थेट विक्रीतूनच शोधली पर्यायी बाजारपेठ

शेतमालाचे दर घसरले की शेतकरी तोट्यात जातो. यंदा कलिंगडाबाबत असेच घडले. अनेक व्यापाऱ्यांनी किलोला केवळ चार रुपये दर देऊ केला. अशावेळी शेतकरी स्वतःच व्यापारी झाले. त्यांनी आपल्या दर्जेदार मालाचा दर स्वतःच ठरवला. थेट ग्राहकांना विक्री करीत व्यापाऱ्यांपेक्षा किलोला किमान चार रुपये किंबहुना त्याहून दर मिळवीत चांगली कमाईही केली.
अभिषेक इंगोले नागपूर येथील धान्य महोत्सवात कलिंगडाची ग्राहकांना विक्री करताना.
अभिषेक इंगोले नागपूर येथील धान्य महोत्सवात कलिंगडाची ग्राहकांना विक्री करताना.

शेतमालाचे दर घसरले की शेतकरी तोट्यात जातो. यंदा कलिंगडाबाबत असेच घडले. अनेक व्यापाऱ्यांनी किलोला केवळ चार रुपये दर देऊ केला. अशावेळी शेतकरी स्वतःच व्यापारी झाले. त्यांनी आपल्या दर्जेदार मालाचा दर स्वतःच ठरवला. थेट ग्राहकांना विक्री करीत व्यापाऱ्यांपेक्षा किलोला किमान चार रुपये किंबहुना त्याहून दर मिळवीत चांगली कमाईही केली. स्वतः पिकवलेल्या मालाची थेट विक्री हा फायदेशीर शेतीचा हुकमी पर्याय असल्याचे त्यांनी सिद्ध केले. यंदाच्या हंगामात विदर्भात कलिंगड (टरबूज) लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली. परिणामी बाजारात आवक वाढली. शेतकऱ्यांना अवघ्या चार ते पाच रुपये प्रति किलो दराने व्यापाऱ्यांना टरबूज विकावे लागले. खर्चाची भरपाईदेखील त्यातून होणे शक्य नव्हते. काही हिम्मतवान शेतकरी मात्र या घसरलेल्या दरापुढे डगमगले नाहीत. त्यांनी थेट ग्राहकांना विक्री करून आपली बाजारपेठ तयार केली. त्यातून दरांतील तफावत भरून काढत फायदाही चांगला मिळवला. अभिषेक इंगोले यांचा सुखद अनुभव यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्‍याअंतर्गंत येणाऱ्या पिंप्री दुर्ग येथे अभिषेक इंगोले यांची शेती आहे. मागील वर्षापर्यंत त्यांची संयुक्त शेती होती. यंदा विभागणीनंतर वाट्याला २५ एकर शेती आली. आता शेतीची सूत्रे त्यांनी आपल्याकडे घेतली आहेत. अभिषेक यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.  काकांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक यांनी शेतीचे धडे गिरविले आहेत. यंदा त्यांनी स्वअनुभवावर पहिल्यांदाच पावणेदोन एकरांवर कलिंगड लागवड केली. वडील, काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यात उत्पादन तर चांगले म्हणजे ४७ टन मिळाले. मात्र कलिंगडाचे दर घसरलेले होते. व्यापारी पंचक्रोशीत किलोला चार ते सहा रुपये दर देऊ करीत होते. ते परडवण्यासारखे नव्हते. साधली थेट विक्री हंगामाच्या सुरवातीला अमरावती बाजारात आवक कमी असल्याने दहा ते साडेदहा रुपये प्रति किलोचा दर मिळाला. अमरावती बाजारात या दराने साडेसात ते आठ टन मालाची विक्री झाली. त्यानंतर मात्र सगळीकडून आवक होत असल्याने व्यापाऱ्यांकडून अवघा चार ते पाच रुपये दर मिळू लागला. उत्पादकता खर्चाची भरपाईदेखील यातून शक्‍य नव्हती. अशावेळी विक्रीच्या वेगळ्या पर्यायाचा विचार सुरू केला. त्यानुसार अभिषेक यांनी यवतमाळ येथे बळिराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भरणाऱ्या आठवडी बाजारात थेट विक्री सुरू केली. या वेळी १५ ते २० रुपये प्रति किलो दर मिळू लागला.

