शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यातील ‘पिंपळे खालसा पॅटर्न’

विविध शिक्षकांना भेट दिलेल्या चारचाकींसह यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक.
विविध शिक्षकांना भेट दिलेल्या चारचाकींसह यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि पालक.

 पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा (ता. शिरूर) या गावाने शालेय शिष्यवृत्ती परीक्षेचा राज्यात ‘आदर्श पॅटर्न’ तयार केला आहे. अत्यंत कर्तव्यनिष्ठा, झोकून देण्याची वृत्ती व अथक परिश्रमातून येथील शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना घडवले आहे. आत्तापर्यंत तब्बल ४३२ विद्यार्थी, तर यंदा १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीत चमकले आहेत. या कार्याची दखल घेत पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षकांचा सन्मान करताना दुचाकी आणि चारचाकी त्यांना भेट देण्याचा उपक्रम गेल्या आठ वर्षांपासून राबवला आहे. ग्रामस्थांनी या कृतीतून वेगळीच प्रेरणा देत एकीचे दर्शनच घडवले असून, त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून अभिनंदन हाेत आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपळे खालसा (ता. शिरूर) हे सुमारे दोन हजार लाेकसंख्या असलेले गाव. गावात पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा अाहे. इयत्ता सातवीपर्यंत येथे वर्ग भरतात. अत्यंत झोकून देऊन तळमळीने शिकवण्याची वृत्ती असलेले शिक्षक हे या शाळेचे मुख्य वैशिष्ट्य. आणि तितक्याच तळमळीने शिकण्याची आस ठेवणारे विद्यार्थी हेदेखील तेवढेच ठळक वैशिष्ट्य सांगता येईल. सन १९७१ पासूनची परंपरा पिंपळे खालसा येथील या शाळेतील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता यादीमध्ये येण्याची परंपरा काही आत्ताची नाही. त्याला ४० वर्षांहून जुनी म्हणजे १९७१ पासूनची परंपरा आहे. येथील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी घेतलेल्या परिश्रमातून तेव्हापासून ते आत्तापर्यंत तब्बल ४३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले आहेत, ही विशेष बाब म्हणावी लागेल. शिक्षकांनी घेतलेले परिश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका ललिता लंघे-धुमाळ आपली शाळा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याविषयी अगदी उत्साहाने व भरभरून बोलतात. आमच्या शाळेने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायमच जपल्याने मलाही येथे काम करण्याचा वेगळा उत्साह असतो. मुख्याध्यापिका म्हणून जबाबदारी पेलताना मला दडपण आले हाेते, की माझ्या विद्यार्थ्यांनीदेखील गुणवत्ता यादीत झळकण्याची परंपरा जपली पाहिजे. मग त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली. सकाळी आठ वाजता सुरू होते शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत नाव कमवायचं, तर थोडे कष्ट अधिक झेलायलाच हवेत. मग सकाळी आठ वाजता शिष्यवृत्तीचा वर्ग सुरू होतो. तो दोन तास चालतो. त्यानंतर दहा वाजता सुरू होतात शाळेचे मुख्य वर्ग. ते संपले की पुन्हा एक तास शिष्यवृत्ती परीक्षेचा तास. यात मग विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांच्याही संयमाची कसोटी लागते. मुख्याध्यापिका धुमाळ म्हणाल्या, की आम्ही सकाळपासून ते रात्रीपर्यंत याच कामात व्यस्त असतो. घरच्या जबाबदाऱ्या, कामं सांभाळून परीक्षा वर्गात लक्ष घालावं लागतं. पण, त्यात वेगळा आनंद मिळतो. कष्ट जाणवत नाहीत. जास्तीत जास्त प्रश्‍नपत्रिका साेडवून घेतल्या जातात. दिवाळी झाल्यानंतर तर संध्याकाळचे तास वाढवून ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालतात. यात शिक्षक, विद्यार्थ्यांबरोबर पालकही झटत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड करून एकत्रित चाचणी परीक्षा घेतल्या. यात शिक्रापूर हे मुख्य केंद्र आहे. त्या अंतर्गत सर्व शाळा अशा परीक्षांसाठी एकत्र येतात. यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षेचे दडपण जाऊन आत्मविश्‍वास वाढतो. कोण किती प्रगतिपथावर आहे, याचा अंदाज येतो. त्यादृष्टीने प्रत्येक