दुष्काळातही शिवार समृद्ध करण्याचे लाखेगावचे प्रयत्न 

गावशिवारात जलसंधारणाची कामे झाली. विविध पूरक व्यवसायांतून अर्थकारणाला हातभार लागला. केव्हीके, कृषी विभागामुळे ज्ञान, तंत्रज्ञान मिळू लागले. गावकऱ्यांना पाच रुपयांत २० लिटर शुदेध पाणी देण्याचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. कायम उद्योगी राहण्याकडे गावातील युवा वर्गाचा कल आहे. -अंकुश रहाटवाडे सरपंच, लाखेगाव गावशिवारात जलसंधारणाची कामे झाली. विविध पूरक व्यवसायांतून अर्थकारणाला हातभार लागला. केव्हीके, कृषी विभागामुळे ज्ञान, तंत्रज्ञान मिळू लागले. गावकऱ्यांना पाच रुपयांत २० लिटर शुदेध पाणी देण्याचे काम चार महिन्यांपासून सुरू केले आहे. कायम उद्योगी राहण्याकडे गावातील युवा वर्गाचा कल आहे. अंकुश रहाटवाडे सरपंच, लाखेगाव संपर्क- ७७७४९४१६९७
लाखेगावात शेतीसह रेशीमशेती व अन्य पूरक व्यवसाय वाढीस लागले आहेत.
लाखेगावात शेतीसह रेशीमशेती व अन्य पूरक व्यवसाय वाढीस लागले आहेत.

पिकांची विविधता, पूरक उद्योगांचेही वैविध्य, रोजगाराची शोधलेली वाट, फळे-भाजीपाला-धान्य थेट विक्रीचा पर्याय, बचत गटातून बचतीचा मंत्र, जलसंधारणाची कामे. औरंगाबाद जिल्ह्यातील लाखेगावच्या ग्रामस्थांनी अशा विविधांगी कामांतून आपल्या शिवारातील समद्धी जपण्याचा प्रयत्न चालविला आहे. दुष्काळाचं संकट घोंघावते आहे, परंतु त्याला सामोरे जात त्यावर मार्ग काढण्याचे त्यांचे प्रयत्न दखलपात्र आहेत.    असे आहे लाखेगावचे शिवार  औरंगाबाद जिल्ह्यात पैठण तालुक्यांतर्गत गटग्रामपंचायत असलेल्या लाखेगाव-अलिपुरात जवळपास अडीचशे उंबरे असून साडेसहाशे हेक्‍टरचे गावशिवार आहे. त्यात कापूस, तूर, बाजरी, मका, रब्बी ज्वारी, मूग, उडीद, मोसंबी, डाळिंब, पेरू, चिकू, सीताफळ, शेवगा, फळभाज्या, पालेभाज्या, तुती अशी विविधता आढळते.  गावातील क्षेत्र  सुमारे १५ एकरांत डाळिंब, ५५ ते ६० एकरांत मोसंबी, १२ एकर पेरू, १० एकर चिकू, २० ते २२ एकर सीताफळ (बाळानगर व एनएमके गोल्ड वाण)  जलसंधारण 

  • साडेसहाशे हेक्‍टरवर बांधबंदिस्ती 
  • दोन किलोमीटर परिसरात येलगंगा नदीचे खोलीकरण 
  • जवळपास शंभरावर विहिरी, बोअर्सचीही बऱ्यापैकी संख्या. सुमारे वीस शेततळी. त्यातील बारा अस्तरीकरण झालेली. 
  • सेंद्रिय भाजीपाला उत्पादन व थेट विक्री  कृषी विभागाच्या ‘आत्मा’ यंत्रणेतून सेंद्रिय माल उत्पादित करणाऱ्या ५० शेतकऱ्यांचा गट स्थापन करण्यात आला आहे. त्या माध्यमातून ५० एकरांत विविध भाजीपाला, फळे घेतली जातात. दोन वर्षांपासून सेंद्रिय प्रमाणीकरण करण्यात आले आहे. शेतकरी बाजाराच्या माध्यमातून तसेच स्वप्रयत्नांतून औरंगाबाद शहरात जोडलेल्या निवासी सोसायट्यांमधील ग्राहकांना थेट विक्री पध्दत शेतकऱ्यांनी अवलंबिली आहे.  पूरक व्यवसाय 

