शेतकऱ्यांच्या प्रयत्नांतून झाली पाणी वितरण व्यवस्था सक्षम

शेतकऱ्यांनी थेट तलावातून आणलेली पाइपलाइन.
शेतकऱ्यांनी थेट तलावातून आणलेली पाइपलाइन.

टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे सुयोग्य वितरण, पाणीचोरीला आळा, नियमित वसुली आणि पाणीबचत असे आदर्श व्यवस्थापनाचे उदाहरण पाहायचं तर सांगली जिल्ह्यात शेटफळे (ता. आटपाडी) येते जावे लागेल. येथील रेबाई तलावावर हा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांनी संघटितपणे वाद-संघर्ष, पाणी पट्टीचा हे प्रश्‍न निकाली काढले आहेत. आता पाण्याची बचत होण्याबरोबरच आदर्श पाणी व्यवस्थापनातून रेबाई तलाव शेतीला वर्षभर "टेंभू' योजनेचे पाणी पुरवू लागला आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. या भागासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेस १९९६ मध्ये मान्यता मिळाली. आजमितीस योजनेला २२ वर्षे झाली. मात्र पाणीपट्टी आणि वीजबिल या प्रश्‍नातून ही योजना रखडली आहे. पाणीपट्टी वसूल झाल्याशिवाय योजना सुरळीत सुरू राहणार नाही. पैसे भरल्याशिवाय पाणी देणार नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाची आहे. आटपाडी तालुक्‍यात या योजनेंतर्गत सुमारे १६ हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. पाणी आल्याने शेती बदलू लागली आहे. परंतु, पाणीपट्टी वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना वेळेत पाणी मिळत नाही. टेंभू उपसा योजनेच्या पाण्याचा लाभ तालुक्‍याला २०१३ मध्ये तर शेटफळेला २०१४ मध्ये मिळाला. शेटफळेत रेबाई तलाव व ओढ्यात पाणी येते. येथे सुरवातीला पाण्याचे योग्य नियोजन नव्हते. साधारण ५२ दशलक्ष घनफूट क्षमतेचा तलाव ऐंशी टक्‍के भरण्यास पंधरा लाख रुपयांचा खर्च येई. तेवढ्या पैशांचे संकलन करावे लागे. सुरवातीला बेसुमार उपशामुळे सहाच महिन्यांत तलाव रिकामा होत असे. पाणी उपशाला मर्यादा नव्हती. काहीवेळा पाण्याचा जरुरीपेक्षा उपसा व्हायचा. कमी-जास्त उपशामुळे पाणीपट्टी संकलित करताना त्रास व्हायचा. कमी-जास्त क्षेत्र, पैसे यावरून वाद व्हायचा. अखेर समस्या सुटली शेटफळे गावातील अरुण गायकवाड पाटबंधारे विभागात वाहनचालक म्हणून काम करायचे. त्यामुळे टेंभू योजनांसंबंधी प्रत्येक गावात त्यांच्या भेटी व्हायच्या. तत्कालीन अधिकारी आर. एस. पवार हे जुनोनी (जि. सोलापूर) येथे टेंभू योजना कामानिमित्त गेले असता त्यांना जुनोनीत मीटरद्वारे पाणी देण्याचा प्रयोग पाहिला. त्यानंतर गायकवाड आणि पवार यांच्यात याबाबत चर्चा झाली. ग्रामस्थांपर्यंतही हा विषय पोचला. विचार विनिमय झाला. कोणत्याही संस्थेच्या मध्यस्थीशिवाय ग्रामस्थांनी एकत्र येत पाणी मीटर बसवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तलावावरील सर्व विद्युत पंपांना गेल्या वर्षी मीटर बसवण्यात आले. त्याशिवाय पंप सुरू करू दिले नाहीत. शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन त्यासंबंधी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. सन २०१६ पासून हा प्रयोग सुरू आहे. पाणी मीटर उपक्रम- वैशिष्ट्ये

