जलस्राेतांच्या बळकटीकरणातून शेती केली ‘उत्तम’

भारी जमिनीत लागवड केलेल्या डाळिंब बागेत आपल्या कुटुंबियांसोबत उत्तमराव
भारी जमिनीत लागवड केलेल्या डाळिंब बागेत आपल्या कुटुंबियांसोबत उत्तमराव

उत्तमराव सर्जेराव आहेर (अण्णा) हे नगर जिल्ह्यातील आव्हाने खुर्द (ता. शेवगाव) येथील शेतकरी. अत्यंत उत्साही, सतत प्रयोगशील आणि विशेष म्हणजे पाण्याचे मोल जाणून त्याचे स्राेत बळकट करून उत्तमरावांनी नावाला साजेशी अशी भरीव प्रगती शेतीत केली आहे. ऊस, डाळिंब, चारा अशी विविध पिके हाताळताना शेतीतील जुन्या व नव्या अशा दोन्ही तंत्रज्ञानांचा मिलाफ घालून त्यांनी शेतीचे बळकटीकरण केले आहे. नव्या पिढीसाठी ते खरोखरच दिशादर्शक आहेत. नगर जिल्ह्यातील आव्हाने खुर्द (ता. शेवगाव) येथील उत्तमराव आहेर यांना पंचक्रोशीत प्रगतशील शेतकरी म्हणून अोळखले जाते. वडिलांच्या निधनामुळे घरची जबाबदारी अंगावर पडल्याने आठवीतूनच शाळा सोडून देणे भाग पडले. वडिलोपार्जित एकूण ५० एकर शेती. ती पूर्ण जिरायती. मात्र नावातच ज्यांच्या ‘उत्तम’ आहे अगदी तशीच त्याच पध्दतीने गेल्या ४५ वर्षांपासून कष्ट, अभ्यास, उत्साह, उमेदीने आणि मुख्य म्हणजे आनंदाने ते शेती करताहेत. पाण्याचे मोल जाणले अनेक वर्षांच्या अनुभवातून उत्तमरावांनी एक गोष्ट नक्की जाणली ती म्हणजे शेतीला पाण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध करणे आणि त्याचा मोजून मापून काटेकोर वापर करून शेती फुलवणे यावरच त्यांनी जोर दिला आहे. त्यासाठी त्यांनी पाण्याचे वेगवेगळे स्राेत निर्माण केले. सर्व स्राेतांचे पाणी शेततळ्यात एकत्र करून गरजेनुसार त्या स्राेतांचे पुनर्भरणाच्या माध्यमातून बळकटीकरण केले. इथेच त्यांच्या शेतीतील संपूर्ण यशाचे कारण सापडते. असे केले जलसंवर्धन एकूण ५० एकर क्षेत्रात गरजेनुसार टप्प्याटप्प्याने चार विहिरी व पाच बोअरवेल्स घेतले. त्यावर ऊस, कपाशी, सोयाबीन, हरभरा यासारखी पिके घेण्यास सुरवात केली. परंतु उन्हाळ्यात किंवा पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेत पाणी कमी पडत असे. त्यामुळे उत्पादनात घट येत असे. तसेच अपेक्षित पीक पद्धतीचा अवलंब करणे शक्य होत नसे. आज ती समस्या राहिलेली नाही. अतिरिक्त पावसाच्या पाण्याचा वापर ते विहीर आणि बोअरचे पुनर्भरण करण्यासाठी करतात. पुनर्भरण केले तर पाण्याच्या स्राेताचे बळकटीकरण होते हे त्यांना पक्के मान्य आहे. अपेक्षित पीक पद्धती व त्यासाठी शेततळे उत्तमरावांना ऊस, फळबाग, कपाशी, चारा आणि पारंपरिक पिके अशा प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करायचा होता. त्यासाठी ३.५ कोटी लिटर क्षमतेच्या दोन शेततळ्यांची निर्मिती केली. आज १५ एकर ऊस, ८ एकर डाळिंब, ५ एकर कपाशी, ४ एकर कांदा, ८ एकर हिरवळीचे खत तर २ एकर चारा अशी प्रमुख पिके उभी आहेत. त्यापासून अपेक्षित उत्पादन व आर्थिक फायदा होत आहे. उपलब्ध पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन खूप मोठ्या कष्टाने पाणी उपलब्ध केल्याने त्याचा वापर मोजूनच करावा हे अण्णांच्या अंगवळणी पडले आहे. प्रत्येक पिकाची पाण्याची गरज किती याचे ठोकताळे त्यांना पक्के माहित आहेत. यासाठी ते आपल्या भागातील कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके), दहीगाव (ने) येथील तज्ज्ञांची मदत घेतात. एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. पावसाळ्यात शेततळ्याजवळून वाहून जाणारे पाणी स्थिर करून ते नैसर्गिक पद्धतीने शेततळ्यात सोडण्याचे सोय त्यांच्याकडे आहे. गरजेनुसार त्याचा वापरही ते करतात. उत्तमरावांच्या शेतीची काही वैशिष्ट्ये