  • गावात पाचपासून ४० पर्यंत शेळ्यांची संख्या असणारी ३० शेतकरी कुटुंबे आहेत. 
  • कुटुंबाच्या अर्थकारणाला संकटसमयी त्याचा मोठा हातभार लागतो आहे. 
  • सुमारे २५ ते ३० कुटुंबांनी कुक्कुटपालनाची जोड दिली आहे. देशी पाच कोंबड्यांपासून ३०० पर्यंत त्यांची संख्या असणारी कुटुंबे आहेत. अंड्यांसोबतच कोंबड्यांच्या विक्रीतूनही अर्थार्जन होत आहे. 
  • गावातील दहा ते बारा लोकांकडे दुग्ध व्यवसाय आहे. सुमारे ३० ते ३५ म्हशी, शंभरावर दुभत्या गायी आहेत. दोन ते पाच लिटरपर्यंत दूध देणाऱ्या या गायी दुष्काळात अनेक कुटुंबाच्या अर्थार्जनाचे साधन बनल्या आहेत. गावाबरोबरच बीडकीन, पाडळी आदी ठिकाणी दुधाची विक्री होते. डेअरीला दूध घातले जाते. 
  • बचत गट व अन्य उद्योग  गावात दहा पुरुषांचे तर दहा महिलांचे बचत गट आहेत. सन २०१०- ११ पासून सुरू असलेल्या या गटांमधील प्रत्येक सदस्य महिन्याला प्रत्येकी शंभर रुपयांची बचत करतात. शिवणकाम, मसाला कांडप यंत्र चालविणारेही गावात आहेत. तीन ते चार महिलांकडे घरगुती लघू उद्योग आहेत.  आडवे बोअर घेण्याऱ्या यंत्राचं गाव  दुष्काळाशी सामना करणाऱ्या भागात सातत्याने भूगर्भात पाण्याचा शोध सुरू असतो. लाखेगावातील लोकही त्याला अपवाद नाहीत. गावात सुमारे पन्नास जण विहिरीत आडवे बोअर घेणाऱ्या यंत्राशी संबंधित व्यवसाय करतात. अनेक जण त्यात कुशल झाले आहेत. सुमारे सव्वाशे जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. खरीप, रब्बी हंगाम आटोपल्यानंतर राज्याच्या विविध भागात मागणीनुसार हे व्यवसायिक कामाला जातात.  केव्हीकेने गाव घेतले दत्तक  औरंगाबाद कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) वर्षभरापूर्वी हे गाव दत्तक घेतले आहे. आंतर पीकपद्धती, प्लॅस्टिक आच्छादन, अडीच एकरांत कपाशी, पंधरा एकरांवर सोयाबीन बीजोत्पादन, बीडीएन ७११ तुरीचे १५ एकरांत तर आठ एकरांत गव्हाचे प्रात्यक्षीक, दहा एकरांवर परभणी मोती रब्बी ज्वारी प्रात्यक्षिक, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाच्या माध्यमातून एएचबी १२०० या अधिक लोहयुक्‍त बाजरीचे २० एकरांवर उत्पादन, टोमॅटो, मिरचीचे प्रात्यक्षिक, जनावरांची गोचीड निर्मूलन मोहीम, शेळ्यांसाठी चाटण विटा, शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी रोप पुनर्लागवड यंत्राचा वापर, कुपोषण निर्मूलन, राष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष, कौशल्यावर आधारित प्रशिक्षण आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.  प्रगतीतील महत्त्वाचे 

  • नदीवर सुमारे ९ सिमेंट कट्टे 
  • दोन किलोमीटर नदीचे खोलीकरण 
  • भाजीपाला, फळबागा, तुती, अन्य पिके ठिबकवर 
  • एकडोळा पद्धतीने ऊस 
  • गुलाबी बोंड अळी नियंत्रणात गावाचा पुढाकार 
  • विस्तारतो आहे रेशीम उद्योग   सन २००६-०७ मध्ये लाखेगावातील तुळशीराम धुपे व निवृत्ती कागदे यांनी रेशीम उद्योगाची कास धरली.  त्यानंतर या उद्योगाकडे कुणी वळायला तयार नव्हते. दोन वर्षांपूर्वी पुन्हा मोठ्या संख्येने शेतकरी या उद्योगाकडे वळले आहेत. मनरेगांतर्गत ५५ एकरांत तुती लागवड झाली आहे. यंदाच्या हंगामात दुष्काळाचे सावट रेशीम उद्योगावर आहे. कोषनिर्मितीच्या चार ते पाच बॅच घेणारे दोन बॅचवरच अडकले आहेत. अशाही स्थितीत किमान आधार देण्याचे काम या व्यवसायाने दिल्याचे शेतकरी सांगतात.  प्रतिक्रिया  शेळीपालन, कुकूटटपालनाची जोड एक हेक्‍टर शेतीला हातभार लावते आहे. कुटूंबातील सर्वच लोक श्रमाला प्राधान्य देतात.  -शे. रज्जाक शे. बादशहा  अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासोबतच शेतीचीही जबाबदारी सांभाळतो. पेरूची लागवड दोन महिन्यांपूर्वी केली. मका, भाजीपालाही घेतला आहे.  -कृष्णा कागदे  संपर्क- ८३०८८०९८४३  चोवीस एकरांत दोन एकर मोसंबी व चार एकर चिकू आहे. तीन वर्षांपूर्वी आठ एकरांत मोसंबी घेतली. त्यात गहू घेतला. चिकूतही वांगी घेतली.  -भगवान कागदे  पन्नास शेतकरी मिळून सेंद्रिय शेतीमाल उत्पादक गट स्थापन केला आहे. धान्य, फळे, भाजीपाला उत्पादन घेतो. उत्पादित मालाची थेट विक्री करतो.  -निवृत्ती कागदे  संपर्क- ९०९६४७४१९९  आईने सुरू केलेले शेळीपालन आमच्या कुटुंबाचा मुख्य आधार आहे.  अरबाज शेख  सुमारे साडेसातशे मोसंबीची झाडे असलेल्या बागेने मागील वर्षी १३ लाखांच उत्पन्न दिल. यंदा दुष्काळाने बाग जगविण्याचे संकट उभे केलेय. पण प्रयत्न सुरू आहेत.  -जनार्दन कागदे  दोन वर्षांपासून रेशीम उद्योगाकडे वळलो आहे. दोघा भावांनी सहा एकरांवर तुती लागवड केली. यंदा दोन बॅच घेणेच शक्य झाले.  -नवनाथ धुपे  लाखेगावच्या शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा स्वीकार कला आहे. पीकबदल, पूरक उद्योग, प्रात्यक्षिकांना त्यांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. पुढील काळात शेततळ्यातील मत्स्यपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणार आहोत.  -डाॅ. किशोर झाडे  विषय विशेषज्ञ, केव्हीके, औरंगाबाद  संपर्क ः ९९२१८०८१३८    गावशिवारात गेल्या हंगामात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. केव्हीकेच्या मार्गदर्शनातून नियंत्रणासाठी केलेले उपाय उपयोगी पडले.  -कचरू घोडके  संपर्क- ९९२१९७९१०६

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com