध होते. शिवाय उन्हाळ्यात मोकळ्या शेतात शेळ्या बसविल्या जातात. यातून जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली आहे. रासायनिक खतांचा वापर निम्म्यावर आला आहे. उत्पादनात वाढ झाली आहे. पूर्वी साठ एकरसाठी रासायनिक खतांच्या दीडशे बॅग्ज वापरल्या जात. आता हीच संख्या ६० बॅग्जवर आली आहे.

उत्पादन हळदीचे एकरी उत्पादन १० ते १२ क्विंटलवरून २० ते २२ क्विंटल, सोयाबीनचे ५-६ क्विंटलवरून ८-१० क्विंटल, कपाशीचे ७-८ क्विंटलवरून १४ क्विंटलपर्यंत वाढले आहे. ठिबकद्वारे पाणी दिले जाते. लेंडीखत, शेणखत आणि पाण्याच्या काटेकोर वापरामुळे जमिनीची प्रत सुधारली आहे. शेळीपालनातून वर्षाकाठी जे उत्पन्न मिळते त्यातील ४० ते ५० टक्के नफा मिळतो. एकत्रित कुटुंब पद्धती, एकमेकांवरील विश्वास, प्रेम, कामांची विभागणी यामुळे ढोले कुटुंबाची शेतीत यशस्वी वाटचाल सुरू आहे.

चारा-पाण्याची व्यवस्था निवाऱ्याशेजारी पाण्यासाठी सिमेंटचा हौद बांधला. चारा साठविण्यासाठी दीड हजार चौरस फूट आकाराचा २२ फूट उंची असलेल्या पत्र्याच्या गोदामाची उभारणी केली. त्यात सोयाबीन, अन्य भुस्सा, कडबा साठविला जातो. या ठिकाणी कडबा कुट्टी तसेच भरडा तयार करण्याचे यंत्र आहे.प्रत्येक कप्प्यासमोर पत्र्याचा ट्रे लावण्यात आला आहे. नळाच्या तोट्या प्लॅस्टिकच्या टोपलीमध्ये सोडून प्रत्येक कप्प्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. विविध पिकांच्या गुळीचे मिश्रण, कडबा कुट्टीसोबत सोयाबीन, गहू, मका आदी धान्ये यंत्राद्वारे दळून तयार करण्यात आलेला भरडा खाद्य म्हणून दिला जातो.

संपर्क : विनायक ढोले- ९५२७८३६६८६ अजय ढोले-९८३४७२३४५१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com