टाकाऊ घटकांपासून दर्जेदार ‘व्हर्मीव्हॉशची’ निर्मिती

स्वविकसित तंत्राद्वारे पंचगव्य तयार करण्याची प्रक्रिया करताना जयकिसन शिंदे.
स्वविकसित तंत्राद्वारे पंचगव्य तयार करण्याची प्रक्रिया करताना जयकिसन शिंदे.

बुद्धीचा कल्पक व कार्यक्षम वापर करून जयकिसन शिंदें (वरूडी, जि. जालना) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने शुद्ध, गाळणी केलेले व्हर्मीव्हॉश अर्थात गांडूळखत पाणी तयार करण्याचे सुलभ तंत्र विकसित केले आहे. विशेष म्हणजे हे तंत्र तयार करण्यासाठी टाकाऊ वस्तूंचा उपयोग झाला असून त्यासाठी अत्यंत अल्प खर्च आला आहे. सेंद्रिय घटकांमधील आवश्यक घटक असलेले व्हर्मीव्हॉश शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांसाठी ते पुरेशा प्रमाणात आपण उपलब्ध करू असे शिंदे म्हणतात.   जालना जिल्ह्यातील वरूडी येथे जयकिसन शिंदे यांची सुमारे सव्वा तीन एकर शेती आहे. त्यात डाळिंब हे मुख्य पीक असून कांदा, मका ही दुय्यम पिके आहेत. सेंद्रिय पद्धतीच्या उत्पादनाला शेततळ्यातील मत्स्यपालनाची जोड त्यांनी दिली आहे. व्हर्मीव्हॉशची निर्मिती अलीकडील काळात सेंद्रिय घटकांचा वापर शेतीत वाढला आहे. त्यातूनच शिंदे यांनी गांडूळखतावर आधारित ‘व्हर्मीव्हॉश’ तयार करण्याचं स्वकल्पनेतील छोटे पण सुलभ तंत्र तयार केले. त्यासाठी टाकाऊ वस्तूंचा वापर केला. असे आहे हे सुलभ तंत्र लागणारे साहित्य

  • घरात पडून असलेला जवळपास १५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक कॅन
  • सलाईनची नळी
  • दोरीच्या साह्याने तयार केलेले शिंकाळे
  • सोळा लिटर क्षमतेचा माठ
  • ठिबकची नळी व सूक्ष्म ड्रीपर
  • तंत्राची रचना व जोडणी

  • छायाचित्रात दिसत असल्याप्रमाणे शेतातील चिकूच्या घनदाट सावली देणाऱ्या झाडावर प्लॅस्टिकची टाकी किंवा कॅन ठेवला आहे.
  • त्यातील पाणी माठापर्यंत पोहचविण्यासाठी सलाईनच्या नळीचा वापर केला आहे.
  • चिकूच्या झाडावरच कॅनपेक्षा कमी उंचीवर दुसऱ्या एका फांदीवर दोरीच्या साह्याने शिंकाळे तयार केले आहे. त्यात माठ ठेवला आहे.
  • माठाच्या तळाशी जवळपास अर्धा ते एक इंचाचे विटांचे तुकडे टाकले. त्यांवर विटांचेच अजून बारीक आकाराच्या तुकड्यांचा थर आहे. त्यावर वाळूच्या मोठे खड्यांचा थर, त्यावर बारीक रेतीचा थर, त्यावर बारीक सुती कापड, त्यावर मातीचा जवळपास चार इंचीचा थर व त्यावर शेणाचा थर आहे.
  • माठाच्या बुडाला १६ मिमी आकाराचे छिद्र पाडले आहे. त्यात ठिबकची नळी बसवली आहे.
  • रबरी वायसर व १६ मिनी आकाराचे टेकअप यांद्वारे माठ व नळी ही यंत्रणा ‘फीट’ केली आहे.
  • ठिबकच्या नळीला सूक्ष्म ड्रीपर्स बसवले आहेत.
  • असे तयार होते ‘व्हर्मीव्हॉश’

