भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणी

भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणी
भारतातील दहा कोटी जनता पितेय दूषित पाणी

नवी दिल्ली : रंग, गंधहिन द्रव्य म्हणजेच पाणी पिण्यासाठी चांगले असते असे म्हणतात. म्हणजेच ज्या पाण्याला वास येत नाही, त्यात कोणताही रंग व रासायनिक घटक मिसळलेले नाहीत, असे पाणी पिण्यास लायक असते. पण भारतात मात्र यासंदर्भातील चित्र फारसे समाधानकारक नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून ७० वर्षे झाली तरी येथील दहा कोटी नागरिकांना विषारी रसायनयुक्त प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. ही गोष्ट आरोग्यासाठी घातक ठरत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. "स्वच्छ पाणी हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे', या संकल्पनेवर आधारित दिल्लीत झालेल्या परिषदेत देशातील नागरिकांना पिण्यास योग्य पाणी पुरविण्याच्या मोहिमेतील शंभर तज्ज्ञ व कार्यकर्त्यांनी हा निष्कर्ष मांडला आहे. पाणी दूषित करणाऱ्या घटकांवर व त्यावरील उपायांवर या दोन दिवसांच्या परिषदेत चर्चा झाली. पाणी, पर्यावरण व सार्वजनिक आराेग्य आदी सामाजिक विषयांवर काम करणारी "इनरेम फाउंडेशन' या संशोधन संस्थेने या संदर्भातील अहवाल परिषदेत प्रकाशित केला. ज्या पाण्यात फ्लोराइडचे अंश असतात ते प्यायल्याने दोन वर्षांच्या बाळामध्ये शारीरिक विकृती निर्माण होऊ शकतात, असे या अहवालात म्हटले आहे. अर्सेनिक, फ्लोराइड व युरेनियम आदी विषारी रसायनांमुळे पाणी दूषित होत आहे. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्‌भवतात. त्याशिवाय भारतातील पेयजलात मॅंगेनीज, क्‍लोरियम, युरेनियमचे प्रमाणही वाढत आहे. हे सर्व घटक कर्करोगाला आमंत्रण देणारे आहेत, अशी माहिती अपोलो रुग्णालयातील मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. राजा रेड्डी यांनी दिली. जलजन्य आजारांवर रेड्डी गेल्या २० वर्षांपासून संशोधन करीत आहेत. दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी इनरेम फाउंडेशनने "राष्ट्रीय पोषण मोहीम' (एनएनएम) सुरू केली आहे. याद्वारे देशभरातील २८ हजार गावे व वाड्यांमध्ये सरकारतर्फे सर्वेक्षण सुरू आहे. या मोहिमेसाठी सरकारकडून मिळणारा निधी अपुरा आहे. तेलंगणसारख्या राज्याने दूषित पाण्याच्या परिणामांवर आधारित ब्लू प्रिंट तयार केली आहे. ही गोष्ट सोडल्यास सरकारकडे जी माहिती उपलब्ध आहे, त्यात विरोधाभासच जास्त आहे. उदा. उत्तर प्रदेशमधील फत्तेपूरमधील पाण्यात फ्लोराइडची पातळी अधिक आहे. मात्र केंद्र सरकारच्या अहवालात हा भाग "फ्लाराइडमुक्त' असल्याचे म्हटले आहे.

एकत्र येऊन उत्तर शोधण्याचे आवाहन दूषित पाण्यावर त्वरित उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. पाण्यात दूषित घटक मिसळण्यास पायबंद न घातल्यास कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. सर्वांना सुरक्षित व शाश्‍वत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी "अर्घम' ही विश्‍वस्त संस्था काम करीत आहे. या प्रश्‍नावर उत्तर शोधण्यासाठी "फ्लोराईड नॉलेज अँड ॲक्‍शन नेटवर्क' (एफकेएएन) ही समिती स्थापन करून कृती आराखडा तयार करण्यात सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन "अर्घम'ने परिषदेत उपस्थितांना केले. ग्रामीण भारतातील स्थिती... दूषित पाणी पिणारे नागरिक : ६,३४,००००० नळ असलेली घरे : २,६९, ००००० नैसर्गिक संकटग्रस्त राज्ये : २५

(स्राेत ः पाणी व स्वच्छता या विषयावरील जागतिक पातळीवरील सल्लागार संस्था "वॉटरएड'ने २०१७ मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com