उत्पादनातील सातत्यामुळे झेंडूने दिले स्थैर्य

महादेव सोनटक्के यांनी झेंडू उत्पादनात आघाडी घेतली आहेच, पण मार्केटिंगसाठीही ते तितकेच प्रयत्नशील राहतात. सोलापूर बाजार समितीतील ठराविक व्यापाऱ्यांकडे त्यांचा झेंडू पोचतो. थेट जागेवरच खरेदी करणारेही व्यापारी आहे. सोलापूर मार्केट झेंडूसाठी चांगले असल्याचा महादेव यांचा अनुभव आहे.
 इटकळ, जि. उस्मानाबाद येथील महादेव सोनटक्के यांच्या झेंडूची काढणी दसऱ्याच्या सणासाठी सुरू आहे.
इटकळ, जि. उस्मानाबाद येथील महादेव सोनटक्के यांच्या झेंडूची काढणी दसऱ्याच्या सणासाठी सुरू आहे.

स्वतःची थोडीशीही शेती नाही. पण शेती घ्यायची, त्यात उल्लेखनीय प्रगती करायची याच ध्येयाने इटकळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) येथील महादेव सोनटक्के यांना पछाडले. कोणतेही काम द्या, त्यात अभ्यास करून प्रभावी व्यवस्थापनाची चुणूक दाखवणाऱ्या सोनटक्के यांनी आज झेंडू पिकात पंचक्रोशीत नाव कमावले आहे. दसऱ्यासारख्या सणाला त्यांचा झेंडू भाव खाऊन जातोच, पण उत्पादनातील सातत्य, बाजारपेठेचा अभ्यास, योग्य नियोजन या त्रिसूत्रीने वर्षभरच या झेंडूने त्यांना स्थैर्य दिले आहे. सोलापूर-हैदराबाद महामार्गावर इटकळ (ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) गावाच्या अलीकडे रस्त्याच्या कडेलाच आकर्षक, लक्षवेधी गर्द पिवळा झेंडू शेताचेच नव्हे तर परिसराचे सौंदर्य वाढवतो आहे. केवळ हंगामातच नव्हे तर तशी वर्षभर या शेतीत झेंडूची फुले डोलतच असतात. हे शेत आहे महादेव सोनटक्के यांचे. वडिलोपार्जित त्यांची एक गुंठाही शेती नव्हती. केवळ कष्ट, जिद्दीच्या जोरावर त्यांनी १७ एकरांवर शेतीचा विस्तार करीत प्रगती साधली आहे. सोनटक्के यांचा शेतीतील प्रवास आज सतरा एकरांवर शेतीचे ‘प्लॅनिंग’ करताना एक एकर ॲपलबोर आहे. त्यातच झेंडू आंतरपीक आहे. सहा एकर ऊस, एक एकर शेवंती, सहा एकर सोयाबीन अाहे. कायम नवे काही करण्याची धडपड असणाऱ्या महादेव यांनी १९८४ मध्ये बारावीनंतर ‘आयटीआय’मधून ‘इलेक्‍ट्रियशन’चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर खासगी कंपनीत नोकरी केली. त्यानंतर एका कन्स्ट्रक्‍शन कंपनीतही व्यवस्थापक म्हणून काम केले. पण त्यातही रमले नाहीत. स्वतःचा व्यवसाय वा शेती असावी अशी इच्छा होती. पण पर्याय नव्हता. सन १९९० च्या सुमारास गावानजीक एका पोल्ट्री फार्ममध्ये ‘इलेक्‍ट्रिशियन’ म्हणून काम करू लागले. त्यावेळी पोल्ट्री खताचा विक्री विभागही कंपनीने त्यांच्यावर सोपवला. महादेव या अनुभवातून शेतीच्या अधिक जवळ येऊ लागले. ध्यासापोटी शेतीची खरेदी शेतीची आवड व ध्यास या गोष्टीतून सन २००० च्या दरम्यान त्यांनी साडेतीन एकर शेती खरेदी केली. आत्तापर्यंत जमवलेली पुंजी त्यासाठी कामी आली. त्यावेळी शेतीसाठी पाणी नव्हते, मग दोन बोअर घेतल्या. शेतीत वेगवेगळे प्रयोग सुरू केले. कोणत्याही कामात नेटके व्यवस्थापन हा उत्तम गुण अंगी असलेल्या महादेव यांना शेतीत स्थैर्य मिळवणे तसे अवघड गेले नाही. पूरक म्हणून छोटासा पोल्ट्रीखत उद्योग सुरू केला. त्याचा उपयोग स्वतःच्या शेतीतही झाला. झेंडू शेतीत आघाडी आज महादेव यांनी झेंडू शेतीत स्वतःचे नाव तयार केले आहे. पण त्यासाठी त्यांना अनेक गोष्टींत अभ्यासही करावा लागला. मार्केटचा अभ्यास करुन कोणत्या हंगामात, कोणत्या वेळेस झेंडू लावावा, याचे गणित बसवावे लागले. कमी खर्चात उत्पादन आणि उत्पन्नाचा मेळ मिळण्यात यश मिळवले. छोटा भाऊ बालाजी, मुलगा सचिन आणि महेश यांच्या मदतीनेच ही शेती सुकर झाली आहे. ॲपलबेरमध्ये झेंडू यंदाच्या वर्षी आठ-नऊ महिन्यांपूर्वी ॲपलबेरचा नवा प्रयोग केला. सध्या त्याला फुलेही लागली आहेत. दहा बाय आठ फूट अंतरावर लागवड असल्यानेच ॲपलबेरचे उत्पादन सुरू होण्याआधी त्यात आंतरपीक झेंडू घेऊन त्यातून कमाई करावी हे उद्दिष्ट होते. यंदाच्या जुलैत लागवडीसाठी पिवळ्या रंगाचे, आकर्षक आणि सर्वाधिक उत्पादन देणारे वाण निवडले. जोडओळ पद्धतीने लागवड केली. एकरी साधारण आठहजार रोपे लागली. निविष्ठांच्या खर्चावर आणल्या मर्यादा स्वतः पोल्ट्री खत तयार करीत असल्याने त्याचा वापर होतोच. शिवाय गोमूत्र, शेळ्यांची लेंडी, मूत्र यांचा समावेश असणारे विशिष्ठ सेंद्रिय द्रवरूप खतही तयार करून त्याचा प्राधान्याने वापर करतात. यंदा झेंडू लागवडीनंतर २० दिवसानंतर प्रति झाड ५० ग्रॅम पोल्ट्री कंपोस्ट खत तर त्यानंतर १० लिटर द्रवरूप खत ठिबकमधून दिले. पीक संरक्षणात केवळ निंबोळी तेल व गोमूत्राचा वापर केला. आश्वासक उत्पादन याच आठवड्यात झेंडूची काढणी केली. पहिल्या तोड्यात साधारण एक टन झेंडू निघाला. आणखी किमान तीन महिने हंगाम चालेल. आठवड्याला पाचशे किलोचा हिशेब गृहित धरल्यास किमान सहा टनांपर्यंत उत्पादन मिळेल. एक टन फुलांची विक्री प्रतिकिलो ३० रुपयांप्रमाणे जागेवरच केली आहे. आत्तापर्यंत साधारण ३५ हजार रुपयांपर्यंत खर्च आला आहे. मात्र हातात आलेल्या पहिल्या पट्टीचा विचार करता पहिल्याच तोड्यात साधारणपणे खर्च निघाला आहे. वर्षभर शेतातील सर्व प्लॉटमध्ये आलटून-पालटून झेंडूचा प्रयोग सतत सुरू असतो. कधी तोटा, कधी फायदा हे गणीत खालीवर होतच राहते.

