मांडव पद्धतीने पिकतोय सर्वोत्कृष्ट दर्जाचा कोहळा

अपघातामुळे अपंगत्व येऊनही महेश यांनी अत्यंत हिंमतीने शेती केली. त्यांच्या या जिद्दीचे आणि कष्टाचे फळ त्यांना केंद्राकडून पुरस्काराच्या माध्यमातून मिळाले आहे. महेश यांच्या प्रयत्नवादी शेतीचे परिसरातही कौतुक होते.
 महेश पाटील यांच्या मांडव बागेत वेलीला आलेला दर्जेदार कोहळा
महेश पाटील यांच्या मांडव बागेत वेलीला आलेला दर्जेदार कोहळा

अपघातामुळे अपंगत्व आले म्हणून खचले नाहीत. उलट जिद्दीने शेती अधिक परिपूर्ण करण्याचा ध्यास घेतला. कोहळा पिकाची यशकथा ॲग्रोवनमध्ये वाचण्यात आली. या भागात तसे नवे असलेले पीक अभ्यासले. त्याची कष्टपूर्वक शेती केली. दर्जेदार उत्पादन घेत जागेवरच मार्केटही मिळवले. कुपवाड (जि. सांगली) येथील महेश पाटील आता मांडव पद्धतीने हे पीक घेत असून त्यातील ते ‘मास्टर’च झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील कुपवाड हे शहर सांगली शहरापासून अवघ्या सहा किलोमीटरवर आहे. ‘अौद्योगीक कल्चर’ वाढीस लागल्याने या परिसरातील बहुतांश शेती नामशेष होत चालली आहे. कुपवाड तसेच लगतच्या कवलापूर, बुधगाव परिसरात बहुतांश द्राक्षाची शेती केली जाते. कुपवाड येथील महेश पाटील यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. घरची आर्थिक परिस्थिती तशी जेमतेम. पूर्वी महेश यांचे वडील शेती करायचे. त्यांचाही द्राक्षशेती होती. महेश लाकूड पुरवण्याचा व्यवसाय करायचे. संकटांतून सावरले महेश सन २००३ मध्ये महेश यांचा अपघात झाला. त्या वेळी पायांना जबर मार बसला. व्यवसाय पुढे सुरू ठेवणे शक्य नव्हते. हा कुटुंबासाठी मोठा धक्काच होता. सन २००९ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर मात्र शेतीची पूर्ण जबाबदारी महेश यांच्यावर येऊन पडली. शेतीच्या नव्या अध्यायाला मग महेश यांनी जिद्दीने सुरवात केली. अभ्यासाचे गिरवले पाठ वडील शेती करत असल्याने महेश यांचा शेतीतील अनुभव तसा फार नव्हता. त्यामुळे सुरवातीला अनेक अडचणी निर्माण आल्या. पण चिकाटीने महेश यांनी परिसरातील मित्र, प्रगतशील द्राक्ष शेतकरी यांच्याकडे जाऊन शेतीचा अभ्यास सुरू केला. केवळ द्राक्ष, ऊस शेती करून आर्थिक उन्नती करता येणार नाही हे लक्षात आलं. मग विविध व्यावसायिक पिकांचा शोध सुरू केला. ॲग्रोवने दिले नवे पीक महेश ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. सन २०११ च्या दरम्यान ॲग्रोवनमध्ये कोहळा शेतीविषयक माहिती मिळाली. व्यावसायिक दृष्ट्या हे पीक फायदेशीर असावे असे वाटले. त्याविषयी अधिक अभ्यास करण्यास सुरवात केली. अनेकवेळा अपुरी माहिती मिळायची. पण जिद्द असेल तर अडचणींवर मात करता येते हेच महेश यांनी सिद्ध केले. कोहळ्यातील प्रयोग सर्व अभ्यासाअंती कोहळ्याचे पीक करायचे हे नक्की केले. यंदाचे हे लागवडीचे सहावे वर्षे आहे. या सहा वर्षांच्या काळात अनेक अनुभवांतून महेश या पिकात तज्ज्ञ झाले आहेत. आत्तापर्यंत सुमारे दोन एकरांत हे कोहळा करायचे. गेल्यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये अधिक पाऊस असल्याने कोहळा शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यावर उपाय शोधण्याचे ठरवले. मग मांडव पद्धतीने हे पीक घ्यायचे ठरवले. द्राक्षबागेसारखा मांडव तयार केला व त्यात कोहळ्याची लागवड केली. यंदा हा प्रयोग केवळ १५ गुंठ्यांतच आहे. पण फळांचा दर्जा व त्यांची प्रति वेलीला असणारी संख्या यात लक्षणीय फरक आहे.

