पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना

पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना
पीकबदल, आंतरपिकामुळे हवामान बदलाचा सामना

वाकोडीचे पद्माकर कोरडे यांची सहा एकर शेती. काही वर्षांपासून खरीप हंगामात पावसाची शाश्‍वतता खूपच कमी झाल्याने त्यांच्या तूर, मूग या पिकांना मोठा फटका बसत असे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी पीकबदल, आंतरपीक पद्धतीचा अवलंब व यांत्रिकीकरणावर भर देऊन शेतीतील नफा वाढविला. शेतीतील नियाेजनच्या बदलांबाबत ते स्वत:च सांगत आहेत.

मी अनेक वर्षे खरीप हंगामात तूर, मूग ही पिके घेत होतो. मात्र पावसाचा लहरीपणा, बाजारभावाची अनिश्‍चितता यामुळे ही पिके परवडेनात. ४ ते ४.५ एकर क्षेत्रावर मोसंबी बाग होती; पण बदलत्या हवामानाचा फटका बसून त्यातही किफायतशीर उत्पन्न मिळत नव्हते. अखेर मी शेतीपद्धतीत बदल केले.

पीक बदल तूर, मुगाचे उत्पन्न परवडत नसल्याने मी गेल्या दोन वर्षांपासून त्या क्षेत्रावर फ्लॉवर हे भाजीपाला पीक घेतले. त्याचे चांगले उत्पादन मिळाल्याने उत्पन्नात वाढ झाली.

वाणबदल गेल्या दोन वर्षांपासून खरिपासाठी राखीव दीड एकरासह मोसंबी बागेतही आंतरपीक म्हणून फ्लॉवर पीक घेत आहे. पहिल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या फ्लाॅवर पिकाचे साधारणपणे ४० टन उत्पादन मिळाले. मात्र यंदा वाढत्या तापमानाचा (४३ अंश सेल्सिअस) परिणाम होऊन गड्डे निर्मिती झाली नाही व उत्पादनात ५० टक्के घट झाली. मी टप्प्याटप्प्याने फ्लॉवर लागवड करतो; त्यामुळे पुढील टप्प्यात वाणबदल केला. त्यामुळे आता पुन्हा चांगले उत्पादन मिळत आहे.

आंतरपीक पद्धतीचा अवलंब सातत्यपूर्ण व शाश्‍वत उत्पन्नासाठी मी आंतरपीक पद्धतीवर भर दिला आहे. यंदा सप्टेंबर महिन्यात ५ x १६ फुट अंतरावर शेवगा (काही क्षेत्रात सीताफळ) लागवड केली; त्यात ८x३ फुट अंतरावर वांगी लागवड केली व उर्वरित पट्ट्यात फ्लॉवर लागवड केली. त्यामुळे रब्बी हंगामात फ्लॉवरचे उत्पादन मिळाले. फेब्रुवारी-मार्च महिन्यापासून शेवगा व वांगी पिकांचे उत्पादन अद्यापपर्यंत मिळत आहे. परिणामी वार्षिक उत्पन्नामध्ये घसघशीत वाढ झाली आहे.

यांत्रिकीकरण काही वर्षांपूर्वी मी बैलांच्या साहाय्याने शेतीतील कामे करीत होतो. त्यामुळे कामे वेळेवर होत नव्हती, तसेच मजुरीचा खर्चही वाढत होता. मात्र दोन वर्षांपासून ट्रॅक्टरचा वापर करून शेतीतील कामे करण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही वाचला असून वेळेवर कामे होत असल्याने उत्पादन व उत्पन्न वाढले आहे. स्वत:चा टेम्पोही घेतला असल्याने उत्पादित मालाची ताबडतोब विक्री करणे शक्य होते. त्यामुळेही आर्थिक फायदा वाढला आहे.

ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब दोन वर्षांपूर्वी पिकांना पाटपाणी देत होतो. त्यामुळे खरिपात जेव्हा पावसात मोठा खंड पडत होता; तेव्हा पाणी कमी पडत होते व उत्पादनाला त्याचा फटका बसत होता. मात्र आता ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला जात असून, त्यामुळे या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. तसेच ठिबक सिंचन संचाचा अवलंब केल्याने पिकांना विद्राव्य खतेही देता येत अाहेत. त्यामुळे पिकाच्या उत्पादनात व दर्जात वाढ होत आहे.

संपर्क : पद्माकर कोरडे, ९५६१७११२१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com