भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदल

भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदल
भविष्याचा वेध घेत शेतीत करतोय बदल

अकोला जिल्ह्यातील चितलवाडी येथील प्रयोगशील शेतकरी विजय इंगळे आपले शेती व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करतात. भविष्यातील शेतीचा वेध घेत त्यांनी स्वतःमध्ये व शेतीत सकारात्मक बदल घडवले आहेत.

चितलवाडी (जि. अकोला) येथे माझी शेती असून यंदा खरीप हंगामात व एकूणच शेतीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे व्यवस्थापन करणार आहे.

  • या वर्षात कापूस उत्पादक गुलाबी बोंडअळीच्या त्रासाला सामोरे जाण्याची शक्यता अाहे. कारण मागील वर्षी तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी व जिनिंग मालकांनी समाधानकारक उपाययोजना करण्याची गरज होती. त्यामुळे यावर्षीही ही कीड मोठी समस्या राहणार असे वाटते. दुसरी समस्या म्हणजे बागायतदार शेतकऱ्यांसाठी पाण्याची असेल. बागायती क्षेत्रातील बहुतांश पाणीसाठा संपल्यात जमा अाहे. त्यामुळे मॉन्सूनपूर्वच्या पिकांची पेरणी होण्याची शक्यता धूसर बनली अाहे. जर चांगला पावसाळा झाला नाही तर पुनर्भरणही होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या हंगामातील सर्वच पिकांवर त्याचे अनिष्ट परिणाम दिसू शकतात.
  • यावर्षी समस्यांना सामोरे जाण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे मी ठरवले अाहे. कपाशीच्या संबंधित कामगंध सापळा खूप कमी खर्चाचा अाणि पक्का उपाय ठरू शकतो. राहिला प्रश्न पाण्याचा. पण ‘देव अाला द्यायला, अन पदर नाही घ्यायला’ असे व्हायला नको. त्यासाठी पाणी अडवण्याची, जिरवण्याची सामूहिक चळवळ अाम्ही गावकऱ्यांनी उभारली. लोकसहभागातून निधी उभारला. श्रमदान, शासन, काही सामाजिक संस्था यामाध्यमातून गावच्या गरजेपेक्षा जास्त पाणीसाठा जिरविला आहे. त्याचा लाभ होईल.
  • मी साधारण एप्रिल महिन्यात पीक नियोजन करतो. शेत तयार करणे, शेणखत टाकणे, मागील वर्षीचा अाढावा घेऊन कोणते पीक घ्यावे, त्याला दर कसे राहतील, खर्च किती होईल, हवामान कसे राहील त्या अंदाजावर नियोजन ठरवित असतो. खर्च कमी करून नफा वाढविण्याचे नेहमीच नियोजन असते. परंतु बरेचसे नियोजन वेळेवर अाणि समयसूचकतेने करावे लागते.  
  • खऱ्या अर्थाने शेतीत अाज खूप बदल करण्याची गरज अाहे. मुख्य बदल हा यांत्रिकीकरणातून साधावा लागेल. यांत्रिक पद्धतीने पेरणी करावी लागेल. कमी पाण्यात येणारी मात्र नफा देणारी पिके निवडणार आहे. केळीपेक्षा कमी पाणी लागणारे हळद हे पिकही निवडले अाहे. दहा एकरांवर लिंबू, संत्रा, मोसंबी अशी पिके घेणार आहे.
  • मजुरीची गंभीर समस्या आहे. त्यामुळे ५० टक्के क्षेत्रावर मजुरांची गरज कमी लागेल असे नियोजन करणार आहे किंवा वर्षातून फार तर दोन वेळाच त्यांची गरज भासेल असा बदल करायचे ठरवले अाहे.
  • खते, कीडनाशके यांचा वापर शक्यतो जमीन, पर्यावरण, मानवी अारोग्य बाधित होणार नाही असाच करणार आहे. गेल्या १८ वर्षांपासून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतो. चांगल्या अनुभवी कंपनीचे वा शासकीय बियाणेच वापरतो.
  • बदल ही काळाची गरज अाहे. अशा नियोजनाचे सकारात्मक परिणाम मिळतील अशी मला अाशा अाहे.
  • संपर्क : विजय इंगळे, ९६०४०५६९४४

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com