व्यावसायिक शेतीची मानसिकता ठेवल्यानेच सुकर वाटचाल

पपईचे वजन करताना किशोर मापारी
पपईचे वजन करताना किशोर मापारी

पिकांमध्ये विविधता, आंतरपिके घेणे, थेट विक्रीची पद्धत, सिंचनाची बळकट व्यवस्था आदी वैशिष्ट्ये जपत अौरंगाबाद जिल्ह्यातील रजापूर येथील किशोर मापारी यांनी शेती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचा प्रयत्न केला आहे. शिकण्याची वृत्ती व प्रत्येक गोष्ट आचरण्यात आणण्याची मानसिकता त्यांना शेतीली वाटचाल ठळक करण्यासाठी पूरक ठरली आहे.   मेरा छोटासा घर..छोटासा संसार..या तत्त्वावर किशोर हरिभाऊ मापारी या उमद्या व हाडाच्या व्यावसायिक शेतकऱ्याची शेती सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्‍यात वसलेल्या रजापूर गावात त्यांची सहा एकर शेती आहे. आई- वडील, पत्नी, दोन मुली व एक मुलगा असं कुटुंब असलेल्या मापारी यांच्या कुटुंबातील चार माणसं कायम शेतीतच असतात. पारंपरिक शेतीला फाटा देणारे मापारी नेहमी नव्या प्रयोगांची कास धरतात. अर्थात काही पिकांची लागवड नेहमी असतेच. जसे किमान एका एकरात तुरीचे पीक असते. यंदाही तेवढ्याच क्षेत्रात हे पीक आहे. आजघडीला प्रतिकूल परिस्थीतीवर मात करून उत्पादीत शेतमालाची प्रसंगानुरूप स्वत: विक्रीची तयारी ठेवल्याने आजवर मार्केटचा प्रश्न फारसा निर्माण झाला नाही. आपण पिकविलेला माल आपणच विकण्याची वृत्ती त्यांच्यात असल्याने मालाचे विक्री व्यवस्थापन थोडे सुलभ झाले आहे. अन्य शेतकऱ्यांना सोबत घेत विक्री व्यवस्थेत प्राधान्य व सहकार्य करण्याचे धोरणही अवलंबिले आहे. त्यांच्या या गुणाचा अवलंब इतर शेतकऱ्यांनीही करण्याची गरज आहे. वडिलोपार्जित मोसंबी बागेचं जतन वडिलोपार्जित मोसंबी बागेचे जवळपास दोन एकरांवर कायम जतन करण्याचे काम मापारी यांनी केले आहे. आधीची मोसंबी बाग काढल्यानंतर पुन्हा नव्याने दोन एकरांवर लागवड केली. पाच वर्षांपासून या बागेतील उत्पादन सुरू आहे. पाच वर्षांचा आढावा घ्यायचा तर जवळपास एकूण क्षेत्रातून १५ ते २५ टनांपर्यंत उत्पादनाची मजल त्यांना गाठता आली; तर १२ हजार रुपये प्रतिटनापासून ते ३० हजार रुपये टनांपर्यंत विक्री केलेल्या मोसंबीतून वर्षाकाठी किमान दोन लाख रुपयांची मिळकत केली आहे. शेवगा पिकात सातत्य सुमारे पाच वर्षांपासून शेवग्याची लागवड होते. जवळपास एक ते सव्वा एकर क्षेत्रात शेवगा असतो. सन २०१४-१५ मध्ये सव्वा एकरात शेवग्यात आंतरपीक म्हणून अाले घेतले होते. सन २०१३ मध्ये जवळपास दहा टन शेवगा उत्पादन मिळाले. त्याला किलोला २७ रूपये सरासरी दर मिळून सुमारे पावणेतीन लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले. सन २०१४ मध्ये एकरातच जवळपास १० टन शेवगा मिळाला. त्यावेळी दर मात्र काहास कमी म्हणजे १५ रूपये मिळाला. सन २०१६ मध्ये ना शेवग्याला माल टिकला ना उत्पादन झालेल्या शेवग्याला दर मिळाला. त्यामुळे या पिकाचा तसा आधार मिळालाच नाही. यंदाही मोसंबीत शेवगा लागवड केली होती; परंतु तो शेवगा काही कारणाने न जमल्याने काढून टाकावा