वसुंधरा करताहेत स्वच्छता अन् पर्यावरणाविषयी जागृती

नागरिकांना ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीबाबत माहिती देताना गटातील सदस्य.
नागरिकांना ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीबाबत माहिती देताना गटातील सदस्य.

"क्‍लीन टू ग्रीन" हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूर शहरातील साठ महिलांचा वसुंधरा गट गेल्या दोन वर्षांपासून पर्यावरण संवर्धन, परिसरात स्वच्छता आणि आरोग्याविषयी विविध उपक्रम राबवित आहे. केवळ उपदेश करण्यापेक्षा स्वत: प्रयोग करून इतरांमध्ये पर्यावरण, स्वच्छतेविषयक मार्गदर्शन करण्याचे काम हा गट करतो. ग्रामीण भागातील महिला बचत गटासोबतही विविध उपक्रम राबविण्याचा गटाचा प्रयत्न आहे.   पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने कोल्हापूर शहरातील साठ महिला एकत्र आल्या. महिलांमध्ये विचारांची देवाणघेवाण झाली. यातूनच स्वयंपाक घरामध्ये तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला महिलांनी सुरवात केली. तयार झालेले खत स्वतःची परसबाग तसेच फुलझाडांच्या कुंड्यांना वापरण्यास सुरवात झाली. काही महिलांनी परसबागेत हंगामनिहाय विविध भाजीपाला लागवडीला सुरवात केली. या मागचा एकच उद्देश होता की, घरातील ओला कचरा हा रस्त्यावरील कचराकुंडीत न जाता घरच्या घरी कंपोस्ट खत करून जिरवायचा. यामुळे कचरा आणि प्रदूषणाच्या समस्येवर काही प्रमाणात मात करणे शक्य झाले आणि फुकटामध्ये कंपोस्ट खतही घरीच तयार झाले.

वसुंधरा गटाच्या उपक्रमांना सुरवात ः वसुंधरा गटाच्या सदस्या संगीता कोकीतकर म्हणाल्या की, कोल्हापूर शहरामध्ये रमेश शहा यांनी पर्यावरणपूरक उपक्रमाची सुरवात केली. या उपक्रमामध्ये वसुंधरा गटामधील सदस्या सामील झाल्या. उपक्रमासाठी देविका दाबके, तृप्ती देशपांडे, जयश्री कजारिया, मृणालिनी डावजेकर आदींची साथ मिळाली. पुढील टप्प्यात विविध परिसरातील नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि कचरा समस्या सोडविण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेतला. शहरी भागात महिलांच्या प्रश्‍नांसाठी एकत्रितपणे काम करणारे महिलांचे गट आपण पाहातो. परंतू वसुंधरा गटाचे वैशिष्ट वेगळे आहे. प्रत्येक महिन्याला एका सदस्याच्या घरी गटाची बैठक होते. या बैठकीत बागेमधील फळझाडे, शोभेची झाडे, भाजीपाला, लागवडीबाबतीत येणाऱ्या अडचणीवर चर्चा होते. प्रत्येक सदस्य आपले अनुभव, आपल्या अडचणी तसेच आपण केलेला वेगळा प्रयोगाची माहिती या बैठकीत सांगतो. एकमेकांच्या अनुभवाच्या आधारे झाड वाढीच्या प्रत्येक टप्प्यांचे मार्गदर्शन केले जाते. घरातील भाजीपाला, झाडांच्या काड्या, बियाणांची देवाण घेवाण केली जाते.

कंपोस्ट खत निर्मिती ही अट ः वसुंधरा गटाचा सदस्य व्हायचे असेल तर संबंधित महिलेला बागकामाची आवड हवी. त्यांच्या घरी कुंड्या असाव्यात, गटाच्या बैठकीस किमान साठ टक्के हजेरी असावी तसेच सदस्य झाल्यावर त्याने तातडीने स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीला सुरवात करावी, अशी अट आहे. मात्र सदस्य होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.

पर्यावरण संवर्धन, जलपुनर्भरणाची जागृती ः ज्यांचा घरी पुरेशी जागा आहे तेथे गटातील सदस्यांनी परसबाग, टेरेस गार्डन तसेच कुंड्यातून फुलझाडे, भाजीपाल्याची लागवड केली आहे. यासाठी घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार केलेल्या कंपोस्ट खताचा वापर केला जातो. गटातील महिला सेंद्रिय खते, कीडनाशकांचा वापर करतात. महिला गटातील सदस्यांनी पावसाचे पाणी जमिनीत तसेच कूपनलिकेत मुरविण्यास सुरवात केली आहे. तसेच परिसरातील नागरिकांनाही भूजल पुनर्भरणाबाबत माहिती दिली जाते. याचबरोबरीने प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी, स्वयंपाकघरातील ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि प्रसारावर महिलांनी भर दिला आहे. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कमीत कमी कचरा घराबाहेर जावा यासाठी गटातील सदस्या प्रयत्नशील आहेत.