जण आपापली वाटचाल सुधारतो. झळाळी लाभलेले यश सर्वांच्या एकत्रित कष्टांचे फळ दिसायला मग वेळ लागत नाही. पूर्वी चौथी व सातवी इयत्तेत शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जायची. आता दोन वर्षांपूर्वी त्यात बदल होऊन ती पाचवी व आठवी इयत्तेत घेतली जाते. मागील वर्षी तब्बल २९, तर यंदा १९ विद्यार्थी या शिष्यवृत्ती यादीत झळकले आहेत. पालक, ग्रामस्थांकडून अनपेक्षित भेट गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर आमच्या शाळेच्या तीन विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीमध्ये पहिल्या दहांमध्ये स्थान मिळवले. याचा शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांना खूप आनंद झाला. आमच्या शिक्षकांना अलीकडील काही वर्षांपासून ग्रामस्थांकडून प्रोत्साहित केले जात आहे. त्या अनुषंगाने मला चारचाकीच्या (फोर व्हीलर) रूपाने ग्रामस्थांनी दिलेली भेट अनपेक्षित आणि उत्साह वाढवणारी आहे. पुढील काळात जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आणण्यासाठी आणि त्यांना जबाबदार विद्यार्थी म्हणून घडविण्यासाठी सहकारी शिक्षकांच्या मदतीने प्रयत्नशील राहणार आहे. -ललीता लंघे (धुमाळ) मुख्याध्यापिका बाईंकडून विद्यार्थ्यांना आकर्षक घड्याळे भेट मुख्याध्यापिका सौ. धुमाळ यांना ग्रामस्थांनी चारचाकी भेट दिली. पण, बाईंनाही आपल्या मुलांच्या पाठीवर भेटीच्या रूपाने शाबासकी द्यावीशी वाटली. राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या शाळेतील तीन विद्यार्थ्यांना त्यांनी मनगटी घड्याळे भेट दिल्याने विद्यार्थीही भारावून गेले. छोट्या वयात गुरूंकडून मिळालेल्या अशा उत्तेजनामुळेच विद्यार्थी आणि शिक्षक यांचे ऋणानुबंध घट्ट झाले आहेत. त्यातूनच उद्याची उज्ज्वल पिढी घडणार आहे. अभ्यास आणि परीक्षेची भीती बाईंनी घालवली शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसविण्यासाठी बाईंनी आमची निवड केली. ही परीक्षा अवघड असते, असे आम्ही एेकले हाेते. त्यामुळे परीक्षेबरोबर अभ्यासाचीही भीती हाेती. पण, बाईंनी अभ्यास कसा करायचा, याची सविस्तर माहिती दिली. आमच्याकडून योग्य प्रकारे अभ्यास करून घेतला. अभ्यासाची जणू गोडीच आम्हाला लागली. सकाळी आणि संध्याकाळीही अधिक वेळ देऊन मार्गदर्शन दिले. आमच्याकडून तब्बल १०० पेक्षा जास्त प्रश्‍नपत्रिका साेडवून घेतल्या. परीक्षेचा असा नेटका सराव झाल्याने भीती गेली. यश मिळवण्याच्या दृष्टीने आम्ही तयार झालो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. मुलाचा अभिमान आहे मी चाैथी इयत्तेत असताना गुणवत्ता यादीमध्ये आलाे हाेताे. माझा मुलगादेखील गुणवत्ता यादीत झळकावा, अशी अपेक्षा हाेती. मी रांजणगाव येथे खासगी कंपनीत नोकरीस अाहे. नोकरीतील व्यस्ततेमुळे मुलांचा अभ्यास घेणे अवघड जायचे. मात्र, शिक्षक आणि मुख्याध्यापक यांनी परिश्रम घेतल्याने माझा मुलगा आेम गुणवत्ता यादीत राज्यात पाचवा आला, याचा अभिमान आहे. -गणेश हनुमंत धुमाळ गुणवत्ता मिळवलेले विद्यार्थी यंदाच्या पाचवीच्या शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत चमकलेले शाळेतील विद्यार्थी व कंसात गुण (३०० पैकी) -ओम गणेश धुमाळ (राज्यात पाचवा, गुण २७२), हर्षदा राजेंद्र शितोळे (राज्यात नववी, २६६), गुरुदत्त माऊली धुमाळ (राज्यात दहावा, २६४), प्रणव सुभाष धुमाळ (२५८), अजय युवराज झेंडे (२५४), वैष्णवी अण्णासाहेब धुमाळ (२५४), जय रोहिदास धुमाळ (२५२), सार्थक संजय सुरसे (२५०), जय गणेश धुमाळ व आशिष बापू दरेकर (२४८), गौरी मदन धुमाळ, काजल मारुती राऊत, अंजली संदीप शितोळे, हर्षदा सुनील नवगिरे (२४४), प्राप्ती पांडुरंग धुमाळ (२४२), मोहिनी भाऊसाहेब गुळवे (२२६), ओम सतीश धुमाळ (२२०), हर्षद रंगनाथ जाधव (२१८), संकेत सुनील धुमाळ (२१२). शाळेच्या इमारतीचे स्वप्न शाळेच्या नव्या अत्याधुनिक इमारत उभारणीचे काम सुरू आहे. यासाठीचा आराखडा अडीच काेटी रुपयांचा असून, आत्तापर्यंत ८० लाख रुपयांचे काम पूर्ण झाले आहे. यासाठी लाेकवर्गणी आणि लाेकप्रतिनिधी यांच्या निधीचा वापर करण्यात आला आहे. पिंपळे खालसा- शाळा व गुणवत्ता यश- दृ.िष्टक्षेपात

