`ब्रॅँडनेम’ने गूळ, काकवीची विक्री

कुटुंबातील सदस्य गुळाच्या ढेपा आणि पॅकिंग करतात.
कुटुंबातील सदस्य गुळाच्या ढेपा आणि पॅकिंग करतात.

नागरगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथील भरत नलगे यांनी बाजारपेठेची गरज ओळखून रसायनविरहित गूळ आणि काकवी उत्पादनाला सुरवात केली. चांगल्या गुणवत्तेमुळे ग्राहक थेट गुऱ्हाळावरूनच गुळाची खरेदी करतात. बाजारपेठेत स्वतःच्या उत्पादनाचे वेगळेपण जपण्यासाठी नलगे यांनी ‘चैतन्य गूळ` हा ब्रॅंड तयार केला. शेतमाल विक्रीसाठीही ब्रॅंडचा फायदा होत आहे.

शिरूर (जि. पुणे) तालुक्याच्या दक्षिणेकडील सातारा-शिरूर रस्त्यावर नागरगाव साधारणपणे चार ते पाच हजार लोकसंख्येचे गाव. भीमा नदीकाठी असलेले हे गाव ऊस बागायतीसाठी प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षापासून येथील शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून  उसाचे चांगले उत्पादन घेतात. याच गावातील कांतिलाल किसन नलगे हे प्रयोगशील शेतकरी. कुटुंबाच्या साथीने त्यांनी ऊस शेती आणि गुऱ्हाळाचे चांगले नियोजन ठेवले आहे. नलगे कुटुंबीयांची एकूण सहा एकर शेती. पूर्वी या क्षेत्रामध्ये भाजीपाला, केळी, गहू, चवळी, टरबूज आणि दोन एकर क्षेत्रावर उसाची लागवड असायची. नलगे १९९९ च्या अगोदर ऊस आणि इतर पिकांसाठी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर करत होते. मात्र जमिनीची ढासळणारी प्रत लक्षात घेऊन त्यांनी सुपीकता जपण्यासाठी नैसर्गिक शेती पद्धतीने ऊस व्यवस्थापन सुरू केले. हळूहळू जमिनीची सुपीकता सुधारू लागली, ऊस व्यवस्थापनाचा खर्च कमी होऊ लागला. परिसरातील शेतकरी नलगे यांच्याकडे पीक व्यवस्थापनाची माहिती घेण्यासाठी येऊ लागले. कांतिलाल नलगे यांना लक्ष्मण आणि भरत ही दोन मुले. दोघेही सुशिक्षित आहेत. लक्ष्मण एका कंपनीत नोकरी करतात. गरजेनुसार शेती नियोजनात मदत करतात. भरत हे पूर्ण वेळ शेती व्यवस्थापन बघतात.

पट्टा पद्धतीने ऊस लागवड : जमिनीची सुपीकता जपणे आणि निविष्ठांवरील खर्च कमी करण्यासाठी भरत नलगे यांनी नैसर्गिक शेती पद्धतीने ऊस पिकाचे व्यवस्थापन सुरू केले. याबाबत ते म्हणाले की, सन १९९९ पासून नैसर्गिक पद्धतीने सहा एकरांवर नियोजन करीत आहे. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जीवामृत, शेणखताचा वापर सुरू केला. ऊस लागवड करताना आठ फूट आणि दहा फूट पद्धतीचा पट्टा ठेवतो. तीन एकरांवर लागण आणि तीन एकर खोडवा पीक असते. खोडव्याची आठ पिके घेतो. को-८६०३२ जातीची लागवड जुलैमध्ये करतो. मधील पट्ट्यामध्ये चवळी, मेथी, कांदा या पिकांची लागवड असते. खोडवा पिकात पाचटाचे आच्छादन करतो. तसेच काही पट्ट्यांत चवळी, मेथीची लागवड असते. खोडवा काढणीनंतर चवळी, कांदा पिकांची फेरपालट म्हणून लागवड करतो. उसाला दर पंधरा दिवसांनी पाटपाण्यासोबत जीवामृत दिले जाते. जीवामृत, पाचट आच्छादन आणि पीक फेरपालटीच्या पिकांमुळे जमिनीतील सेंद्रिय घटकांमुळे सुपीकता वाढली आहे. पूर्वी एकरी ४० टन ऊस उत्पादन मिळायचे. आता साठ टनांपर्यंत उत्पादन गेले आहे. खोडव्याचे एकरी पन्नास टन उत्पादन मिळते. कांदा आणि चवळीच्या आंतरपिकातून ऊस पिकाचा व्यवस्थापन खर्च काही प्रमाणात निघतो. कांद्याची बाजारपेठेत विक्री केली जाते. चवळी बियाणे म्हणून परिसरातील शेतकऱ्यांना विकली जाते. साखर कारखान्याला ऊस देण्यापेक्षा बाजारपेठेत रसायनविरहित गुळाची मागणी लक्षात घेऊन गुऱ्हाळ सुरू केले. गुऱ्हाळातून आर्थिक नफा वाढला आहे. गुऱ्हाळ नियोजन

  • रसायनविरहित गूळ निर्मितीला २०१२ मध्ये सुरवात. शेताजवळ गुऱ्हाळाची उभारणी.
  • गूळ उत्पादनासाठी सहा एकरांवर ऊस लागवडीचे नियोजन. उसाचे नैसर्गिक शेती पद्धतीने व्यवस्थापन. रासायनिक खतांचा वापर नाही.
  • डिसेंबर-जानेवारीमध्ये गुऱ्हाळ सुरू राहते. गूळ निर्मितीमध्ये घरातील सर्व सदस्यांचा सहभाग.
  • गूळ निर्मिती प्रक्रिया

  • एका काहिल : सव्वा टन उसापासून ६०० लिटर रस निर्मिती. रस काहिलीत योग्य तापमानास उकळला जातो.
  • रसातील मळी काढण्यासाठी कोणतेही रसायन न वापरता भेंडी झाडाचा चोथा किंवा रसाचा वापर.
  • एका काहिलीपासून १५० किलो गूळ निर्मिती.
  • एका हंगामात १२० टन उसाचे गाळप.  सरासरी १० टन गूळ आणि २ टन काकवीची निर्मिती.
  • गुळाची अर्धा आणि एक किलोची ढेप, पाऊचमध्ये काकवीचे पॅकिंग.
  • चैतन्य गूळ` ब्रॅंडने विक्री

  • सातारा-शिरूर रस्त्यावर शेताच्या जवळ स्टॉल उभारून ‘चैतन्य गूळ` या ब्रॅँडने ग्राहकांना थेट विक्री.
  • सुरवातीला ग्राहकांचा प्रतिसाद कमी, परंतु हळूहळू गुळाची गुणवत्ता, चव, स्वच्छता आदी गोष्टींमुळे ग्राहकांकडून जागेवर खरेदी.
  • गुऱ्हाळावर सर्व गूळ, काकवी संपते. पुणे येथील  एका मॉलमध्ये गूळ, काकवीची विक्री.
  • दरवर्षी दहा टन गूळ आणि दोन टन काकवीची विक्री. गुळाची जागेवर प्रति किलो १०० रुपये, उर्वरित ठिकाणी १२० रुपये दराने विक्री. ७५० ग्रॅम काकवीचे पाऊच १०० रुपये.
  • ऊस पीक व्यवस्थापन, गुऱ्हाळाचा खर्च वजा जाता वर्षाला चार लाखांचा नफा.
  • संपर्क : भरत नलगे, ९४०५८३८९५१

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com