उत्कृष्ट व्यवस्थापनातून शेळीपालनात दमदार वाटचाल

संदीप यांनी भविष्यात पाचशे शेळ्यांचे व्यवस्थापन करण्याचा निश्‍चय केला आहे. टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा आकार वाढवण्याचे त्यांचे ध्येय अाहे. श्री गोट फार्म या नावाने व्यवसायाचे नामकरण केले आहे.
विविध जातींच्या शेळ्यांचे संगोपन.
विविध जातींच्या शेळ्यांचे संगोपन.

बेभरवशाच्या पावसामुळे शेतीवर मर्यादा आल्याने कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेजवळील निपाणी (जि. बेळगाव, कर्नाटक राज्य) येथील संदीप शिवाजी कोळी (वय ३२) हा युवक पर्यायाच्या शोधात होता. शेळीपालनातून तो त्याला मिळाला. आज व्यवसायातील विविध शेळीजातींची मागणी लक्षात घेऊन त्यांचे पालन, चाऱ्याचे योग्य नियोजन व पैदासीचे नियोजन करीत या व्यवसायात त्याने दमदार वाटचाल सुरू ठेवली आहे. निपाणी हे गाव तसे कर्नाटक जिल्ह्याच्या हद्दीत म्हणजे बेळगाव जिल्ह्यात येत असले तरी कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेला लागूनच असून याच जिल्ह्यात एकरूप झाल्यासारखे आहे. निपाणी शहरापासून चार किलोमीटरवरील मळा वस्तीत पुणे-बंगळूर महामार्गानजीक संदीप शिवाजी कोळी यांचे कुटुंबीय राहते. त्यांची एकूण पंधरा एकर शेती आहे. त्यात ऊस, सोयाबीन, तंबाखू, भुईमूग आदी पिके ते घेतात. संदीप यांनी बारावी शिक्षण झाल्यानंतर शेतीतच मुख्य करियर करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाची अनियमितता हाच प्रगतीतील मुख्य अडसर होता. शेळीपालनाने दिला पर्याय बेरभवशाच्या पावसामुळे शेतीचे क्षेत्र चांगले असूनही अपेक्षेएवढे उत्पादन मिळत नव्हते. यातूनच पूरक व्यवसाय व त्यातही अधिक अभ्यास करता शेळीपालनाचा हुकमी पर्याय सुुचला. ही साधारण २०१४ मधील गोष्ट. डोक्यात याच व्यवसायाचे गणीत घोळू लागल्यानंतर संदीप यांनी विविध शेळी फार्म्सना भेटी देत ‘होमवर्क’ पक्के केले. सन २०१५ मध्ये प्रत्यक्षात व्यवसायास सुरवात झाली. शेळीपालन दृष्टिक्षेपात -सुरवातीला ४० शेळ्यांपासून व्यवसायाची सुरवात झाली. आता त्यांची संख्या ७० वर गेली आहे. तीदेखील मधल्या काळात विक्री होऊन. यात चारा पिकांची वैविध्यता त्यांनी जपलीच. परंतु स्थानिक व अन्य जातींच्याही अधिक वजनाच्या शेळ्या पैदास करण्याकडे कल ठेवला.

