पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया

पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया
पाैष्टिकता वाढविण्यासाठी चाऱ्यावर करा प्रक्रिया

जानेवारीपासून ते जुलैपर्यंत बहुतांशी जनावरांना केवळ सुक्का चारा दिला जातो. हा सुक्का चारा निकृष्ट दर्जाचा, बेचव अाणि पचण्यास कठीण असतो. उदा. कडबा, सोयाबीन भुसकट, गुळी इ. असा चारा पशू आहारात वापरल्यास जनावरांचे आरोग्य बिघडते, त्याचबरोबर उत्पादनही घटते, प्रजनन क्रियेत अडथळे येतात. हे लक्षात घेऊन उन्हाळ्यामध्ये जनावरांच्या आहाराबाबत जागरुकता बाळगणे अावश्‍यक अाहे.  कोरडवाहू शेती असेल तर वर्षभर हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेणे शक्‍य होत नाही. बहुतांशी पशुपालक हे १ ते २ जनावर संगोपन करून व्यवसाय करतात. मुरघास प्रक्रियेद्वारेसुद्धा हिरव्या चाऱ्याची साठवणूक करतात. परंतु तरीही जनावरांची चाऱ्याची गरज पूर्ण होत नाही. त्यासाठी चाऱ्यावर प्रक्रिया करणे अावश्‍यक अाहे. चाऱ्याची कुट्टी 

  • चारा आहे त्या स्वरूपात कुट्टी न करता दिल्यास बराचसा (४० ते ५० टक्के) चारा पाचटासोबत वाया जातो.
  • कुट्टी न केलेला चारा पचण्यासाठी जड असतो. असा चारा खाण्यासाठी, चावण्यासाठी जनावरांची जास्तीची ऊर्जा वाया जाते म्हणून चारा कुट्टी करूनच द्यावा. हा चारा जनावरे आवडीने खातात.
  • चाऱ्यावर पोटातील विकर हे जास्त कार्य करतात त्यामुळे पचनक्रिया वाढते.
  • कमी जागेत जास्त चारा साठवता येतो. चारा कुट्टीमुळे सर्व चारा खाल्ला जातो. कमी चाऱ्यामध्ये जनावरांचे संगोपन करता येते.
  • शेतातील दुय्यम पदार्थ कुट्टी करून काही प्रमाणात उपलब्ध चांगल्या चाऱ्यासोबत मिसळून वापरता येतात. 
  • वाळलेला चारा हा चवहीन, खाण्यास कठीण असतो. त्यामध्ये पोषणतत्त्वे ही कमी प्रमाणात असतात म्हणून अशा चाऱ्यामधून जनावरांचे पोषण करण्यासाठी त्यावर प्रक्रिया गरजेचे आहे. यामध्ये गूळ आणि मिठाची प्रक्रिया, मळी आणि युरिया किंवा गूळ आणि युरियाची प्रक्रिया करता येते.
  • चाऱ्यावर गूळ अाणि मिठाची प्रक्रिया 