  • शाळेची पटसंख्या- ३५६
  • शाळा- पहिली ते सातवी इयत्तेपर्यंत
  • शिक्षक संख्या- १०
  • सन १९७१ पासून ते आत्तापर्यंत शिष्यवृत्तीत झळकलेल्यांची संख्या- ४३२
  • मागील वर्षीची ही संख्या- २९, यंदाची संख्या- १९
  • आत्तापर्यंत ज्या शिक्षकांना चारचाकी भेट म्हणून देण्यात आल्या त्यांची नावे
  • विजय गाेडसे- २०१४
  • विलास पुंडे- २०१४
  • मीनाश्री धुमाळ -२०१५
  • शरद दाैंडकर - २०१७
  • ललीता लंघे (धुमाळ)- (मुख्याध्यापिका)- २०१८
  •   विद्यार्थी घडवणारे गाव पिंपळे खालसाचे सरपंच राजेंद्र धुमाळ म्हणाले, की जिल्हा आणि राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आमच्या शाळेचे विद्यार्थी उत्तीर्ण हाेण्याची परंपरा आहे. ती कायम ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असताे. यासाठी सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षेला बसविण्याचा आमचा प्रयत्न असताे. गुणवत्ता विकासाला प्राधान्य देताना विविध उपक्रमही राबवितो. यासाठी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विविध उपक्रमांमध्ये पालकांसह लक्ष ठेवून असताे. विद्यार्थी- शिक्षकांचे नाते विद्यार्थी आणि शिक्षकांचे विश्‍वासाचे नाते निर्माण व्हावे, यासाठी पहिलीपासून ते सातवीपर्यंत एकच शिक्षक त्या वर्गाला दिला जाताे. यामुळे काेणते विद्यार्थी अभ्यासात किंवा एखाद्या विषयात कमी पडतात, त्यांची कशा प्रकारे तयारी करून घ्यायची, याचा अंदाज येताे. त्यानुसार विद्यार्थी घडत जाताे. यामुळे विद्यार्थ्यांचादेखील आत्मविश्‍वास वाढताे. यामुळे विद्यार्थी परीक्षेची भीती न बाळगता स्पर्धेला सामाेरे जाताे. शालेय वेळापत्रकाच्या तासांव्यतिरिक्त सकाळी आणि संध्याकाळी दाेन तास शिकवण्याची मेहनतही शिक्षक घेतात. या माध्यमातून विद्यार्थ्यांची सर्वांगीण तयारी करून घेतली जाते. या उपक्रमात शिक्षकांनादेखील प्राेत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी २०११ पासून दुचाकी आणि चारचाकी भेट देण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. मी २०१५ पासून सरपंचपदी अाहे. गेल्या तीन वर्षांत चारचाकी भेट देण्यात आल्या आहेत. त्यासाठी लाेकवर्गणी, पालक यांच्याकडून निधी संकलित केला जातो. ही रक्कम शिक्षकांना दिली जाते. या माध्यमातून चारचाकी खरेदीसाठी प्राेत्साहन दिले जाते.

     संपर्क- ललिता धुमाळ- ९७६४६८३७५६ (मुख्याध्यापिका) - विलास पुंडे- ९८६०३८९१९३ राजेंद्र धुमाळ (सरपंच) ७७४४०४०११३ ८३९०६४७०९९

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com