धान्य महोत्सवाचाही घेतला फायदा नागपूर येथे २१ ते २५ एप्रिल या कालावधीत धान्य महोत्सव भरविण्यात आला. त्याविषयी व्हॉट्‌स अॅपच्या माध्यमातून कळाल्यानंतर अभिषेक यांनी कृषी विभागाच्या आत्मा यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नागपूर येथे तीन टन कलिंगडे त्यांनी आणली. त्यातील एक टन महोत्सवात विकली. चर उर्वरित व्यापाऱ्यांना दिली. थेट विक्रीसाठीही १५ ते २० रुपये असाच दर मिळाला. विविध ठिकाणी मिळून एकूण सात ते आठ टन मालाची विक्री थेट करण्यात अभिषेक यशस्वी झाले. डाळिंबाचाही अनुभव मागील वर्षीही संयुक्त शेती होती त्या वेळी डाळिंबाचीही चार ते पाच क्विंटल या प्रमाणात थेट विक्री केली होती. ज्या वेळी व्यापारी किलोला ३० ते ४० रुपये दर देत होते, त्या वेळी थेट विक्रीमुळे हाच दर ६० रुपये मिळवणे शक्य झाल्याचे अभिषेक सांगतात.    किलोला आठ ते साडेआठ रुपये दर प्रभाकर खुरद यांची भोसा (ता. मेहकर) शिवारात शेती आहे. मेहकरपासून सुमारे २२ किलोमीटरवर त्यांची शेती आहे. यंदा दोन एकरांत एकरी १५ टनांप्रमाणे उत्पादन   त्यांना मिळाले.  त्यांनीही मेहकर जुने बसस्थानक मार्गावर थेट विक्रीचा स्टॉल उभारला. साधारण सहा दिवंसात १२  टन मालाची थेट विक्री त्यांनी दहा रुपये प्रति किलो दराप्रमाणे साधली. वाहतूक, मजुरी खर्च पकडून त्यांना हा  दर आठ ते साडेआठ रुपयांप्रमाणे मिळाला. व्यापाऱ्यांनी  हाच दर चार ते सहा रुपये देऊ केला होता.

अशोक गायकवाड यांचाही आश्वासक अनुभव गदरखेड (ता. मेहकर, जि. बुलडाणा) येथील अशोक व अमोल या गायकवाड पितापुत्रांनी यावर्षी पहिल्यांदाच कलिंगड लागवड केली. त्यांनीही थेट विक्रीचाच अनुभव घेतला.  त्यांचे एक एकर क्षेत्र होते. त्यात सुमारे १८ टन उत्पादन मिळाले. दोन किलो वजनापेक्षा अधिकचे  फळ असल्यास सहा रुपये व त्यापेक्षा कमी वजनाच्या फळाला चार रुपये प्रति किलो दर देण्याची तयारी व्यापाऱ्यांनी चालविली. अशावेळी थेट विक्रीचा पर्याय समोर आला. कृषी सहाय्यक विठ्ठल धांडे यांनी त्यासाठी सहकार्य केले. मेहकर येथील गणराज ॲग्रो व जुने बसस्थानक अशा दोन ठिकाणी स्टॉल उभारण्यात आला. थेट विक्री दहा रुपये प्रति किलो दराने केली.एका दिवशी २५ ते ३०  क्‍विंटल मालाची विक्री अवघ्या दीड तासात झाल्याचे अमोल म्हणाले.

विक्री झाली फायद्याची व्यापाऱ्यांकडून मिळणाऱ्या दराच्या तुलनेत थेट विक्रीचा दर दीडपट ते दुप्पट होता. त्यातून पावणेदोन एकर क्षेत्रात सुमारे पावणेदोन लाख रुपये निव्वळ नफा मिळाल्याचे अभिषेक सांगतात.  यात उत्पादन व अन्य खर्च हा सुमारे ९० हजार रुपये वेगळा आहे. ते म्हणाले की, ज्या वेळी बाजारात शेतमालाचे दर घसरतात, त्या वेळी थेट विक्री हा त्यावर चांगला पर्याय असू शकतो. आमच्या परिसरात यंदा अन्य शेतकऱ्यांना ५० हजार रुपये कसेबसे उत्पन्न मिळाले, त्या तुलनेत मला मिळालेले उत्पादन निश्चितच आश्वासक आहे

प्रतिक्रिया : आम्ही थेट विक्री सुरू केल्यानंतर ज्या व्यापाऱ्यांनी अत्यंत कमी दर देऊ केला होता ते पुन्हा दर अजून वाढवून देण्याची चर्चा करू लागले होते. - प्रभाकर खुरद

संपर्क : अभिषेक इंगोले, ७३७८४३३९०१,  अमोल गायकवाड, ९४०५८१८४४४,  प्रभाकर खुरद, ९०४९७१४२९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com