स्वतःची विक्री व्यवस्था, मूल्यवर्धनातून उत्पन्नवाढ

फूलशेतीत रमलेले ढगे कुटुंबीय
फूलशेतीत रमलेले ढगे कुटुंबीय

एकेकाळी भूमिहीन असलेल्या काजळी रोहिणा (जि. परभणी) येथील ढगे कुटुंबीय जिद्द, कष्टाच्या जोरावर सहा एकर जमिनीचे मालक झाले. कुटुंबातील सध्याच्या पिढीतील पुसाराम व आसाराम यांनी एकाने शेती व दुसऱ्याने थेट विक्री अशा जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. फूल विक्रीबरोबर हारनिर्मिती, डेकोरेशन यातही कुशलता मिळली. त्यातूनच दोन एकरांतील फुलशेतीचे अर्थकारण यशस्वी व सक्षम करणे शक्य झाले आहे.   परभणी जिल्ह्यात सेलू तालुक्यातील काजळी रोहिणा हे दुधना नदीकाठी वसलेले छोटे गाव आहे. नदीकाठची जमीन काळी कसदार आहे. निम्न दुधना प्रकल्पाच्या कालव्याचा लाभही गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. भूमिहीन शेतकऱ्याची वाटचाल गावातील भीमराव ढगे यांना शेतजमीन नसल्यामुळे कुटुंबाच्या उपजिविकेसाठी मजुरी करावी लागे. चाळीस वर्षांपूर्वी जायकवाडी डावा कालवा प्रल्पात त्यांनी पत्नीसोबत मजुरी केली. त्यांना पुसाराम आणि आसाराम ही दोन मुले आहेत. घरच्या हलाखीच्या आर्थिक स्थितीमुळे दोघांनाही शिक्षण अर्धवट सोडून आई-वडिलांसोबत मजुरी करावी लागली. ते करीत असताना स्वतःची शेती असावी, असे वाटू लागले. प्रापंचिक गरजा भागवत पैशांची बचत करण्यावर भर दिला. त्यातील रकमेतून २००० मध्ये गावशिवारात एक एकर जमीन खरेदी केली. त्यात कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके तो घेऊ लगले. मजुरीवर कुटुंबाची उपजिविका सुरूच होती. शेतीतील उत्पन्न काही प्रमाणात शिल्लक राहू लागले. त्यातून पुन्हा २००४ मध्ये दोन एकर जमीन खरेदी केली. विचार बदलले, शेती सुधारली

  • केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून राहून चालणार नाही हे ढगे यांनी अोळखले.
  • जालना जिल्ह्यातील नातेवाइकांकडून फुलशेतीची माहिती मिळाली. त्याचा अभ्यास केला. आपणही हा प्रयोग करावा असे त्यांना वाटू लागले.
  • बोअर घेतले असल्याने सिंचनाची सुविधा झाली होती.
  • २००९ मध्ये १० गुंठे क्षेत्रावर गलांडा लागवड करून फुलशेतीचा श्रीगणेशा केला.
  • सुरवातीची विक्री, विस्तार

  • सुरवातीला गावापासून जवळच असलेल्या सेलू शहरात व्यापाऱ्यांना विक्री सुरू केली. पहिल्या प्रयत्नात ५० हजार रुपयांपर्यंत
  • उत्पन्न मिळाल्याने उत्साह दुणावला. फुलशेतीचा विस्तार करण्याचे ठरविले.
  • सर्वांनी राबवण्याचा फायदा

  • कुटुंबातील सर्व सदस्य शेतीत राबत असल्याने उत्पन्न शिल्लक राहू लागले.
  • शेजारी तीन एकर जमीन विक्रीस निघाली होती. परंतु संपूर्ण रक्कम देण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे दीड एकर जमिनीचे नगदी आणि दीड एकरची रक्कम वर्षभराने देण्याच्या बोलीवर ही जमीन खरेदी केली. बोलीप्रमाणे पुढील वर्षी संबंधितास रक्कम अदा केली.
  • आता कुटुंबाकडे सहा एकर जमीन झाली.
  • बैलजोडी खरेदी केली. सालगडी नेमले. अन्य शेतकऱ्यांच जमीन करार पद्धतीने घेण्यास सुरवात केली.
  • ढगे यांची सध्याची पीकपद्धती