  • खोडवा ऊस तुटल्यानंतर त्याचे पाचट न जाळता त्याचा अाच्छादन म्हणून उपयोग. त्याने पाण्याची मोठी बचत.
  • जमिनीच्या आरोग्यावर विशेष लक्ष. त्यासाठी शेणखत, ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना निर्मित बायोकंपोस्ट, पीक फेरपालट, हिरवळीच्या पिकांचा वापर आदी तंत्रज्ञानाचा वापर.
  • जमिनीला अधिकाधिक सेंद्रिय घटक व जीवाणू मिळावेत म्हणून ‘जीवामृत स्लरी’ टाकीची उभारणी
  • राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेततळे व ठिबक तसेच कांदाचाळीची उभारणी यासाठी शासकीय योजनांचा लाभ
  • वेळेवर लागवड, पावसाने खंड दिल्यास संरक्षित पाणी देण्याचे नियोजन, मशागत, सेंद्रिय- रासायनिक खतांचा योग्य प्रमाणात वापर, किडींचा योग्य वेळी बंदोबस्त
  • भारी जमिनीत यशस्वी डाळिंब पीक खोल काळ्या आणि भारी जमिनीत डाळिंबाची लागवड करू नये असे शास्त्रीय आणि सर्वसाधारण मत आहे. मात्र उत्तमरावांनी याच मातीत हे पीक यशस्वी केले आहे. सन २०१३ साली डाळिंबाची लागवड करून आजअखेर दोन यशस्वी बहार घेतले. चालू वर्षी आठ एकरातून ४२ टन उत्पादन घेऊन विक्रीही केली आहे. एकरी उत्पादनवाढीवर भर

  • शेतीतील जुन्या चांगल्या प्रथा, जुनी शिस्त यांचा मेळ नवीन आधुनिक शेती तंत्रज्ञानाशी
  • घातल्यास नक्कीच चांगले बदल होऊ शकतात यावर उत्तमरावांचा विश्वास आणि अनुभव आहे.
  • कपाशीचे याच पध्दतीने एकरी २१ क्विंटल उत्पादन घेतले आहे.
  • प्रतिकूलतेतही जिद्दीने उसाचे एकरी सर्वाधिक ९० टनांपर्यंत तर सरासरी ६० ते ६५ टन उत्पादन ते घेतात. त्यासाठी नवीन वाण, रुंद सरीचा वापर, सेंद्रिय व रासायनिक खतांचा सूक्ष्म अन्नद्रव्यांसह योग्य प्रमाणात वापर, ठिबक सिंचन पद्धती यांचा अवलंब ते करतात. दहीगाव केव्हीकेकडील जैविक खतांचा वापर, उसात खतांचा पहारीने वापर या तंत्रावर जोर देतात.
  • उत्तमराव म्हणजे प्रचंड ऊर्जा

  • अत्यंत उत्साह, सकारात्मक विचार, कोणीही प्रेरणा घ्यावे असे व्यक्तिमत्त्व म्हणजे उत्तमराव.
  • पहाटे चार वाजता उठून सकाळी आठ वाजेपर्यंत कामांचे काटेकोर नियोजन.
  • सतत प्रयोगशील आणि प्रयत्नशील.
  • शेतीसंबंधी कुठलाही कार्यक्रम असो अण्णा तेथे नक्की हजर असतातच. केव्हीके, दहीगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग यांच्या नियमित संपर्कात.
  • ॲग्रोवन-रोजचा सखा उत्तमराव अॅग्रोवनचे न चुकता दररोज वाचन करतात. महत्त्वाच्या अंकांचे काळजीपूर्वक जतन केले आहे. अॅग्रोवनमुळेच परदेशी अभ्यास दौऱ्याबद्दल माहिती होऊन २००८ साली चीनमध्ये १२ दिवसांचा अभ्यास दौरा करण्याची संधी मिळाली. त्यांना नगर जिल्हा परिषदेने ‘प्रगतशील शेतकरी’ पुरस्काराने पूर्वीच सन्मानित केले आहे. ‘ज्ञानेश्वर’ साखर कारखान्यावर संचालक म्हणून पाच वर्षांसाठी निवडही झाली होती. कुटुंबाला केले सुशिक्षित कुटुंबातील नव्या पिढीने खूप शिक्षण घेऊन सुशिक्षित आणि सुसंस्कृत व्हावे अशी त्यांची भावना आहे. छोटा भाऊ सुरेश यांना त्यांनी कृषी पदवीधर केले. ते आज ‘ज्ञानेश्वर’ कारखान्यात शेती अधिकारी पदावर कार्यरत आहेत. पुतण्या अजय आणि मुलगा अभयदेखील कृषी पदवीधर आहेत. लोकनेते स्व. मारुतराव घुले पाटील आणि कुटुंबीय यांच्या वैचारीक संस्कारांमुळे आपली वाटचाल शक्य झाल्याचे उत्तमराव सांगतात. संपर्क- उत्तमराव आहेर- ९८५०५५९९६६ (लेखक कृषी विज्ञान केंद्र, दहीगाव-ने, ता, शेवगाव, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com