'आरोग्यम धनसंपदा’ ब्रीद प्रत्यक्षात उतरवलेले शिरगुप्पी

पंधरा वर्षांपूर्वी गावची अवस्था बिकट होती. परंतु विविध योजना व ग्रामस्थांच्या सहकार्यातून बदल केले. सर्वाधिक काम पाण्यावर केले. त्याचा सकारात्मक परिणाम आम्हाला दिसून येत आहे. पंधरा वर्षांपूवी महाराष्ट्रातील तुंग, जैनाळ, कवठेपिरान गावांचा दौरा केला. त्यांचा आदर्श घेतला.स्वच्छ गाव म्हणून आमच्या गावाकडे पाहिले जाते. आमच्या राज्यात इतरत्रही शिरगुप्पीप्रमाणे काटेकोर काम करा असा सल्ला दिला जातो. कंत्राटदारदेखील गावच्या शिस्तीचे, नियमांचे पालन करतात. या सर्वांचे फळ आता मिळत आहे. - रामगोंडा पाटील ग्रामपंचायत सदस्य, शिरगुप्पी संपर्क- ०९९०२२९५४४४
शिरगुप्पी गावाने उभारलेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प
शिरगुप्पी गावाने उभारलेला पाणी शुद्धीकरण प्रकल्प

महाराष्ट्र राज्याच्या सीमेजवळ असलेल्या कर्नाटक राज्यातील शिरगुप्पी (ता. कागवाड, जि. बेळगाव) गावाने आरोग्यावर सर्वाधिक भर दिला. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात विविध तंत्रांचा वापर करून स्वच्छ पाणी ग्रामस्थांना पुरवले. याचबरोबर संगणकीय व आॅनलाइन व्यवहार, चकाचक रस्ते अशा अन्य सुविधा देताना राज्यात स्वतःचा आदर्श तयार केला आहे. पथदर्शी पिण्याच्या पाण्याची योजना शिरगुप्पीला १९९५ पर्यंत पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. चार किलोमीटर अंतरावरील कृष्णा नदीवरून पाणी आणून ते पिण्यासाठी वापरण्यात यायचे. अतिशय गढूळ आणि अस्वच्छ अशा पाण्यामुळे कॉलरा किंवा अन्य आजारांनी गावात सतत रुग्ण आढळायचे. सन १९९७-९८ मध्ये जागतिक बॅंकेच्या अर्थसाह्याने ९७ लाख रुपयांची योजना मंजूर झाली. त्यातून पाणी व्यवस्था सुधारण्याचे ठरले. पाणी योजना झाली कार्यान्वित पाणी योजना सुधारण्यासाठी सर्वप्रथम २२.५ अश्‍वशक्तीचे पंप जॅकवेलवर बसविण्यात आले. आठ इंचांच्या पाइपलाइनद्वारे पाणी शिरगुप्पीत आणण्यात आले. कोणत्याही परिस्थितीत शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, हा हेतू पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थही सरसावले. हे पाणी नदीतून चार भागात बांधलेल्या स्लो सॅंड फिल्टर मध्ये येते. तिथे शुद्ध केले जाते. अडीच लाख लिटर क्षमतेच्या दोन टाक्‍यांमार्फत गावाला पाणीपुरवठा होतो. वापरलेली वाळू यंत्राच्या साह्याने स्वच्छ करून तिचा पुनर्वापर केला जातो. चोवीस तास या प्रक्रियेकडे लक्ष असल्याने शुद्ध पाणी गावाला मिळते. परदेशी तंत्रज्ञानाचे ‘प्रेशर मशिन’ यंत्रणा वापरल्याने पाण्याची गुणवत्ता चांगली आहे. ‘आरओ’ पद्धतीचा उपक्रम गावात आरअो अर्थात ‘रिव्हर्स आॅसमॉसिस’ पद्धतीची यंत्रणा डॉ. प्रभाकर कोरे यांच्या जनशक्ती संस्थेच्या सहकार्याने ग्रामपंचायतीने उभारली आहे. पाच रुपयांना वीस लिटर पाणी या यंत्रणेमार्फत दिले जाते. या यंत्रणेत डिजिटल पद्धतीचा वापर केला आहे. ‘एटीएम’च्या धर्तीवर ‘वॉटर कार्डस’ ग्रामस्थांना देण्यात आले आहेत. हे कार्ड ‘रिचार्ज’ करून वापरण्यात येते. त्याच्या वापरातून आवश्‍यक तितके पाणी