प्रक्रिया उद्योगातून उभारली नवी बाजारपेठ

हळद कंद स्वच्छ करणारी यंत्रणा
हळद कंद स्वच्छ करणारी यंत्रणा

वांगी (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील शेळके यांनी परिसरातील हळद, भाजीपाल्याची उपलब्धता आणि बाजारपेठेत असलेली मागणी लक्षात घेऊन प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. या उद्योगामुळे परिसरातील शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला, तसेच नवीन हळदीची नवीन बाजारपेठही तयार होत आहे.

मराठवाडा विभागातील पिकांचा अभ्यास आणि बाजारपेठेची गरज लक्षात घेऊन वांगी (ता. सिल्लोड, जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी सुशील शेळके यांनी दोन वर्षांपूर्वी हळद प्रक्रिया उद्योगास सुरवात केली. सुशील हे जैवतंत्रज्ञान विषयातील पदवीधर. त्यानंतर त्यांनी कृषी व्यापार व्यवस्थापनातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदवीनंतर औरंगाबाद येथील एका नामांकित कंपनीत आठ वर्षे व्यवस्थापक पदावर नोकरी केली. परंतु घरच्या वडिलोपार्जित वीस एकर शेतीतील आंबा, डाळिंब, हळद पिकांचे व्यवस्थापन आणि स्वतःचा उद्योग उभारणीच्या स्वप्नामुळे त्यांनी नोकरी सोडली. याच दरम्यान त्यांनी सिल्लोड, फुलंब्री, कन्नड या तालुक्यांतील हळद पिकाचा अभ्यास केला. या भागात सेलम, कड्डाप्प्पा आणि कृष्णगिरी या हळदीचे वाढते क्षेत्र आणि बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन त्यांनी २०१४ साली हळद प्रक्रिया उद्योगाची सुरवात  केली.

हळद प्रक्रिया उद्योगाला सुरवात प्रक्रिया उद्योगाबाबत सुशील शेळके म्हणाले की, मी औरंगाबाद-जळगाव महामार्गालगत बिल्डा मठपाटी येथे हळद प्रक्रिया उद्योगाची उभारणी केली. प्रकल्पाला अलाहाबाद बँकेचे अर्थसाह्य मिळाले. प्रकल्प सुरू करण्यापूर्वी कृषी विभागाची योजना तसेच अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या हळद प्रक्रिया तंत्राचा अभ्यास केला. पहिली दोन वर्षे पारंपरिक पद्धतीने हळदीवर प्रक्रिया केली. त्यानंतर मात्र आधुनिक यंत्रणा बसवली. त्यामुळे प्रक्रियेतील वेळ वाचला, गुणवत्तापूर्ण हळद पावडर तयार होऊ लागली. मी परिसरातील शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क करून प्रक्रियेसाठी हळदीचे कंद गोळा करण्यास सुरवात केली. सन २०१७ मध्ये तीस शेतकऱ्यांच्याकडून १०० टन हळद खरेदी करून सुकविलेले काप आणि पावडरीची निर्मिती केली. या शेतकऱ्यांना बाजारपेठेतील दरानुसार प्रति क्विंटल ९०० ते ११०० रुपये दर दिला. यंदाच्या वर्षी ३०० टन हळद खरेदी करण्याचे उद्दीष्ट आहे. परिसरातील दहा तरुणांना माझ्या प्रक्रिया उद्योगामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.

अशी आहे प्रक्रिया यंत्रणा

  • वॉशर : यंत्रणेमध्ये हळदीचे कंद धुतले जातात. यंत्रामधील ब्रशच्या सहाय्याने कंदावरील माती स्वच्छ केली जाते.
  • कटर :  धुतलेल्या कंदाचे ५ मि.मि. ते ८ मि.मि. काप केले जातात.
  • रिॲक्टर : कनव्हेअर बेल्डच्या सहाय्याने रिॲक्टरमध्ये हळद कंदाचे काप आणले जातात. याठिकाणी ६५ अंश सेल्सिअस तापमानाला काप शिजवले जातात. एकावेळी अडीच टन कापावर प्रक्रिया होते.
  • तेल काढणी युनिट : या ठिकाणी शिजवलेल्या कापातून तेल वेगळे केले जाते. सरासरी एक क्विंटल कापातून एक लिटर तेल मिळते. सध्या तेल उत्पादनाचे प्रयोग सुरू आहेत.
  • ड्रायर : कॅबिनेट ड्रायरमध्ये ६५ ते ७० अंश सेल्सिअस तापमानाला दहा तास काप वाळविले जातात. एकावेळी एक टन काप वाळविण्याची क्षमता आहे.
  • पल्व्हरायझर : वाळलेले कापापासून पावडर तयार केली जाते. एका तासात १०० किलो पावडर तयार होते.
  • पॅकिंग यंत्रणा : या ठिकाणी ३० किलो तसेच २०० ग्रॅम,५०० ग्रॅम पाऊच पॅकिंग केले जाते.
  • रिॲक्टर ते पावडर या प्रक्रियेला पंधरा तास लागतात.
  • पावडर तसेच हळद कंदाचे वाळलेले काप कुरकुमीन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विक्री. सेलम जातीच्या वाललेल्या कापामध्ये ४.८८ टक्के कुरकुमीन.
  • प्रकल्पातील यंत्रणेसाठी ८० लाखांचा खर्च. एकूण प्रकल्पाचा खर्च एक कोटी २० लाख. सात वर्षात कर्जफेडीचे नियोजन.
  • ‘शिवनेरी मसाले ब्रॅन्ड`ने उत्पादनांची विक्री सुशील शेळके यांनी प्रक्रिया प्रकल्पाला एस फोर फुड्स हे नाव दिले आहे. या प्रक्रिया उद्योगाचा परवानादेखील काढला आहे.  हळद पावडरीची विक्री ‘शिवनेरी मसाले` या ब्रॅन्डने विक्री केली जाते. पहिल्या टप्यात औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यांत वितरण साखळी उभारली आहे. तसेच औरंगाबाद शहर आणि प्रकल्पाच्या ठिकाणी विक्री केंद्र आहे.  गेल्यावर्षी २० टन सुकविलेले हळदीचे काप आणि एक टन हळद पावडरीची विक्री केली. फेब्रुवारी ते जून या कालावधीत हळदीवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर जुलै ते डिसेंबर या कालावधीत परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून कोबी, बीट, गाजर, कडीपत्ता, कोथिंबीर, मेथीची खरेदी केली जाते. त्यापासून डिहायड्रेटेड भाजीपाला तयार करून हॉटेल व्यावसायिकांना विकला जातो. त्यामुळे वर्षभर प्रकल्प कार्यरत रहातो. सेंद्रिय पद्धतीने हळद उत्पादन करणाऱ्या शेतकरी गटाने प्रक्रियेसाठी संपर्क केला आहे.

  • वाळविलेले हळद कंदाचे काप : ९२ ते १३० रुपये प्रति किलो.
  • हळद पावडर : २८० रुपये प्रति किलो.
  • डिहायड्रेटेड भाजीपाला :  १२० ते २४० रुपये प्रति किलो
  • फळबागेतील आंबा, डाळिंबाची स्टॉलवरून थेट ग्राहकांना विक्री.
  • संपर्क : सुशील शेळके ८०८७१४६६५४ (लेख विभागीय माहिती कार्यालय, औरंगाबाद येथे कार्यरत आहेत)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com