  •  सध्या पाणीपट्टीची आकारणी युनिटला १ रुपया ७५ पैसे दराने केली जाते.
  •  तलावात नेहमी बऱ्यापैकी पाणी शिल्लक ठेवले जाते.
  •  प्रति युनिट पैसे आकारणी झाल्याने आपोआपच बेसुमार उपशाला चाप बसला.
  • शेतकरी गरजेएवढेच पाणी उपसू लागले.
  • तलावाची पाणी क्षमता ५२ दशलक्ष घनफूट आहे. भरल्यानंतर तो सहा महिन्यांत रिकामा व्हायचा. आता तलावात वर्षभर पाणीसाठा राहू लागला आहे.
  • अनेक शेतकऱ्यांची पाणीपट्टीची रक्कम कमी झाली आहे.
  • सहा महिन्यांच्या पैशात वर्षभर पाणी मिळू लागले.
  • शेतकऱ्यांनी ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू केला आहे.
  • तलावातील पाण्याने भिजणाऱ्या ८० टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर झाला आहे.
  • महिन्याला होते बैठक गावातील शेतकरी दर महिन्याला बैठक घेतात. त्यात प्रत्येक मीटरचे युनिट आणि पैसे सांगितले जातात. पारदर्शी कारभारामुळे तक्रारी उरलेल्या नाहीत. पाणीपट्टी वसुलीचा त्रास शंभर टक्‍के बंद झाला. "टेंभू'च्या अधिकाऱ्यांना वसुलीसाठी घरोघरी जावे लागत नाही. शासनाने उपसा योजनेच्या पाण्याचे दर कमी केले आहेत. त्यामुळेही दरडोई वा हेक्‍टरी पाणीपट्टी आणखी कमी होणार आहे. यात ८१-१९ प्रमाणे शेतकऱ्यांना प्रति युनिटमागे ४० पैसे द्यावे लागतील. यात पाण्याचे बाष्पीभवन, पाणी मुरणे आदींचा विचार केला तर काही प्रमाणात वाढ होऊ शकते.

  • एकूण विद्युत पंप - ७०.
  • बसवलेले मीटर - ७०
  • शेतकऱ्यांची संख्या - ४७०
  • प्रत्यक्षात लाभ घेत असलेले शेतकरी - ३५०
  • भविष्यात लाभ घेणारे शेतकरी - १२०
  • तलावाची क्षमता- ५२ दल. घ.फूट.
  • लाभक्षेत्र- ४०० ते ५०० हेक्‍टर.
  • पाणीपट्टी आकारणीचा दर. 1 युनिट-1 रु. ७५ पैसे
  • तलावापासून शेतापर्यंत पाइपलाइन - चार इंची
  • पाइपलाइन- १० फूट लांब, चार फूट खोल
  • एका चारीत आठ पाईप्सचा वापर
  • एकत्र पाइपलाइन केल्याने खर्चात बचत
  • गळती काढण्यासाठी दोन पाईप्समध्ये एक ते सव्वा फूट अंतर 
  • प्रतिक्रिया विद्युतपंपांना मीटर बसवल्यामुळे कमी जास्त पाणी उपशावरून होणारे वाद कमी झाले आहेत. पाणीपट्टी वसुली शंभर टक्‍के आहे. वसुलीचा त्रास कमी झाला आहे. शेतकऱ्यांना पाणीबचतीचे महत्त्व पटले आहे. पाणी व्यवस्थापन सुधारले आहे. एकूण पाणी वितरणाला शिस्त लागली आहे. अरुण गायकवाड निवृत्त पाटबंधारे कर्मचारी व शेतकरी. संपर्क- ९४२१२२६५०५ पाणी नसल्याने डाळिंबाची लागवड करता येत नव्हती. आम्ही तिघा शेतकऱ्यांनी रेबाई तलावातून पाइपलाइन केली. त्यातून तिघांची ३० एकर शेती ओलिताखाली येण्यास मदत झाली. त्यामुळे वेळेत आणि कमी पाण्यात शेती करण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. -मारुती गायकवाड, शेतकरी शेटफळे संपर्क-९८१९११४२६१ परिसरात विहीर, कुपनलिकांना पाणी लागत नसल्याने पिकांना वेळेत पाणी मिळत नसे. त्यामुळे मीटरद्वारे पाणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शेतात पाइपलाइन करून ठेवली आहे. यंदापासून पाण्याचा वापर योग्य प्रकारे केला जाणार आहे.' -दत्तात्रय कांबळे संपर्क--९७६३८३५६२५ तलावापासून पाच किलोमीटर अंतरावर आमची शेती आहे. तीघा जणांत पाइपलाइन केली असून सुमारे २५ लाख रुपये खर्च त्यासाठी आला आहे. डाळिंबासाठी टॅंकरने पाणी वापरायचो. सुमारे तीन महिन्यांसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च यायचा. मात्र तलावातून पाणी आणल्याने टॅंकरच्या खर्चात बचत झाली. पाणी साठवण्यासाठी शेततळे घेतले असून तलावातील पाणी आवश्‍यकतेनुसार पंपाद्वारे उचलून तलावात साठवण्यात येते. -शंकर गायकवाड संपर्क-९८६०९८६९५८    

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com