पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापर

 प्रभाकर चौधरी यांची सेंद्रिय खत निर्मिती
प्रभाकर चौधरी यांची सेंद्रिय खत निर्मिती

प्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची वीस एकर शेती आहे. प्रारंभी काही वर्षे त्यांनी पारंपरिक पद्धतीने रासायनिक निविष्ठांचा वापर करत शेती केली. मात्र १९९५ पासून त्यांना रासायनिक खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता घटल्याचे जाणवू लागले. त्यानंतर त्यांनी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबरोबरच पीक उत्पादकता वाढविण्यातही त्यांना यश मिळाले आहे.

जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी सेंद्रिय शेती, गांडूळ खत, जैविक खतांचा वापर, पीक फेरपालट आदी तंत्राचा अवलंब चौधरी करतात. त्यामुळे सेंद्रिय कर्ब, जमिनीतील उपयुक्त जीवाणूंची संख्या वाढून सुपीकता वाढल्याचा त्यांचा अनुभव आहे.

गांडूळखताचा वापर सेंद्रिय शेती करताना सर्वप्रथम त्यांनी शेणखताच्या वापरास सुरवात केली. सुरवातीला दोन गायी खरेदी केल्या. सध्या २ गाई, २ बैल व २ कालवडी आहेत. सर्व जनावरांपासून मिळणाऱ्या शेणापासून गांडूळ खत तयार केले जाते. शेतात भरपूर प्रमाणात गांडूळखताचा वापर केला जातो. त्यामुळे सध्या त्यांच्या शेतात थाेडीजरी माती उकरली तर गांडुळांचा वावर दिसतो. गांडूळे जमीन भुसभुशीत करतात. परिणामी, जमिनीचा पोत सुधारला तसेच सुपीकताही वाढली. उत्पादनातही वाढ झाली. गांडुळखताशिवाय त्यांनी जीवामृताचाही वापर सुरू केला. त्यासाठी गोमूत्र, डाळींचे पीठ, गूळ आदींचे पाण्यात मिश्रण करून ते कुजवून पाण्याद्वारे ते पिकांना दिले जाते. त्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असे त्यांच्या निदर्शनास आले. पेरणी करताना बियाण्यांबरोबर गांडूळ खताचीही पेरणी केली जाते.

पीकपद्धतीत बदल जमिनीचा पोत व सुपीकता सुधारण्या बरोबरीने त्यांनी वरच त्यांनी उत्पादकता वाढण्यासाठी पीकपद्धतीतही बदल केले. लागवड करताना नगदी पिके आणि चालू पिके अशी विभागणी केली. गहू, कपाशी  यांसारख्या पिकांना भाजीपाला व मोगरा या नगदी पिकांची जोड दिली. कपाशी व गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात पीक अवशेष मिळतात. ते रोटाव्हेटरच्या साह्याने बारीक करून जागेवरच कुजविले जातात. त्यामुळे जमिनीचा पोत व सुपीकता वाढते. नंतर त्या क्षेत्रावर भाजीपाला लागवड केली जाते. मोगरा पिकाचे क्षेत्र कायम एकच असले तरी दरवर्षी छाटणीनंतर पडणारा पालापाचोळा तेथेच पडल्यामुळे त्याचे सेेंद्रिय खतामध्ये रुपांतरण होते. सर्व पिकांच्या देशी बियाण्यांच्या वापरावर त्यांचा भर आहे.  

उपाययोजना :

  • शेताच्या चौफेर बांधबंदिस्ती केल्यामुळे पावसाच्या पाण्यामुळे सुपीक मातीचा वरील थर वाहून जात नाही.
  • देशीगाईचे शेण, गोमूत्र गोळा करण्यासाठी सिमेंटची टाकी केली आहे. त्यात शेणस्लरी बनविली जाते. जीवामृत व शेणस्लरी देण्यासाठी प्रत्येकी दोन एकर क्षेत्रासाठी सिमेंटच्या टाक्या केल्या आहेत. ज्याठिकाणी पाणी देण्याचा दांड आहे तेथेच टाक्यांची उभारणी केली आहे. पाणी देण्याच्यावेळी या टाक्यातून शेणस्लरी किंवा जीवामृत दिले जाते. ते पाण्याबरोबर सर्वत्र शेतात पसरते.  
  • दरवर्षी शेतात गाळ मिसळला जातो.
  • फॉस्फोकंपोस्ट, गांडुळखत, अॅझोटोबॅक्टर, रायझोबियम, पी. एस. बी. या जिवाणू संवर्धकांचा वापर केला जातो. त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढून जमीन भुसभुशीत झाली.
  • आंतरपीक पद्धतीचा अवलंब आणि पीक फेरपालटीवर भर.
  • पीक अवशेषांचा वापर चौधरी शेतात निर्माण होणारा काडीकचरा, पीक अवशेष जाळून टाकत नाही. उलट त्याचा आच्छादनासारखा वापर करतात. त्यामुळे तणांचा प्रादुर्भाव होत नाही. काडीकचरा व पीक अवश्‍ोषांच्या आच्छादनामुळे जमिनीतील उपयुक्त जिवाणूंची वाढ झाली आहे. जमिनीची सजीवता व सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अन्नद्रव्यांची पिकांना उपलब्धता वाढते. चौधरी यांनी बांधावर गिरीपुष्प या हिरवळीचे खत देणाऱ्या पिकाची लागवड केली आहे. त्याच्या पानांचे हिरवळीचे खत व आच्छादन या दोन्ही दृष्टिकोनातून वापर केला जातो.   

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com