ग्रामसौंदर्यासह विविध सुविधांनी सज्ज वणी बेलखेडा

गावचे सरपंच सूरज चव्हाण हे नागपूर येथील ॲग्रोवन सरपंच परिषदेत सहभागी झाले होते. त्यातून ग्रामविकासाचे ‘व्हिजन’ मिळाल्याचे आणि आत्मविश्‍वास निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्याची केलेली सुविधा
ग्रामस्थांना शुद्ध पाणी देण्याची केलेली सुविधा

खरे काम निष्काम ही ग्रामसेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा...राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या या विचारांचा वारसा जपणाऱ्या गावांमध्ये अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्‍यातील वणी (बेलखेडा) गावचा समावेश होतो. ग्रामपंचायतीने स्वयंफूर्तीने पुढाकार घेत विकासाची कामे वेगाने हाती घेतली. ग्रामस्थांनीही तेवढाच प्रतिसाद दिला. जलसंधारण, शुद्ध पाणी, तंटामुक्ती, स्वच्छता, ग्राम सौंदर्यीकरण अशा विविध कामांमधून विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊन गावाने आदर्श निर्माण केला आहे.

अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार या तालुक्‍याच्या ठिकाणापासून सुमारे बारा किलोमीटरवर वणी (बेलखेडा) हे गाव वसले आहे. लोकसंख्या सुमारे अडीच हजारांपर्यंत आहे. शेती व शेतमजुरी हेच इथले उदरनिर्वाहाचे मुख्य साधन. ग्रामपंचायत प्रशासनाने लोकाभिमुख कामांसाठी घेतलेला पुढाकार, त्याला ग्रामस्थांच्या प्रयत्नांची मिळालेली जोड यातून हे आडवळणावरील गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात आले आहे. गावाचा कारभार नऊ मे २०१५ रोजी सूरज चव्हाण या युवा सरपंचाने हाती घेतला. उपसरपंच म्हणून मंगेश देशमुख यांची निवड झाली. नऊ सदस्यीय ही ग्रामपंचायत आहे. सुविधांच्या दिशेने गावात दोन बोअरवेल्स पाणीपुरवठ्यासाठी आहेत. नळ योजना असून त्यासाठीही पाण्याची टाकी बांधण्याचे काम अनेक दिवसांपासून हाती घेण्यात आले होते. परंतु, अंतर्गत राजकारणामुळे हे काम काही वर्षांपासून रखडले होते. या कामाला गती देण्यात आली आणि जलकुंभाचे काम पूर्णत्वास गेले. गावातील सार्वजनिक नळपोस्ट बंद करून त्याऐवजी घरोघरी नळजोडणी देण्यावर भर दिला. आता नळांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पाण्याच्या टाकीसाठी सुमारे ३५ लाख रुपयांचा खर्च झाला. ग्रामपंचायत कार्यालयाला नवे रूप पूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत कौलारू होती. पडकी असल्याने पावसाळ्यात गळायची. गावातील विकासाच्या कामांना हात घालण्यापूर्वी या इमारतीच्या दुरुस्ती व विकासावर भर देण्यात आला. आज ती आदर्श इमारत म्हणून उभी राहिली आहे. स्वामीनाथन आयोगासाठी आग्रही केंद्र व राज्य शासनाची अनेक परिपत्रक इंग्रजीत येतात. शासनाचे सर्व पत्रव्यवहार मराठीत असावेत अशी आग्रही भूमिका ग्रामपंचायतीने घेतली. शेतकऱ्यांच्या हिताकरिता स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, याकरितादेखील ग्रामपंचायत आग्रही आहे. जलसंधारणाच्या कामांवर भर जलयुक्‍त शिवार अभियानातून गावात सुमारे दोन किलोमीटरचे नाला खोलीकरण करण्यात आले आहे. नाल्यास पूर आल्यास बेलखेडा गावाला पुराचा धोका संभवत होता. खोलीकरणामुळे गावचे पुरापासून संरक्षण होण्यास मदत झाली आहे. शेतीला संरक्षित सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने शासन योजनेतून १६ विहिरी देण्यात आल्या. विहिरींच्या दुरुस्तीसाठीही निधीची उपलब्धता करून देण्यात आली. त्यातून खचलेल्या १४ विहिरींची कामे झाली. पाझर तलावातील गाळ काढण्याचे कामही शासन निधीतून झाले. वीजरोधक यंत्र चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज संरक्षक यंत्र बसविण्याला मंजुरी देण्यात आली आहे. अडीच लाख रुपयांत हे यंत्र उपलब्ध होते. त्या माध्यमातून पावसाळ्यात पडणाऱ्या विजांपासून गावाचे संरक्षण शक्‍य होऊन जीवितहानी टाळता येणार आहे. अशी तरतूद करणारी ही पहिलीच ग्रामपंचायत ठरावी. पर्यावरणपूरक योजनेतील निधीचा वापर करीत गावात १२ सौर पथदिवे बसविण्यात आले आहेत. त्यामाध्यमातून विजेचे बिल कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. तंटामुक्‍त गावाचा आदर्श शांततेतून समृद्धीकडे जाण्याचा विचार ग्रामपंचायतीने मांडला. त्याअंतर्गत गावातील तंटे गावातच मिटविण्यावर भर दिला. तालुकास्तरावरील पहिला तीन लाख रुपयांचा पुरस्कार गावाने पटकाविला. गावातील एका धार्मिक स्थळाबद्दल दोन समाजांमध्ये वाद होता. ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत दोन्ही समाजबांधवांची समजूत काढली. शिष्टाई यशस्वी होऊन वाद निवळला. आज या परिसरात एकोपा नांदत आहे. सामाजिक सौहार्द राहावे, यासाठी एक गाव एक गणपती संकल्पनाही यावर्षी राबविण्यात आली. यापूर्वी गावात दोन मंडळांकडून गणपतीची स्थापना व्हायची. गावाने मिळवलेले सन्मान

