लिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण शेतीतून उंचावले अर्थकारण

लिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण शेतीतून उंचावले अर्थकारण
लिंबू, सूर्यफुलाच्या सातत्यपूर्ण शेतीतून उंचावले अर्थकारण

सांगली जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त हळ्ळी (ता. जत) येथील रामचंद्र पाटील यांनी लिंबू व सूर्यफूल यांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण शेतीतून आपल्या अर्थकारणाला आकार दिला आहे. लिंबाला कोल्हापूरची आश्वासक बाजारपेठ मिळवली. बदलत्या बाजारपेठेचा अभ्यासही तितक्‍याच जिद्दीने केला. याच जिद्दीने आपल्या मुलांना लढण्याचे बळ देत त्यांनाही शेतीत प्रवीण केले. सांगली जिल्ह्यातील जत या अवर्षण तालुक्‍याची स्थिती आजही गंभीर आहे. खरीप हंगामात पूर्वी सूर्यफुलाची शेती या भागात मोठ्या प्रमाणात केली जायची. मात्र, पावसाचे प्रमाण कमी झाले. मात्र बदलती शेती, बाजारपेठ यांचा अभ्यास करून तालुक्‍यातील हळ्ळी येथील रामचंद्र धोंडप्पा पाटील यांनी मात्र आपली पीकपद्धती निश्चित केली. ती व्यावसायिकरित्या जोपासली. व्यावसायिक पिकांचा शोध पाटील यांची २० एकर शेती आहे. पूर्वी एकत्रित कुटुंब होतं. शेतीची सर्व जबाबदारी रामचंद्र यांच्यावर होती. शेतीत कष्ट करण्याचं बळ होतं. पण पुरेसं पाणी नसल्याने शेतीत अडचणी निर्माण व्हायच्या. व्यावसायिक पिके घेणे काळाची गरज झाली होती. दावणीला ३० जनावरं होती. तीस मेंढ्या होत्या. यातून मिळणाऱ्या पैशातून प्रपंच आणि शेतीसाठी खर्च केला जायचा. लिंबू पिकाची केली निवड रामचंद्र यांचा मुलगा भीमराव म्हणाले, की माझ्या आजोबांनी १९८० च्या दरम्यान कागदी लिंबाच्या १०० झाडांची लागवड केली. त्या वेळी पाण्याचे भीषण संकट होते. मात्र, घागरीने पाणी देऊन बाग जगविली. टप्प्याटप्प्याने शंभर झाडांची बाग एक हजार झाडांपर्यंत पोचली. उसाचे पीकही होते. त्यात दुष्काळाचे सावट गंभीर झाले. चारशे ते पाचशे झाडांचे नुकसान झाले. ऊस घेणे बंद केले. सन २०१२ साली जमिनीच्या वाटण्या झाल्या. त्यामुळे वाट्याला २१० झाडे आली. भीमराव यांनी सांभाळली शेती एकत्रित कुटुंब असताना शिक्षणासाठी झगडावं लागायचं. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी परिस्थिती होती. भीमराव यांच्या चुलत बहिणीचे पती केनियात पॉलिहाउसमध्ये शेती करतात. ते चुलत्यांना सांगायचे की भीमराव यांना कृषीचे शिक्षण द्या. त्यातून भीमराव यांनी ‘बी. एस्सी. हॉर्टिकल्चर’ची पदवी घेतली. त्यानंतर पुणे येथे नोकरी केली. वडील म्हणायचे आपली शेती आहे, नोकरी करण्यापेक्षा शेतीचाच विकास केल्यास फायद्याचे ठरेल. सन २०१४ मध्ये भीमराव नोकरी सोडून गावी परतले. शिक्षणाचा उपयोग करून वडिलांना मदत करू लागले. आज त्यांचे बंधू दिलीप हेदेखील शेतीत काम करतात. आई-वडिलांचे त्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन होते. पाटील यांची शेती दृष्टिक्षेपात

  • लिंबू- सुमारे २०० झाडे. २० ते २५ वर्षे वयाची.
  • सूर्यफूल- दरवर्षी सुमारे सहा एकर, यंदा तीन एकर
  • यंदा फुले २६५ वाणाची ऊस लागवड- अडीच एकर
  • उर्वरित क्षेत्रात रब्बी आणि खरीप हंगामातील पिके
  • सन२०१४ नंतर सेंद्रिय पद्धतीवर भर
  • दोन कूपनलिका, एक विहीर, लहान शेततळे यांद्वारे शाश्‍वत पाण्याची सोय
  • लिंबाच्या प्रतिझाडाला ४० किलो लेंडीखताचा वापर
  • आठवड्यातून दोन वेळा सेंद्रिय स्लरीचा वापर
  • हस्त बहार प्रामुख्याने घेतला जातो.
  • मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांत अधिक विक्री
  • कोल्हापूर हे लिंबासाठीचे मुख्य मार्केट.
  • येथे दर कमी असल्यास विजापूर आणि हुबळी या कर्नाटकच्या बाजारपेठा
  • असे मिळतात दर

  • हिरवा लिंबू- विजापूर आणि हुबळी- ७०० ते ८०० रुपये प्रतिगोणी- प्रतिगोणीत १४०० ते १५०० लिंबू गोणी
  • पिवळा लिंबू- विजापूर आणि हुबळी- ४०० ते ५०० रु. प्रतिगोणी
  • -कोल्हापूर येथे प्रति ७०० लिंबांना ३०० रुपये दर. येथे मंगळवार आणि शुक्रवार बाजारात विक्री
  • विजापूर आणि हुबळी येथे रविवार बाजारात विक्रीसाठी
  • आठवड्याला २० ते २५ पोती गोण्यांची विक्री
  • कोल्हापूर मार्केटचा आधार बाजारपेठेबाबत भीमराव म्हणाले, की गावात सुमारे ४० ते ५० एकरांवर लिंबाच्या बागा आहेत. सर्व लिंबू उत्पादक कोल्हापूर मार्केटचा आधार घेतात. यामुळे बाजारात आवक जास्त झाली, तर अपेक्षित दर मिळत नाही. मग हुबळी आणि विजापूर येथील दरांचा आढावा घेण्यात येतो. ज्या ठिकाणी अधिक दर मिळतात त्या ठिकाणी विक्री केली जाते. सूर्यफुलाचे नियोजन

  • दरवर्षी खरिपात लागवड
  • पहिली कुळवणी २० ते २५ दिवसांनी
  • पाऊस बेभरवशाचा असल्याने सूर्यफुलाचे पीक आधार देणारे ठरते. तसेच कमी कालावधीत येते.
  • पुरेसा पाऊस न झाल्यास तुषार सिंचनाद्वारे एक किंवा दोन पाणी दिले जाते.
  • लावणीपासून ते काढणीपर्यंत उत्पादन खर्च १० हजार रुपयांपर्यंत येतो.
  • एकरी उत्पादन ८ क्विंटलपर्यंत येते.
  • विक्री- कर्नाटक राज्यातील चडचण हे गाव नजीकच्या अंतरावर अाहे. ही मोठी बाजारपेठ असल्याने
  • तेथेच विक्री करणे सोपे होते.
  • साधारण ३००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळतो.
  • संपर्क- भीमराव पाटील- ९७६४५५८६०३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com