  • झाडावर ठेवलेल्या कॅनमधील पाणी सलाईन नळीच्या साह्याने माठात येते. तेथे वरच्या बाजूला असलेल्या शेणाच्या थरावर ते पडते. माठात सुमारे अर्धा किलो गांडूळ कल्चर सोडले जाते.
  • सुमारे बारा तासात किमान दोन ते अडीच लिटर म्हणजे चोवीस तासांत चार लिटरपेक्षा जास्त पाणी कॅनमधून माठात येणार नाही याची दक्षता घेतली जाते. त्यासाठी सलाईन नळीला लावलेला खटका पाणी पडण्याच्या वेगाला नियंत्रित करतो.
  • पाणी माठातील विविध थरांतून पाझरून बुडाशी जाते. त्यातून ते ठिबकच्या नळीद्वारे
  • थेंबाथेंबाने खाली येते. ते प्लॅस्टिक बॉटलमध्ये संकलित केले जाते.
  • शुद्ध, उत्तम क्वालिटीचे व्हर्मीव्हॉश त्यातून मिळते.
  • शिंदे यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • सन २०१५ मध्ये शिंदे यांनी औरंगाबाद येथील ‘वाल्मी’ संस्थेतून पाणी व्यवस्थापन विषयात प्रशिक्षण घेतले. त्यानंतर या विषयात काहीतरी करायचे त्यांनी ठरवले.
  • जालना येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शनही या तंत्र विकासात घेतले.
  • बारा तासांत किमान दोन ते अडीच लिटर व चोवीस तासांत चार लिटरपेक्षा जास्त पाणी झिरपणार नाही याची दक्षता घेतली.
  • बायोडायनॅमिक खताच्या कल्चरचीही निर्मिती
  • हवामानाचा अंदाज घेऊन शेतीचे नियोजन
  • शेततळ्यातील मत्स्यपालन गेल्या काही वर्षांपासून सुरू
  • गांडूळांची उपलब्धता व्हर्मीव्हॉश तयार करण्यासाठी सुरवातीला शिंदे यांनी जवळच्याच वाहेगाव येथील शेतकऱ्याकडून सुमारे अर्धा किलो गांडूळ कल्चर आणले. त्यांची उत्पत्ती सातत्याने होत असल्याने एका कचरा थरात ती सोडली जातात. व्हर्मीव्हॉशसाठी गांडूळे सहज उपलब्ध व्हावीत यासाठी बागेतील चिकूच्या झाडाखालीच खताच्या गोणीचे कापड अंथरले आहे. त्यावर जवळपास चार इंची मातीचा व त्यावर शेणाचा थर टाकला अाहे. त्यात गांडूळ सोडलेली अाहेत. त्यामध्ये सातत्याने ओलावा ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. तेथेही गांडूळाची उत्पत्ती झाल्यास शेतात ती सोडण्यात येतात. कल्पनेला कृतीची जोड दिली की अशक्‍यप्राय गोष्टही सहज शक्‍य होते. जयकिसन शिंदे यांनी टाकाऊ वस्तूंच्या उपयोगातून ‘व्हर्मीव्हाॅश’ तयार करणारे साधे सोपे तंत्र विकसित केले आहे. अन्य शेतकऱ्यांनाही ते तयार करणे सहज शक्‍य आहे. यातून सेंद्रिय घटकांचा वापर वाढून पिकांची गुणवत्ता वाढण्यासही मदत होईल. डॉ. एस. बी. पवार प्रमुख, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, औरंगाबाद   शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन मी दर्जेदार व्हर्मीव्हॉश तयार केले आहे. सध्या माझ्या शेतीत त्याचा वापर सुरू आहे. शेतकऱ्यांनी आपली मागणी कळवल्यास त्यानुसार उपलब्ध करणे शक्य आहे. जयकिसन शिंदे, ९५९५६१४०७०  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com