परभणीत रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव सादर

रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव सादर
रब्बी पीकविम्याचे १ लाख ८१ हजार प्रस्ताव सादर

परभणी ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सोमवार (ता. १७) पर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार ८ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले आहेत. रब्बी पिकांसाठी विमा संरक्षण घेण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत विमा प्रस्ताव सादर करता येतील. या संदर्भात विमा कंपनीच्या सूत्रांनी माहिती दिली.

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ज्वारी, गहू, हरभरा, करडई तसेच उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. यंदा जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीमुळे रब्बी पिकांची जोखीम वाढली आहे. त्यामुळे शेतकरी पिकांसाठी विमा संरक्षण कवच घेत आहेत. सोमवार (ता. १७) पर्यंत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १ लाख ८१ हजार ८ विमा प्रस्ताव सादर केले आहेत. 

विमा प्रस्ताव सादर करणारांमध्ये १ लाख ८१ हजार बिगर कर्जदार शेतकरी असून तूर्त केवळ ८ कर्जदार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. यामध्ये सामुदायिक सेवा केंद्रामार्फत १ लाख ८० हजार ९८३ शेतकऱ्यांनी तर बॅंकांमार्फत २५ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर केले आहेत. शेतकरी, राज्य शासन, केंद्र शासन यांचा हिस्सा एकत्रित मिळून एकूण २४ कोटी ८६ लाख रुपये विमा हप्ता विमा कंपनीकडे भरणा करण्यात आला आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भरलेला विमा हप्ता ४ कोटी ५ लाख ४७ हजार ९१४ रुपये एवढा आहे. 

पीकनिहाय विमा प्रस्ताव सादर करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये हरभरा पिकांसाठी शेतकऱ्यांनी ६९ हजार २७६ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले असून एकूण १ कोटी ५० लाख १६ हजार ६४७ विमा प्रस्ताव सादर केले आहेत. ज्वारीसाठी ७४ हजार ६९१ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले असून एकूण १ कोटी ८८ लाख ५६ हजार ३९ रुपये विमा हप्ता भरण्यात आला. गव्हासाठी १४ हजार ४०९ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी ३५ लाख ५३ हजार ४८५ रुपये विमा हप्ता भरला आहे. 

करडईसाठी २२ हजार ४५१ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी ३० लाख ६८ हजार ६३ रुपये विमा हप्ता भरला आहे. भुईमुगासाठी १८१ विमा प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com