  • शेडचे क्षेत्रफळ- १०० बाय ५० बाय चौ. फूट
  • दोन कप्प्यात विभागणी
  • खुले व बंदिस्त अशा दोन्ही प्रकारांचा वापर
  • संरक्षणासाठी पाच फूट उंचीचे चेनग्रील
  • थंडीसाठी शेडभोवती पडद्याचे आच्छादन
  • पाण्यासाठी पाण्याच्या बकेटची सोय
  • शेळ्यांना बसण्यासाठी लाकडी माचे
  • शेळ्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी सहा सीसीटीव्ही
  • गोठ्यात बसण्यासाठी केबिन
  • शेळ्यांची नोंद टॅगिंगद्वारे
  • पिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था
  • जातींची विविधता शेळ्यांची एकूण संख्या- ७० आफ्रिकन बोअर- १०, उस्मानाबादी- ५७, पैदासीसाठी उस्मानाबादी- पाच नर सोजत- ७ कोटा- ६ शेळी व्यवस्थापनाचा दिनक्रम सकाळी सहा वाजता गोठा स्वच्छ केला जातो. त्यानंतर सकाळी आठ वाजता प्रत्येक शेळीला २०० ग्रॅम मका दिला जातो. सकाळी १० वाजता दोन किलो प्रमाणे ओला चारा तर दुपारी दोन किलो सुका चारा जिला जातो. याच प्रमाणे रात्री आठ वाजता ओला व सुका चाऱ्याचे मिश्रण प्रत्येक शेळीला दोन किलो प्रमाणात दिले जाते. औषधोपचार व लसीकरण प्रत्येक तीन महिन्यांतून जंतनाशक औषधे तसेच महिन्यातून पाच दिवस टॉनिक दिले जाते. काही रोगांसाठी सहा महिन्यातून तर लाळ्या खुरकत वा पीपीआर रोगासाठी वर्षातून एकदा लसीकरण केले जाते. आठवड्यातून एकदा पंपाद्वारे गोठा स्वच्छ केला जातो. चाऱ्याची वैविध्यता

  • एकाच प्रकारचा चारा घेण्याऐवजी वैविध्यता जपण्याचा प्रयत्न
  • चाऱ्यासाठी शेडशेजारीच दोन एकर क्षेत्र चाऱ्यासाठी राखीव
  • लसूण घास, गोपीकृष्ण गवत, हादगा, हत्तीगवत, मका, तुती, लक्ष्मी गवत आदींची लागवड
  • चाऱ्याची गरजेनुसार रोज कापणी
  • हंगामात कोरडा चारा साठवण्याला प्राधान्य
  • भुईमूग वेल, हरभरा, तूर, सोयाबीन भुसकट, स्वत:च्या शेतातील कडबा, संकलित केला जातो.
  • अर्थकारण गेल्या वर्षाच्या कालावधीत आफ्रिकन बोअर जातीच्या पाच नरांची (पैदासीसाठी) २५ हजार रुपये प्रति नग याप्रमाणे तर आफ्रिकन बोअर जातीच्या १० माद्यांची प्रत्येकी ३० हजार रुपये याप्रमाणे विक्री केली. बकरी ईदसाठी १४ हजार रुपयांप्रमाणे २० नरांची विक्री केली. तर यात्री, माही ऊरूस यांच्या निमित्ताने २५० रुपये प्रति किलो या दराने ४० उस्मानाबादी नरांची विक्री करणे शक्य झाले. या व्यतिरिक्त लेंडी खताची चार हजार रुपये प्रति टन या प्रमाणे २३ टनांची विक्री झाली. नव्या जातींसाठी सातत्याने प्रयत्न बाहेरील राज्यातून शेळ्या आणून त्यांचे पालनपोषण करण्यापेक्षा स्थानिक जातीशी संकर करून पैदास वाढविण्याचा संदीप यांचा प्रयत्न आहे. सध्या ७५ किलो वजनाचा आफ्रिकन बोअर जातीचा नर आहे. त्याचा वापर पैदाशीसाठी करण्यात येत आहे. प्रसंगी कृत्रिम रेतनही केले जाते. मावसभावाचे मार्गदर्शन मनोबल वाढविणारे संदीप यांचे मावसभाऊ अनिल सुखदेव कोळी हे कर्नाटक राज्यातील शिप्पूर येथे शिक्षक आहेत. त्यांनाही शेळीपालनाची आवड आहे. मात्र नोकरीतून पुरेसा वेळ मिळत नसल्याने संदीप यांना सातत्याने मार्गदर्शन करण्याची कसर मात्र त्यांनी सोडलेली नाही. संदीप यांची व्यवसायातील वाटचाल लक्षात घेऊन अनिल यांच्या सौंदलगा गावी तीस शेळ्यांचे शेळीपालन युनिट सुरू केले आहे. त्याचे व्यवस्थापनही संदीप पाहतात. दोघांच्या समन्वयातून शेळीपालनासंबधित विविध प्रश्‍नांवर चर्चा होऊन अडचणीतून मार्ग निघतो. अनिल यांचा मोठा आधार हाच संदीप यांना व्यवसायात पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. संपर्क- संदीप कोळी- ९८८०९६१८०८  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com