स्वादयुक्त, निर्यातक्षम आंबेमोहोर केळीची शेती

पाटील सुमारे ७० एकरांत केळीची उत्तम शेती करतात.
पाटील सुमारे ७० एकरांत केळीची उत्तम शेती करतात.

निमझरी (जि. धुळे) येथील मच्छिंद्र, छगन आणि छोटूलाल या पाटील बंधूंनी केळीच्या आंबेमोहोर या वैशिष्ट्यपूर्ण वाणाची शेती अनेक वर्षांपासून यशस्वी केली आहे. सत्तर एकरांपर्यंत या वाणाच्या झाडांचे संगोपन नेटक्या व्यवस्थापनातून करून त्याची यशस्वी निर्यात साधली आहे. पपईचे क्षेत्रही ५० एकरांपर्यंत असून २० वर्षांहून अधिक क्षेत्रावर त्याचीही निर्यातक्षम शेती पाटील बंधूंनी साधली आहे . धुळे जिल्ह्यात निमझरी हे गाव शिरपूर तालुका ठिकाणापासून सुमारे सात किलोमीटर आहे. येथे तिघा पाटील बंधूची १७० एकर शेती एकाच ठिकाणी आहे. येथे ३५ कूपनलिका सिंचनासाठी आहेत. या बंधूंपैकी मच्छिंद्र शेती, व्यवहार सांभाळतात. छगन हे मार्केट, खते व पाण्याचे नियोजन पाहतात. तर छोटूलाल हे मजूर व्यवस्थापन व अन्य जबाबदाऱ्या सांभाळतात. छगन कळवण (जि. नाशिक) येथे ग्रामसेवक होते. त्यांनी १९९६ मध्ये राजीनामा दिला. त्यानंतर शेतीतच झोकून दिले. पंचायत समितीचे माजी सदस्यही ते राहिले आहेत. निमझरी विविध कार्यकारी सोसायटीचे ते अध्यक्षही आहेत. पाटील बंधूंची सुधारित शेती

  • केळी
  • -क्षेत्र- सुमारे ७० एकर, वाण- आंबेमोहोर
  • अनुभव- २० वर्षांहून
  • शक्यतो मृग बहारच घेतला जातो.
  • जमीन हलकी, पाण्याचा निचरा होणारी
  • आंबेमोहोर वाणाची वैशिष्ट्ये
  • पाटील म्हणाले, की इतक्या वर्षांच्या अनुभवातून आम्हाला दिसले आहे की हे वाण वाऱ्यामध्ये अन्य वाणाच्या तुलनेत खाली कोसळत किंवा लोळत नाही.
  • घडाचे वजन अधिक झाले तरी घड सटकत नाही वजनाने झाडे मोडण्याचे प्रमाण कमी.
  • सात ते १० इंच लांबीचे केळ. स्वाद गोड.
  • एकरी उत्पादनक्षमता चांगली.
  • कंदांपासून लागवड होते. मात्र एक महिना अन्य वाणांपेक्षा उशिरा पक्व होते.
  • उत्पादकता प्रतिघड- सरासरी २६ किलो, क्वचित प्रसंगी ३०, ३६ किलोपर्यंतही साध्य.
  • मध्यंतरी आठ ते १० हजार उतीसंवर्धित रोपांचाही प्रयोग केला. मात्र, आंबेमोहोर वाणावरत राहिला मुख्य भर.
  • यंदा या वाणाची किमान एक लाख रोपे लागवडीखाली.
  • दरवर्षी कंद अधिक लागतात. त्यांची खरेदी करायची म्हटले तर प्रतिकंद चार रुपयांपर्यंत खर्च येतो. त्यामुळे शेतातील कंदांचीच काळजी घेऊन जतन केले.
  • केळीत आंतरपीक घेणे टाळले.
  • लागवडीपूर्वी एकरी सहा ट्रॉली शेणखताचा वापर
  • लागवडीपूर्वी बुरशीनाशके व अन्य रसायनांची कंदांवर प्रक्रिया
  • जूनमध्ये तापमान कमी होते. मोकळ्या स्वरूपात एक- दोन पाणी देण्याची वेळ येते. कारण पाऊस असतोच. पावसाचा खंड असला तर पुन्हा सिंचन केले जाते. सप्टेंबरमध्ये सर्व क्षेत्राला ठिबकची सोय केली जाते.
  • खासगी प्रयोगशाळेत मातीचे नमुने तपासून अन्नद्रव्यांचे नियोजन
  • खते. किडी-रोग नियंत्रणाचे वेळापत्रक पाळले जाते.
  • एप्रिलच्या सुरवातीला कापणी सुरू होते. मागील तीन वर्षे निर्यातदार कंपन्यांच्या माध्यमातून आखाती देशांमध्ये केळी निर्यात झाली. मागील वर्षी हा आकडा सुमारे ३३५ मे. टनांचा होता.
  • जूननंतर मात्र पंजाब, दिल्ली येथील खरेदीदारांशी थेट संपर्क साधून विक्री.
  • दिवाळीपर्यंत कापणी जोमात सुरू असते.
  • कंद देतात मोफत रिकाम्या झालेल्या क्षेत्रातून कंद काढून पाटील त्याची लागवड करतात. कंद काढणीस एक हजार कंदांसाठी एक हजार रुपये खर्च येतो. म्हणजे एक कंद एक रुपयाला पडतो. पुढे पाटील यांच्याकडील कंदांना चोपडा तालुक्‍यातील तापी, अनेर काठावरील गावांंमधून मागणी वाढली. खरे तर एक कंद चार रुपयांना विक्री करून पाटील नफा मिळवू शकतात. परंतु शेतकऱ्यांना चांगले वाण, चांगले कंद मिळावेत, त्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून शेतकऱ्यांना ते कंद मोफत देतात. फक्त कंद काढण्याची एक रुपये प्रति कंद मजुरी त्यांना द्यावी लागते. पाटील बंधूंना जेव्हा लागवडीसाठी कंदांची गरज असते तेव्हा मग हे शेतकरी आपल्या क्षेत्रातील कंद काढून देतात. पपईची शेती

  • वाण- ७८६
  • जमीन हलकी असल्याने त्यात हे पीक मानवते.
  • सुमारे २० वर्षांचा या पिकातील अनुभव
  • सुमारे ५० एकरांवर लागवड
  • उत्पादन- ६० ते ७० किलो प्रतिझाड
  • मार्च व एप्रिलमध्ये सात बाय सात फूट अंतरात लागवड असते.
  • दिवाळीला काढणी सुरू होते. शहादा येथील व्यापारी खरेदी करतात. पपईत रासायनिक पद्धतीचा वापर अत्यंत कमी केला जातो.
  • पपईची देखील तीन वर्षे खासगी कंपनीद्वारे निर्यात साधली आहे.
  • शेतीची अन्य वैशिष्ट्ये कापसाची सुमारे १० एकरांवर धूळपेरणी साधारण २५ मेनंतर होते. पाऊस न आल्यास मोकळ्या स्वरूपात पाणी दिले जाते. लहान व मोठे मिळून सुमारे ४० संख्येपर्यंत पशुधन आहे. चारहजार चौरस फूट क्षेत्रात गोठा बांधला आहे. एकूण ६० ते ७० ट्रॉली शेणखत मिळते. दोन मोठे व एक छोटा ट्रॅक्‍टर व १५ सालगडी आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था शेतात व गावात पक्की घरे बांधून केली आहे. पाच सालगडी व त्यांच्या परिवाराच्या निवासाची व्यवस्था शेतातच केली आहे. संपर्क- छगन पाटील-९८२२६५१३७९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com