मांडव पद्धतीचे दिसलेले फायदे

  • पूर्वी प्रति वेल दोन फळे यायची. यंदा ती चारपर्यंत दिसली.
  • फळाला गोलाई चांगली. त्यामुळे दर चांगला मिळण्याचा फायदा
  • पूर्वी वेली जमिनीवर असायच्या. पाऊसपाण्यात त्या कुजायच्या. आता वेली जमिनीच्या वर असल्याने फळांचा स्पर्श जमिनीला होत नाही. त्यामुळे फळांची क्वाॅलिटी चांगली.
  • कोहळ्याची लागवड महेश दरवर्षी जूनच्या दरम्यान कोहळ्याची लागवड करतात. या हंगामात लागवड केल्यास अपेक्षित उत्पादन मिळते असा त्यांचा अनुभव आहे. दोन ओळीतील अंतर सहा फूट असते. झिगझॅग पद्धतीने लावण आहे. साधारण लावणीनंतर ६० दिवसांत फळे सुरू. होतात. पुढे दोन महिने प्लॉट सुरू राहतो. मांडव पद्धतीसाठी सुमारे पावणेदोन लाख रुपये खर्च आला. अर्थात तो दीर्घकाळासाठी आहे. यंदाच्या हंगामात आत्तापर्यंत पंधरा गुंठ्यातून साडेचार हजारांपर्यंत फळे मिळाली आहेत. एकरी सुमारे नऊ टनांचे उत्पादन हाती आले आहे. अजून दोन टनांचे अपेक्षित आहे. पूर्वी एकरी पाच टनांपर्यंत उत्पादन यायचे. जागेवरच मार्केट महेश पूर्वी सांगलीच्या मार्केटमध्ये कोहळ्याची विक्री करायचे. मात्र त्याची उत्तम गुणवत्ता आणि गोलाई यामुळे व्यापारी थेट त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोचू लागले. सांगली, कोल्हापूर, आणि सातारा जिल्ह्यातूील व्यापारी जागेवरूनच माल खरेदी करतात. यामुळे वाहतूक व तत्सम सर्वच खर्च वाचतात. किलोला साधारण १० ते १२ रुपये दर मिळतो. दसरा, दिवाळी या कालावधीत कोहळ्याला अधिक मागणी असते. यंदा हे दर १५ ते २० रुपये आहेत.

    अन्य पिकांचेही उत्कृष्ट नियोजन आपल्या चार एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर काळ्या वाणाची द्राक्षलागवड असते. तीस गुंठ्यात ऊस आहे. सुमारे सात गुंठ्यात संकरित भेंडी असते. बाजारपेठेचा अभ्यास करून कोणत्या हंगामात कोणत्या मालाला मागणी अधिक असते हे महेश अभ्यासतात. सध्या काळा हुलगा, हत्ती घास, मका अशी चारा पिके आहेत. भेंडी, दोडका, कारली, काकडी यासारखी वेलवर्गीय पिकेही प्रामुख्याने घेतली जातात. त्यांचाही जागेवर विक्री केली जाते. आंतरपिकांचा बोनस केवळ मुख्य पिकाची शेती करण्यात रस नसल्याचे महेश सांगतात. ते नेहमी आंतरपीक वा मिश्र पद्धती वापरतात. यंदा भुईमुगाच्या शेतात श्रावणघेवडा व हत्ती घास अशी पद्धत घेतली जाते. अांतरपिके मुख्य पिकांतील खर्च कमी करतात. हत्तीघासची विक्री गावातच केली जाते. त्यास टनाला पंधराशे रुपये दर मिळतो. यंदा दोडक्‍यातून सुमारे ५० ते ७० हजार तर कारले पिकातून एक लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले आहे. संपर्क : महेश पाटील - ९८९०९१३४१५

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com