लागला. आता त्या ठिकाणी हरभरा पिकाचे नियोजन केले आहे. यंदा पपईत अाले जवळपास एक एकरातील पपईपैकी अर्धा एकरावर अाले घेतले आहे. आंतरपीक म्हणून हे पीक घेण्याची ही दुसरी वेळ आहे. सन २०१४-१५ मध्ये सव्वा एकर शेवग्यात हे पीक घेण्याचा प्रयोग केला होता. त्यामध्ये जवळपास ७० क्‍विंटल उत्पादन मिळाले होते. त्यास ३३०० ते ४२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. तर हे उत्पादन घेण्यासाठी लाखभर रुपये खर्ची घालावे लागले होते. सन २०१५ ते २०१७ दरम्यान पाण्याची उपलब्धता पुरेशी नसल्याने अाले घेता आले नव्हते. शेततळे अन्‌ ठिबक किशोर यांच्या सहा एकर शेतीत वडिलोपार्जित विहीर आहे. विहिरीतील पाणी सिंचनाच्या कामात तोकडे पडत असल्याने २०११ मध्ये शेततळे घेतले. दुसरीकडे पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने संपूर्ण शेतीच ठिबकखाली आणली आहे. कोणतेही पीक पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टिकोनातूनच ठिबकवरच घेण्यास प्राधान्य राहते. शेणस्लरीच्या वापरावर जोर शेती करताना रासायनिक खतांचा शिफारशीत मात्रेनुसार अवलंब करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. हे करीत असताना शेतीला शेणस्लरीचीही जोड दिली आहे. त्यासाठी एक दुभती गाय कायम ठेवली आहे. गोमूत्राचाही वापर केला जातो. यंदा पहिल्यांदा पपई सप्टेबर २०१६ मध्ये एक एकरावर पपईची लागवड केली आहे. जवळपास दोन महिन्यांपासून उत्पादन सुरू झाले अाहे. विक्री केलेल्या पाच टन मालाला गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांनी जवळपास १६ रुपये प्रतिकिलोचा दर दिला आहे. तर स्वत: विक्री केलेल्या जवळपास दोन टन पपईला २० ते ३० रुपये दर मिळाला. आणखी किमान ५० टन माल पपईतून मिळणे अपेक्षित आहे. स्टॉल उभारून थेट विक्री केवळ व्यापाऱ्यांवर अवलंबून राहता किशोर यांनी स्वत: उत्पादित पपईची विक्री करण्याचे तंत्र अवलंबिले आहे. सन २०१२-१३ मध्ये रजापूरला कृषी सहायक म्हणून कार्यरत असलेल्या मुकेश महाजन यांनी थेट मार्केटिंग व विक्रीचे मार्गदर्शन केले होते. त्या धड्यातूनच पपईच्या विक्रीसाठी आडूळ ते रजापूर दरम्यान धुळे-सोलापूर मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पपईचे दोन स्टॉल किशोर यांनी लावले. या स्टॉलवरून दररोज जवळपास एक क्‍विंटल पपईची विक्री करणे शक्य झाले. वळले रेशीम शेतीकडे परिस्थितीनुरूप पीकपद्धतीत बदल करणाऱ्या किशोर यांनी आपली शेती अधिक फायद्याची होण्यासाठी रेशीम उद्योगाकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. पीकपध्दती त्यादृष्टीने बदलताना यंदा जूनमध्ये तुतीची दीड एकरांवर लागवड केली आहे. शेडनिर्मितीचे कामही लवकरच हाती घेतले जाणार आहे. गावात जवळपास २५ शेतकऱ्यांनी यंदा तुती लागवडीची तयारी केली. त्यापैकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात वाटचाल करीत असून त्यामध्ये किशोर अग्रस्थानी आहेत.   किशोर मापारी-९८२२०७२३६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com