  • २००५ मध्ये सर्वसंमतीसह गावातील सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची निवड बिनविरोध
  • २००७ - राज्य शासनाचा सामाजिक न्याय 
  • २००९ - निर्मलग्राम
  • २००८-०९ - गाडगेबाबा स्वच्छता अभियान
  • २०१०-११- पर्यावरण संतुलीत समृद्ध ग्राम
  • सामाजिक कार्यात पुढाकार

  • ग्रामस्थांचे आरोग्य चांगले राहावे, याकरिता सातत्याने गावपातळीवर नेत्र तपासणीस रक्तदान यासह वेळोवेळी आरोग्य शिबिरे घेण्यात आली.
  • महिला-मुलींच्या कलागुणांना चालना मिळावी, याकरिता ग्रामपंचायतीतर्फे रांगोळी स्पर्धा
  • सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी बेंच. ठिकठिकाणी कचराकुंड्या आहेत.
  •  दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगटाला दहा सौर चरखे देण्यात आले. या माध्यमातून रोजगाराचा पर्याय उपलब्ध करून दिला. प्रत्येकी ५० हजार रुपये किंमतीचा हा चरखा आहे. त्यावर सूत कताईचे काम या महिला करतात.
  •  गावातील काही विधवा महिलांना रोजगाराचे साधन म्हणून शिवणयंत्र देण्यात आले.
  • ठळक बाबी

  • स्वच्छ भारत अभियानांतर्गत संपूर्ण गाव हागणदारीमुक्‍त झाले.
  • गावात दोन शेतकरी स्वयंसहायता समूह असून त्यांना ग्रामपंचायतीकडून सहकार्य होते.
  • प्राथमिक आरोग्य केंद्राला तारेचे कंपाउंड ग्रामपंचायत निधीतून बांधले. त्या माध्यमातून मोकाट जनावरांचा त्रास रोखता आला.
  • गावातील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणासाठी ग्रामपंचायतीचा पुढाकार
  • युवकांचे आरोग्य राखण्यासाठी व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. तीन लाख रुपयांचे साहित्य त्यासाठी खरेदी करण्यात आले आहे.
  • विकासात्मक उपक्रम स्मशानभूमीसाठी गावात जागा उपलब्ध नव्हती. गरज अोळखून स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. तिकडे जाण्यासाठी पोच रस्ता नव्हता. त्याचेही कामही आता पूर्णत्वास जात आहे. सुमारे बावीस लाख रुपयांची तरतूद त्यासाठी करण्यात आली. गावावर राहणार तिसऱ्या डोळ्याची नजर गावात जनावरे चोरीच्या घटनांमध्ये नजिकच्या काळात वाढ झाली. परिणामी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी संपूर्ण गावाचा परिसर सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचे प्रस्तावीत अाहे. स्वच्छ पाण्याकरिता ‘आरओ’ फिल्टर ग्रामस्थांना स्वच्छ पाणी मिळावी यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून आरओ (रिव्हर्स आॅसमॉसीस) प्लॅन्ट बसविला आहे. सुमारे पाच लाख रुपयांची तरतूद यासाठी केल्याचे उपसरपंच मंगेश देशमुख यांनी सांगितले. पाणी साठविण्यासाठी विशेष कॅन घाऊक दरात खरेदी करून ग्रामस्थांना त्यांचा पुरवठा अल्पदरात केला गेला. सुरवातीला ग्रामस्थांना त्या घरपोच पुरविण्यात आल्या. आता ग्रामस्थच स्वयंस्फुर्तीने पाणी घेऊन जातात. पंचवीस पैसे प्रति लिटर असा पाण्याचा दर आहे. गावातील अंगणवाडीतील मुलांचे आरोग्य शाबूत राहावे याकरिता अंगणवाडीला शुद्ध पाण्याचा निशुल्क पुरवठा होतो. संपर्क- सूरज चव्हाण - ९५७९१२३५५८ (सरपंच) मंगेश देशमुख - ९६६५००९७५० (उपसरपंच) .

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com