अळिंबी उत्पादन, मूल्यवर्धन, विक्रीव्यवस्थेसाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर

मशरूम विक्रीसाठी काढून घेताना अनंत व बहीण शुभांगी इखार
मशरूम विक्रीसाठी काढून घेताना अनंत व बहीण शुभांगी इखार

पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा भात उत्पादनासाठी ओळखला जातो. दुर्गम असलेल्या या जिल्ह्यात अनंत व श्रीकांत इखार या भावंडांनी आॅयस्टर​  मशरूम उत्पादनाच्या माध्यमातून वेगळी वाट चोखाळली. पवनी तालुक्‍यातील बाह्मणी (चौरास) या गावात या उच्चशिक्षित भावंडांनी आपला व्यवसाय सुरू केला. मार्केटिंगकरिता सोशल मीडियाचा प्रभावी वापर त्यांनी केला आहे. स्पर्धा परीक्षेऐवजी सुरू केला उद्योग एमएससीपर्यंतचे (गणीत) शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अनंतने पुणे गाठले. तब्बल दोन वर्षे त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला; परंतु अवघ्या दोन गुणांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची संधी हुकली. निराश न होता अनंतने अभ्यासासोबतच काही तरी उद्योग करता येतील का, याची चाचपणी सुरू केली. त्या माध्यमातून अर्थार्जनाचा उद्देश साध्य होणार होता. यासंदर्भाने त्याने भाऊ श्रीकांतशी चर्चा केली. या दोघांच्या चर्चेत अनेक व्यवसायांवर चर्चा झाली. त्यामध्ये शेळी, कुक्‍कुटपालनापासून रेशीमशेतीपर्यंतचाही विचार झाला; परंतु यातील एकाही व्यवसायावर एकमत होत नव्हते. दरम्यान, मशरूम व्यवसायाचा विचार मी मांडला. जंगली सात्यांना खूप मागणी जंगली सात्याला (जंगली मशरूम) पूर्व विदर्भात मोठी मागणी आहे. एक हजार रुपये किलोपर्यंतचा दर त्यासाठी खवय्ये देतात. पावसाळ्याच्या दिवसांतच याची उपलब्ध होते. भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक मागणी असल्याने लगतच्या काही जिल्ह्यांतून देखील या ठिकाणी सात्या पोचते. जंगली सात्याच्या सेवनातून काही जणांना यापूर्वी विषबाधेचे प्रकारदेखील घडले. ही परिस्थिती, ग्राहक व बाजारपेठ नजरेसमोर ठेवून व्यावसायिक अळिंबी उत्पादनाच्या निर्मितीवर कुटुंबाचे एकमत झाले. आॅयस्टर मशरूमचे उत्पादन

