मत्स्यपालनातून कमावले राष्ट्रीयस्तरावर नाव

दर्जेदार मत्त्योत्पादनात उच्च कामगिरी करणारे हसन म्हसलई
दर्जेदार मत्त्योत्पादनात उच्च कामगिरी करणारे हसन म्हसलई

निसर्गाच्या कुशीत कुंडलिका नदीच्या काठावर सुमारे हजार लोकसंख्या असलेले गोवे हे छोटेसे गाव रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्‍यात येते. येथील हसन म्हसलई यांची अोळख आता जिल्ह्यापुरती राहिलेली नाही. खाण्याचे व शोभिवंत मासे व त्यांचे बीज उत्पादक म्हणून देशपातळीवर ते नावारूपास आले आहेत. मत्स्यपालन हा व्यवसाय शेतीलाही कसा सरस ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहाता येते. रायगड जिल्ह्याला निसर्गाचा समृद्ध वारसा लाभला आहे. भात हे इथले मुख्य पीक. जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील गोवे गावात हसन म्हसलई यांची सुमारे १० एकर शेती. ती मुख्यतः वडीलच पाहतात. मुळात हे कुटुंब व्यवसायाने मत्स्य व्यावसायिक नाही. केवळ छंदापोटी हसन सुरवातीस समुद्रात, नदीत व खाडीमध्ये गळदोरी; तसेच जाळीच्या साहाय्याने ते मासेमारी करत असत. पावसाळ्यात मासेमारी करण्यात अडचण यायची. जवळच्याच धरणात एकदा मासेमारी करण्यासाठी गेले असता तेथे मज्जाव करण्यात आला. तेव्हा कळले की धरणांचे कंत्राट दिले जात असल्याने व्यक्तीसाठी हे क्षेत्र प्रतिबंधित असते. यामुळे अशी धरणे भाडेतत्त्वावर कशी घेता येईल, याची इत्यंभूत माहिती घेऊन आपल्याच गोवे गावातील होतकरू व बेरोजगार तरुणांना हाताशी धरून कुंडलिका मच्छीमार सोसायटीची स्थापना केली. आणि पुढील वर्षी ते धरण भाडेतत्त्वावर घेतले. त्यात संचयनासाठी योग्य आकाराचे व योग्य प्रतीचे बीज उपलब्ध नव्हते. मग काही तलाव वार्षिक भाडेतत्त्वावर घेतले. त्यात ‘कार्प’ जातीच्या मत्स्यबीजांचे संचयन करून संगोपन केले. त्यातून एक लाख वीस हजार बोटुकली मिळाली. पैकी एक लाख बोटुकली आपल्या धरणात संचयित करून उर्वरित २० हजार ही परिसरातील मत्स्य उत्पादकांना दिली. सुमारे ५० एमएम आकाराची ही बोटुकली शेततळ्यात व धरणात सोडली. हसन व शेतकऱ्यांना त्यापासून भरघोस उत्पादन मिळून आर्थिक फायदा झाला. यानंतर शेतकऱ्यांची मागणी वाढली.  

व्यवसायाचा विस्तार दृष्टिक्षेपात

  • -त्यानंतर हसन यांनी आणखी चार धरणे भाडेतत्त्वावर घेतली.
  • -बीजसंगोपनासाठी तलाव अपुरे असल्याने जवळच माणगाव तालुक्‍यातील सुरव गावात १३ शेततळी असलेला फार्म एक लाख ५५ हजार रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर घेतला. तेथे बोटुकली तयार केली. यामधून भरघोस उत्पादन व आर्थिक फायदा झाला.
  • -भाडेतत्त्वावर उत्पादन घेण्यापेक्षा स्वतःच्याच सहा एकर पडीक क्षेत्रावर शेततळी खोदण्याचा निर्णय -त्यात १३ मत्स्यबीज संगोपन तळी खोदली.
  • आजचा व्यवसाय खाण्याचे मासे

  • -गेल्या ११ वर्षांच्या अनुभवातून आपल्या शेततळ्यांद्वारे कटला, रोहू, मृगल, सायप्रिनस, गवत्या, चंदेरा व अन्य माशांचे संगोपन.
  • -प्रतिवर्षी त्यातून सुमारे ७० लाख मत्स्यबीज तयार करून ते शेतकऱ्यांना विकले जाते.
  • -पाच ते सहा कायमचे मजूर. त्यांना वर्षभर रोजगार. गरजेनुसार बाहेरून मजूर आणले जातात.
  • मार्गदर्शन मत्स्यसंगोपनाच्या शास्त्रोक्त पद्धतीच्या तंत्रज्ञानासाठी अजित वाकडे, मत्स्य विभाग महाराष्ट्र, माधव गित्ते, विषय विशेषज्ज्ञ (मत्स्यशास्त्र) कृषी विज्ञान केंद्र, किल्ला, रोहा, जि. रायगड यांचे मार्गदर्शन लाभते. शोभिवंत माशांचे प्रजनन मत्स्य बोटुकली संगोपनाचे हंगामी काम संपल्यावर उर्वरित कालावधीत अधिक उत्पन्नवाढ व वर्षभर व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी शोभिवंत मत्स्यबीज प्रजनन व संगोपन