घेता येते. अन्य पाच ते सात गावांतील नागरिकही हे पाणी गरजेनुसार घेऊन जातात. त्यामुळे ग्रामपंचायतीचा महसूलही वाढला आहे. घरगुती सार्वजनिक कार्यक्रमांसाठी, थेट घरपोच सशुल्क सेवाही ग्रामपंचायती मार्फत जलदूत या वाहनामार्फत दिली जाते. यामुळे प्रत्येक घरात मागणी केल्यास ‘आरओ’ पाणी मिळू शकते. गुगलसह अन्य पुरस्कारांनी गौरव जागतिक बॅंकेच्या सहकार्याने राबविलेली पिण्याच्या पाण्याची योजना कर्नाटक राज्यात केवळ शिरगुप्पीत यशस्वी झाली. याची दखल ‘गुगल’ने घेतली. गावाला याबाबतचा विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. याशिवाय स्वच्छतेबाबत केंद्रापासून राज्य, जिल्हा, तालुका पातळीवरचे सुमारे डझनाहून अधिक पुरस्कार ग्रामपंचायतीने पटकाविले आहेत. रोगराई झाली हद्दपार स्वच्छ पाणी मिळाल्याने रोगराई हद्दपार झाली आहे. गेल्या दहा वर्षांत गावात आरोग्याची समस्या फारशी उद्भवलेली नाही. अत्यावस्थ रुग्णांना तातडीने सेवा मिळण्यासाठी ग्रामपंचायतीने आपली रुग्णवाहिका सज्ज ठेवली आहे. तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्याने अनेक रुग्णांचे जीव त्यामुळे वाचवणे शक्य झाले आहे. चकाचक रस्ते गावात फिरताना खड्डे, त्यात पाणी साचणे असे प्रकार दिसत नाहीत. तब्बल पंचवीस किलोमीटरचे रस्ते, गावातील गल्ल्यादेखील डांबरीकरण, व कॉँक्रिटीकरणाने जोडले आहेत. साहजिकच स्वच्छ, धूळमुक्त रस्त्यांचा अनुभव येतो. गावात शौचालयांची सुविधा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी गटारे असल्याने ती सातत्याने साफ करण्यात येतात. त्यामुळे कुठेही दुर्गंधी दिसून येत नाही. पारदर्शक, ‘ऑनलाइन’ व्यवहार आदर्श ग्रामपंचायतीचे कार्यालय म्हणून शिरगुप्पीकडे पाहता येते. गेल्या दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीने व्यवहार ‘कॅशलेस’ केले आहेत. दाखले वा अन्य कामांसाठी रोख रक्कम न घेता ग्रामपंचायतीकडून चलन घेऊन ते नजीकच्या बॅंकेत भरण्याची सोय आहे. घरफाळाही याच पद्धतीने भरला जातो. व्यवहार ऑनलाइन केल्याने तो पूर्णपणे पारदर्शक आहे. साहजिकच भ्रष्टाचाराचा वावच नाही. पैसे भरल्याशिवाय दाखलाच उपलब्ध होणार नाही, अशी ‘सॉफ्टवेअर’ प्रणाली विकसित केली आहे. यामुळे वशिलेबाजीला थाराच उरत नाही. नावीन्यपूर्ण बाबी लाइव्ह ग्रामसभा प्रसंशनीय बाबी म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सभागृह आहे. तेथील ग्रामसभा ‘लाइव्ह’ केल्या जातात. ही यंत्रणा ग्रामपंचायतीनेच उभारली आहे. सार्वजनिक व्यासपीठावरील कार्यक्रमांसह अन्य महत्त्वाच्या सभाही गावातील ‘केबल ऑपरेटरिंग’मार्फत ‘लाइव्ह’ दाखविल्या जातात. यामुळे घरी बसूनही ग्रामसभा व अन्य कार्यक्रमांचा अनुभव घेता येतो. प्रभावी संदेश यंत्रणा विविध ठिकाणी दीडशे ध्वनिक्षेपक बसविले आहेत. त्यासाठी स्वतंत्र ‘साउंड रूम’ तयार करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास त्या संदर्भाने आवश्यक सर्व बाबींची माहिती त्याआधारे कल्पना दिली जाते. गॅसगाड्या तसेच अन्य बाबींसाठीही त्याचा आधार घेतला जातो. प्रत्येक घरात संदेश पोचेल अशी