  • अनंत सांगतात की व्हाइट, पिंक, यलो, ब्ल्यू, किंग असे विविध प्रकार ऑयस्टर मशरूमचे (अळिंबी) आहेत. त्यातील एका प्रकारात पोषणमूल्यांचे अधिक प्रमाण असल्याने त्याचे व पिंक प्रकाराचे उत्पादन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • हरभरा, तूर कुटार किंवा धानाचा कोंडा, धान तणीस हे माध्यम वापरले जाते. ते निर्जुंतक करण्यासाठी बॅरेलमध्ये उकळले जाते. साधारण १६ तास ते बॅरेलमध्ये बंद ठेवले जाते.
  • त्यानंतर त्यातील पाणी काढले जाते. यात मशरूम सीड (बियाणे) टाकले जाते. ते १०० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने मिळते.
  • १६ बाय २० इंच आकाराच्या प्लॅस्टिक बॅगेत कुटार भरले जाते. या आकाराच्या कमीत कमी दहा; तर जास्तीत जास्त १५ बॅगांसाठी एक किलो सीड वापरले जाते.
  • मशरूमचे पहिले पीक सरासरी २५ ते ३० दिवसांत येते. हा कालावधी ठरण्यास बाहेरचे वातावरण प्रभावी ठरते. त्यानंतर सात ते दहा दिवसांनी दुसरे आणि तिसरे सात दहा दिवसांत येते.
  • घरचे सुमारे पाच सदस्य या व्यवसायात राबतात. यात वडील नारायणराव, सोबतच बहीण शुभांगी यांची मोठी मदत होते. आत्यंतिक स्थितीतच मजुरांची गरज घेतली जाते.
  • विक्रीचे नियोजन जून २०१७ पासून या व्यवसायाची सुरवात झाली. अनंत यांना पायलट नावाने परिसरात ओळखले जाते. त्यामुळे पायलट मशरूम असा ब्रॅण्ड तयार केला आहे. ताज्या मशरूमची विक्री ४०० रुपये प्रतिकिलो दराने; तर सुक्या मशरूमची विक्री २००० रुपये प्रतिकिलो दराने होते. घाऊक ग्राहकांसाठी वेगळे दर आहेत. -मशरूम पावडरला देखील मागणी असून त्याची विक्री किलोला अडीच हजार ते तीन हजार रुपये दराने होते. -सर्व विक्री थेट ग्राहकांना होते. काही ‘रिटेल शॉप’ व्यावसायिकांनाही माल दिला जातो. मूल्यवर्धन अंबाडीच्या फुलांपासून जॅम, जेली तयार करण्याचे प्रशिक्षण अनंत यांच्या आई सौ. नमीता यांनी घेतले होते. त्यानुसार जॅमनिर्मिती केली जायची. आता त्यात मशरूम पावडरचा देखील समावेश केला जातो. या माध्यमातून जॅम उत्पादनाचा पौष्टीकपणा वाढविण्याचा उद्देश आहे. जॅमची विक्री देखील घरूनच केली जाते. पाव किलोचा डबा १०० रुपये दराने विकला जातो. गेल्या वर्षी ३५० डबे जॅम बनविण्यात आला. त्याकरिता लागणारी अंबाडी घरालगतच्या जागेतच पिकवण्यात आली. समाधानकारक उत्पन्न या व्यवसायातून महिन्याला ४० ते ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, असे अनंत यांनी सांगितले. अजून तरी या भागात या व्यवसायात स्पर्धा नाही. मशरूमला मागणीही चांगली अाहे. सुक्या मशरूमची विक्री जास्त होते. या व्यवसायात सुरवातीला किमान १० हजार ते १५ हजार रुपये भांडवल गुंतवावे लागते. साधारण ३० ते५० टक्क्यांपर्यंत नफ्याचे प्रमाण असते, असे अनंत यांनी सांगितले. ‘सोशल मीडिया’चा प्रभावी वापर अनंत व बंधू श्रीकांत हे दोघेही गणित विषयातील ‘एमएस्सी’ आहेत. दोघांचाही तांत्रिक पाया चांगला अाहे. त्याधारे त्यांनी स्वतःचे यू ट्यूब चॅनेल सुरू केले आहे. आजवर या व्यवसायाशी संबंधित ५० हून अधिक ‘व्हिडिओ’ ‘अपलोड’ केले आहेत. हजारो लोकांनी ते पाहिले असल्याचे अनंत यांनी सांगितले. ‘फेसबुक’चाही त्याच पद्धतीने वापर केला आहे. सुमारे ८०० जणांनी ‘पेज’ला लाइक केले आहे. सुमारे ८०० जण फेसबुकचे फॉलोअर्स; तर ४००० पर्यंत ‘फ्रेंडस’ आहेत. सुमारे आठ हजार जणांची संपर्क यादी तयार केली आहे. अशा रितीने ‘सोशल मीडिया’ पर्यायांचा वापर व्यवसाय विस्तारासाठी केल्याचे अनंत सांगतात. भाजीपाला उत्पादन पवनी-भंडारा रोडवर इखार यांचे घर आहे. सुमारे पंधराशे चौरस फुटांचे दोन प्लॉटस आहेत. यातील एका जागेवर घर आहे. एक प्लॉट रिकामा असल्याने त्या ठिकाणी कारली, चवळी, अंबाडी, मका, काकडी, दूधी भोपळा, दोडका, वाल, हळद यासारख्या पिकांची लागवड केली आहे. प्रयोगशाळेत चाचणी उत्पादित मशरूमधील प्रथिनांची माहिती व्हावी याकरिता नागपूर येथील शासकीय प्रयोगशाळेत पृथ्थकरण करण्यात आले आहे. त्यानुसार पॅकिंगवर ही माहिती नोंदविण्यात आली आहे. अभ्यास दौरे जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासह लगतच्या काही जिल्ह्यांतील मिळून सुमारे ४० अधिकाऱ्यांनी इखार यांच्या प्रकल्पाला भेट दिली. त्यासोबतच महिला आर्थिक विकास मंडळाद्वारे महिला स्वयंसहाय्यता समूहातील सदस्यांच्या प्रकल्प भेटींचेही आयोजन केले जाते. जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच यशस्वी प्रकल्प असल्याने इतरांना प्रोत्साहन मिळावे, हा त्यामागील हेतू आहे.  

    संपर्क- अनंत इखार- ८६६८४६०९३५ 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com