  • प्रक्रिया करताना १०० किलो चाऱ्यासाठी १ किलो गूळ आणि १ किलो मीठ २० ते २५ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करावे. हे द्रावण शंभर किलो चाऱ्यावर समप्रमाणात फवारावे.  हा चारा १२ ते २४ तास झाकून ठेवून नंतर जनावरांच्या आहारात वापरावा.
  • या प्रक्रियेमुळे चारा मऊ होतो. चव वाढल्यामुळे असा चारा जनावरे आवडीने खातात.
  • उन्हाळ्यामध्ये जनावरांना दररोज ३० ग्रॅम मीठ आणि १०० ते १५० ग्रॅम गूळ दिल्यास तात्काळ ऊर्जा मिळून जनावर तरतरीत राहते. जनावरांच्या शरीरावर ताण येत नाही.
  • युरिया आणि मळी किंवा युरिया आणि गुळाची प्रक्रिया 
  • निष्कृष्ट चाऱ्याचा वापर जनावरांच्या आहारात होत असेल तर त्यातून पोषणतत्त्वे गरजेनुसार जनावरांना मिळत नाहीत म्हणून अशावेळी चाऱ्याची पचनीयता, खाण्याचे प्रमाण वाढण्यासाठी युरिया आणि मळी किंवा युरिया आणि गुळाची प्रक्रिया करावी.
  • १०० किलो निकृष्ट चाऱ्यासाठी ४ किलो युरिया, ४ किलो गूळ किंवा १० किलो मळी, १ किलो मीठ आणि १ किलो क्षारमिश्रण ४० ते ५० लिटर पाण्यामध्ये विरघळून घ्यावे.
  • चाऱ्याचा जमिनीवर किंवा प्लॅस्‍टिकवर ४-४ इंचाचा थर तयार करून त्यावर हे तयार केलेले द्रावण समप्रमाणात फवारावे. फवारलेला चारा २१ दिवस हवाबंद स्थितीत झाकून ठेवावा. 
  • २१ दिवसानंतर चारा जनावरांना खाण्यास द्यावा. चारा खाण्यास देण्यापूर्वी दोन तास हवेत उघडा ठेवावा, जेणेकरून त्यातील जास्तीचा अमोनिआ निघून जाईल. असा प्रक्रिया केलेला चारा ४ ते ८ किलो एका जनावरास याप्रमाणे द्यावा.
  • सहा महिने वयाच्या आतील जनावरांना असा प्रक्रिया केलेला चारा खाण्यास देऊ नये. असा चारा देतेवेळस मुबलक पिण्याच्या पाण्याची सोय असावी.
  • जनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा.
  • फायदे 

  • चाऱ्याची चव वाढते. खाण्याचे प्रमाण वाढून चाऱ्याचा अपव्यय टाळला जातो.पचनीयता वाढते. प्रथिनांचे प्रमाण वाढते.
  • कमी चाऱ्यात जनावरांचे पोषण करता येते.
  • बायपास फॅट/ बायपास प्रथिनांचा वापर : उन्हाळ्यात वाळल्या चाऱ्यामधून जनावरांना हवी तेवढी ऊर्जा आणि प्रथिने मिळू शकत नाहीत. दूध उत्पादनात घट होते हे टाळण्यासाठी कमी खाद्यातून ऊर्जा आणि प्रथिने मिळवण्यासाठी बायपास फॅट आणि बायपास प्रथिनांचा आहारात वापर करावा. जनावरांसाठी पाणी : वाढत्या तापमानामुळे जनावरांची पाण्याची गरज वाढते. या काळात पाणी कमी पडल्यास उष्माघाताने जनावरे दगावू शकतात. या काळात जनावरांसाठी २४ तास थंड, स्वच्छ पाण्याची सोय करावी. क्षारमिश्रण

  • उन्हाळ्यामध्ये सकस आणि गरजेनुसार चाऱ्याच्या कमतरतेमुळे दुधाळ जनावरांमध्ये विशेषतः म्हशीमध्ये उरमोडी हा आजार जास्त दिसतो.
  • केवळ सुक्या चाऱ्याच्या पुरवठ्यामुळे जनावरामध्ये फॉस्फरसची कमतरता होते. त्यामुळे जनावरे चप्पल, दगड, दोरी, प्लॅस्टिक इ. अखाद्य वस्तू खातात. यामुळे जनावर दगावण्याची, निकामी होण्याची शक्‍यता असते.
  • चाऱ्याच्या कमतरतेमुळे बरेचसे आजार उद्‌भवतात. हे टाळण्यासाठी ज्या ज्या वेळी केवळ सुक्का चारा आहारात आहे, त्या वेळी आहारात क्षारमिश्रणाचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे.
  • वेगवेगळ्या कंपन्यांचे क्षारमिश्रण बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातील चांगल्या प्रतिचे तसेच आवश्‍यक घटक असणारे क्षारमिश्रण दररोज वापरावे. उन्हाळ्यात शक्‍यतो चिलेटेड क्षारमिश्रणाचा जनावरांच्या आहारात पशूतज्ज्ञांच्या सल्याने वापर करावा.
  •    ः डॉ. प्रफुल्लकुमार पाटील, ९४२३८७०८६३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com