यंत्रणा उभी केल्याने जलदरीत्या प्रत्येक घरापर्यंत पोचता येते. यासाठीही स्वतंत्र ‘ऑपरेटर’ची नेमणूक करण्यात आली आहे. ‘मोबाइल अॅपद्वारे गावतील घडामोडी कामानिमित्त गावाबाहेर असलेल्या ग्रामस्थांना कळण्याची सोय करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीत नवा स्टुडिओ उभारून विविध योजनांची माहिती देण्याचेही प्रयत्न आहेत. ग्रामपंचायतीचे वाढले उत्पन्न संपूर्णपणे मोजणीवर (चौरस फूट) घरफाळा आकारणारे कर्नाटक राज्यातील शिरगुप्पी एकमेव गाव असल्याचा दावा ग्रामस्थांचा आहे. कोणताही न्यायनिवाडा करायचा झाल्यास घरफाळा, पाणीपट्टी भरली आहे का, याची चौकशी करुनच मगच तंटे सोडविण्यास प्राधान्य दिले जाते. यामुळे कर चुकवेगिरी पूर्णपणे थांबली आहे. यातून ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पादनात एक लाखावरून तब्बल ३३ लाखापर्यंत वाढ झाली आहे. डिजिटल लायब्ररी नव्या पिढीला आकर्षिक करणारी ‘डिजिटल लायब्ररी’ ग्रामपंचायतीने विकसित केली आहे. टॅबद्वारे पुस्तके वाचण्याची सोय त्यात करण्यात आली आहे. यामुळे वाचन संस्कृतीकडे गावातील तरुण आकर्षित होत आहेत. संपूर्ण गाव बागायती गावाचे पिकांखापलील क्षेत्र सुमारे ५३०० एकर आहे. शंभर टक्के गाव बागायती आहे. अनेक शेतकऱ्यांनी गटाद्वारे व योजनांचा लाभ घेत नदीचे पाणी शेतापर्यंत आणले आहे. यामुळे ऊस, पपई, द्राक्षे, सोयाबीन आदी पिके पाहण्यास मिळतात. कामांद्वारे तयार केलेला दबदबा गावातील नावीन्यपूर्ण उपक्रमांत ग्रामपंचायत सदस्य रामगोंडा पाटील यांचा मोठा वाटा आहे. गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ त्यांनी सरपंच पदासह विविध पदांवर काम केले आहे. कर्नाटक राज्य ग्रामपंचायत सदस्यांच्या महावकुटचे ते बेळगाव जिल्हाध्यक्ष व कर्नाटक ग्रामपंचायत राज्य समितीचे सदस्यही आहेत. पाणी योजना किंवा अन्य कामे असो, भ्रष्ट व्यक्तींशी दोन हात करून त्यांनी गावाच्या विकासाला प्राधान्य दिले. यासाठी विविध आंदोलने, उपोषणे केली. गावातील वाईट प्रवृत्तींचा सामनाही करावा लागला. गावात अनेक अशक्‍यप्राय गोष्टी करून दाखविल्या. ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार थांबविला. शासकीय कामातील खाबुगिरीला आळा घालण्यासाठी थेट बंगळूरलाही धाव घेतली. यामुळेच त्यांचा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला आहे. विद्यमान सरपंच इक्‍बाल कनवाडे, पंचायत अभिवृद्धी अथिकारी गोपाळ माळी, पद्माण्णा कुंभार यांच्या व्यवस्थापनाखाली ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित सुरू आहे. शिरगुप्पी - अन्य वैशिष्ट्ये

  • कागवाड, अथणी तालुक्‍यातील विकासाचे केंद्र
  • दहा हजार लोकसंख्या
  • दहा वर्षांपासून ग्रामपंचायतीत डिजिटल व्यवहार
  • प्राथमिक आरोग्य केंद्रासह स्वआरोग्य जागृतीसाठी प्रयत्न
  • अंगणावाडीपासून महाविद्यालयापर्यंतच्या सुविधा
  • अद्ययावत व्यायामशाळा, कुस्ती तालमीची उभारणी
  • *लाइव्ह ग्रामसभा, दीडशे साउंड सिस्टिमद्वारे ग्रामस्थांशी संपर्क
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com