सोशल मीडियाचा प्रभावी वापर ः संवादासाठी गटाचा व्हॉटसॲप ग्रुप आहे. यावर विविध उपक्रमांचे फोटो, प्रयोगाचे अनुभव आणि येत्या काळातील उपक्रमांची माहिती दिली जाते. नवीन सदस्यांना कंपोस्ट खत निर्मिती, बागकामाविषयी मार्गदर्शन केले जाते.   प्रशिक्षण वर्गाचे आयोजन ः गटातील बऱ्याच सदस्यांनी बागकाम प्रशिक्षण वर्ग पूर्ण केले आहे. यामध्ये अभ्यासलेल्या तंत्राचा प्रत्यक्ष वापर या महिला स्वतःच्या बागेमध्ये करतात. कोल्हापुरातील शाळा, निवासी सोसायटी, तरुण मंडळ, भिशी मंडळ तसेच महिला मंडळामध्ये जाऊन गटातील सदस्या ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीचे प्रशिक्षण देतात. शहराच्या विविध भागांमध्ये कार्यशाळांचे आयोजन करून नागरिकांशी संवाद साधला जातो. वसुंधरा गटाच्या प्रयत्नातून अनेक शाळांमध्ये पर्यावरणविषयक उपक्रमांना सुरवात झाली आहे. गटाच्या प्रयत्नांना दाद म्हणून एका शाळेने कंपोस्ट खत तयार करण्याचे प्रात्यक्षिक मुलांना दिले आहे. तसेच कार्यानुभव उपक्रमांतर्गत कंपोस्ट खत निर्मिती उपक्रमासाठी काही गूण या मुलांना दिले जातात. केवळ जागृती न करता पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी महिला सदस्या आग्रही आहेत. गणेशोत्सवाच्या काळात इको फ्रेंडली सजावटीचे प्रात्यक्षिक घेतले जाते. ताज्या फुलांचा वापर करून गणपतीची आरास कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले जाते. आरास आणि पूजेतील फुलांच्यापासून कंपोस्ट खत तयार करून फुलझाडे, फळझाडांसाठी वापर करण्यावर महिलांचा भर आहे. फळे, भाजीपाल्यांनी फुलल्या परसबागा ः गटाच्या विविध उपक्रमातून प्रशिक्षण घेऊन वीस महिलांनी घराजवळ, बंगल्याच्या टेरेसवर कुंड्या तसेच वाफे करून हंगामनिहाय भाजीपाला लागवडीस सुरवात केली आहे. स्वयंपाक घरातील ओल्या कचऱ्यापासून तयार झालेल्या कंपोस्ट खताचा वापर भाजीपाला, फळझाडांना केला जातो. या सदस्यांना काही प्रमाणात घरच्या घरी विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध होऊ लागला आहे. भाजीपाला पिकांचे सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे त्यांची गुणवत्ता आणि चवही चांगली आहे. कोल्हापूर शहरातील उच्चशिक्षित, नोकरदार महिलाही वेळात वेळ काढून घरातील बागेसाठी वेळ देत असल्याने या गटाचा उद्देश सफल होत असल्याचे समाधान सदस्यांच्या चेहऱ्यावर आहे. वसुंधरा ग्रुपचे उपक्रम

  • शाळा, महाविद्यालये, निवासी सोसायट्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती.
  • ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत निर्मितीबाबत प्रशिक्षण.
  • परसबागेसंबंधी मार्गदर्शन, सेंद्रिय पद्धतीने उत्पादनाबाबत जागृती.
  • गावांतील महिला बचत गटाबरोबरीने उपक्रम. गटांची प्रक्रिया उत्पादने, सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी मदतीचे नियोजन.
  • देशी बियाण्यांची बीज बॅंक उभारणी आणि देशी जातींचा प्रसार.
  • युवक मंडळ, महिला मंडळांच्या माध्यमातून पावसाळ्यात देशी वृक्ष लागवडीचा प्रसार.
  • संपर्क ः संगीता कोकीतकर, ८८०५५७५७००

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com