  • -सुरवातीला म्हशीच्या गोठ्याची डागडुजी करून तेथे काम. आजमितीस स्वतंत्र जागेत
  • (एक हजार चौरस फूट) शोभिवंत मत्स्य प्रजनन युनिट. संगोपनासाठी ९ बाय ५ फूट आकाराच्या एकूण २८ टाक्‍या ६० बाय ४० चौ. फूट क्षेत्रात बांधल्या.
  • व्यवसायातील ठळक बाबी

  • -सुमारे २० प्रकारच्या शोभिवंत माशांचे संगोपन. यात गोल्ड फिश, ऑक्‍सर, सेव्हरम, सिल्वर, कोई कार्प, टायगर शार्क, टायगर बार्ब, ऍरुलियस बार्ब, फिलामेंटोस बार्ब, निग्रो बार्ब आदी जाती.
  • -शोभिवंत माशांसाठी वैयक्तिक अनुभवातून खाद्यही बनविले. त्यामुळे मासे लवकर प्रजननपक्व होतात व जास्त प्रमाणात अंडी घालतात.
  • व्यवसायाचे अर्थकारण हसन म्हणाले, की ११ वर्षांच्या अनुभवात टप्प्याटप्प्याने व्यवसायाची वार्षिक उलाढाल वाढवत १५ ते १८ लाखांपर्यंत नेली. यंदा धरणक्षेत्राचे कंत्राट, सरकारी धोरणे, कायदे यांच्या कचाट्यात धरणातील मासेमारी सापडली आहे. धरणाचे कंत्राट घेणारे आमचे मुख्य ग्राहक (कार्प माशांसाठी) आहेत. त्यामुळे या व्यवसायाची उलाढाल ८ लाखांवर आली आहे. शोभीवंत माशांच्या संगोपनासाठी मजुरांची समस्या निर्माण झाल्याने तीही उलाढाल यंदा १० ते १२ लाख रूपयांवर आली आहे. त्यासाठी मुंबई हे मोठे मार्केट असून ग्राहकांकडून मागणी मात्र भरपूर आहे. राष्ट्रीय स्तरावर सन्मान अष्टपैलू, अभ्यासू, हरहुन्नरी व व्यावसायिक वृत्तीच्या हसन या अवलीया व्यक्तिमत्त्वाची दखल देशपातळीवर घेतली न गेल्यासच नवल. पारंपरिक पद्धतींना छेद देऊन शेतीत आमूलाग्र बदल घडविणाऱ्या हसन यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

  • भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्लीच्या वतीने नावीन्यपूर्ण शेतकरी म्हणून २०१०
  • मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व आयसीआरआयचे महासंचालक डॉ. अय्यपन यांच्या हस्ते गौरव.
  • भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे उत्कृष्ट शोभिवंत मत्स्यप्रजनन व संगोपन युनिट यासाठी आंध्र प्रदेशाकडून गौरव
  • सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन यांच्या वतीने एक्सलन्स इन कमर्शियल आॅरनॅमेंटल फिशरीज पुरस्कार (२०१४)
  • ‘एमपेडा’ या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेचाही पुरस्कार
  • सह्याद्री दूरदर्शनचा कृषी सन्मान-१०१६
  • हसन यांच्या फार्मवर १० वर्षांत केंद्र व राज्य स्तरावरील विविध उच्चाधिकारी, कुलगुरू, शास्त्रज्ञ, शेतकरी, विद्यार्थी अशा एकूण तीन हजारांहून अधिक व्यक्तींनी भेटी दिल्या. जगातील सर्वात मोठे शोभिवंत मत्स्यबीज उबवणी केंद्र चालवणारे ऑस्ट्रेलियाचे ब्रायन अँन्ड्रयू यांचाही त्यात समावेश.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोलीअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथे सल्लागार समीतीवर तीन वर्षे कार्यरत.
  • कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, एमपेडा तसेच सकाळ माध्यम समुहाच्या एसआयएलसी आदी संस्थांमध्येही मार्गदर्शनासाठी हसन यांना वेळोवेळी निमंत्रित केले जाते.
  • नावीन्यपूर्ण मत्स्यबीज पॅकिंग तंत्रज्ञान हसन यांनी मत्स्यबीजांच्या पॅकिंगची आधुनिक पद्धती विकसित केली आहे. त्याचा मत्स्यबीज संगोपन करणाऱ्यास व मत्स्यबीज विकत घेणाऱ्यासही फायदा होतो. पॅकिंगसाठी वापरण्यात आलेल्या पॉलिथीन बॅगेचा आकार वाढवला आहे. त्यामुळे बीजांची संख्याही वाढविणे शक्‍य झाले. वाहतूक करताना पॉलिथिन बॅगांची गर्दी कमी होते. कमी वेळेत, खर्चात पॅकिंग होऊन मजुरी खर्चही वाचतो. या पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध रेडीमेड नायलॉन केबल टायचा उपयोग केला. त्यामुळे वाहतुकीदरम्यान पॉलिथीन बॅग लीक होण्याचा प्रकार कायमस्वरुपी टाळण्यात आला. आयसीएआरचा पुरस्कार याच नावीण्यपूर्ण संशोधनासाठी मिळाला. - हसन म्हसलई ः ९५५२१२२३३३ मु. गोवे, पो. पुगाव, ता. रोहा, जि. रायगड.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com