झेंडू उत्पादनात सातत्य दरवर्षी झेंडू पिकात सातत्य हेच महादेव यांच्या शेतीचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक वर्षी काही लाख रुपयांचे उत्पन्न ते या पिकातून निश्चित घेतात. गेल्या वर्षी पाऊस नसल्याने हंगाम काहीसा जेमतेम गेला. पण यावर्षी पुन्हा हे पीक त्यांना समाधान देऊन जाईल. योग्य नियोजन, बाजारपेठेचा अचूक अभ्यास ही त्यामागील कारणे आहेत. शेतीपूरक उद्योगाची जोड शेतीला पूरक म्हणून ३० शेळ्यांचा प्रकल्प सुरू केला आहे. शेतीतील प्रयोग करणे इतरांना दाखवून त्यांचा शेतीतील खर्च कमी कसा होऊ शकतो हे पटवून सांगण्यात ते पुढे असतात. त्यामुळेच अनेक शेतकरी त्यांचा सल्ला घेण्यासाठी उत्सुक असतात. ऊस, शेवंती जोमदार झेंडूबरोबर शेवंतीही आता कळीवर आहे. सध्या पट्टा पद्धतीने सहा बाय दीड फूट अंतरावर ऊस रोपांची लागवड केली आहे. उसाची वाढ अत्यंत जोमदार असून फुटवेही चांगले आहेत. संपर्क- महादेव सोनटक्के - ८९८७५६६८२२७  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com