  • दोन एकर फुलशेती
  • अॅस्टर - २० गुंठे, गुलाब १० गुंठे, काकडा व मोगरा प्रत्येकी ५ गुंठे, शेवंती ५ गुंठे, झेंडू १ एकर
  • हंगाम व मागणीनिहाय यात बदल
  • चार एकरांवर - कापूस, सोयाबीन, मूग, उडीद
  • फुलशेतीतील नियोजन व कष्ट

  • जबाबदारी - शेती - आसाराम, विक्री - पुसाराम
  • सुरवातीची पाच वर्षे पुसाराम सेलू येथील व्यापाऱ्यांना फुलांची विक्री करीत. ते दर कमी देत.
  • फुले विकल्यानंतर पुसाराम मजुरीच्या कामाला जात. पुढे फुलांचे उत्पादन वाढले. स्वतः फुलांची विक्री केल्यास फायदा अधिक फायदा होतो हे अनुभवातून लक्षात आले.
  • त्यानंतर स्वतःचेच दुकान सुरू करण्याचा निर्णय घेतला. सेलू शहरातील केशवराज बाबासाहेब यांच्या मंदिर परिसरात ते आहे.
  • गावापासून पाच किलोमीटरवर सेलू हे तालुका ठिकाण
  • सकाळी सहा वाजता फुलांची काढणी कुटुंबातील सदस्य करते.
  •  पुसाराम ही फुले घेऊन दुकानात येतात. यात ॲस्टर २० ते २५ किलो, गुलाब ३०० नग, काकडा २ किलो असा समावेश असतो.
  • दुपारी पुन्हा भाऊ फुले आणून देतात.
  • पुसाराम दररोज १२ ते १४ तास दुकानात असतात.
  • वर्षभराचे निव्वळ उत्पन्न - सुमारे अडीच लाख रु. (दोन एकरांतील)
  • हार - मोठा - २० ते ३० रुपये
  • लहान - १० ते १५ रुपये
  • खात्रीची बाजारपेठ परिसरात ३० ते ४० दुकाने व घरगुती २० ग्राहक वर्षभराचे बांधलेले आहेत.

    मागणी

  • अॅस्टर, गुलाब वर्षभर सुरू असतो. मोगरा उन्हाळ्यात अधिक फुलतो. श्रावण महिन्यात सणवारांची संख्या जास्त. त्यानंतर दसरा, दिवाळी सण येतात. त्यादृष्टीने फुले तोड्यास येण्यासाठी लागवडीचे नियोजन
  • सण, लग्नसराई, निवडणुका, सभा, सत्काराचे कार्यक्रम आदींसाठी फुले, हारांना मागणी
  • उत्पन्नाचे स्रोत

  • अ) फूलविक्री
  • ब) हारनिर्मिती
  • क) लग्नसराईमध्ये स्टेज सजावट, वाहन सजावट
  • शेतीची अन्य ठळक वैशिष्ट्ये

  • भीमराव व गंगूबाई हे ढगे दांपत्य वयोमानानुसार तर आसाराम, पत्नी सौ. रेखा, पुसाराम, पत्नी
  • सौ. छाया हे कुटुंब शेतीत राबते.
  • गावरान कोंबडीपालन. अंड्यांना शिवाय मांसालाही मागणी. चार शेळ्या. कोंबडी, शेळीपालनातून अतिरिक्त उत्पन्न.
  • पुसाराम अॅग्रोवनचे नियमित वाचन करतात. त्यातील यशकथा प्रेरणादायी असतात. तांत्रिक माहिती, बाजारभाव, हवामान, कीड-रोग नियंत्रण सल्ला उपयुक्त ठरतो, असे पुसाराम सांगतात.
  • पुसाराम ढगे - ९३२५७४६७७४, ८००७९२५८७३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com