राज्यातील १०,५२१ गावांत पाणीपातळी खालावली

राज्यातील १०,५२१ गावांत पाणीपातळी खालावली

पुणे : गेल्या काही दिवसांपासून उष्णतेच्या लाटेमुळे उन्हाचा चांगलाच चटका वाढला आहे. परिणामी, भूगर्भातील बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खाली जाऊ लागली आहे. राज्यातील ३५३ तालुक्यांंपैकी २५२ तालुक्यांतील सुमारे दहा हजार ५२१ गावांतील पाणीपातळी एक मीटरहून अधिक खोल गेली आहे. त्यापैकी १३० तालुक्यांतील सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यावाचून भूगर्भ चांगलाच तहानलेला असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.   गेल्या वर्षी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे या भागातील धरणे तुडुंब भरली होती. मात्र, विदर्भातील पश्चिम भागात अत्यंत कमी, पूर्व भागात बऱ्यापैकी पाऊस झाला. त्यामुळे धरणेही कमीअधिक स्वरूपात भरली होती. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने झालेल्या भूजल साठ्यातून सिंचनासाठी, औद्योगिक वापरासाठी तसेच शहरीकरण व वाढत्या लोकसंख्येमुळे पिण्याच्या पाण्याच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे भूजलातील उपसा मोठ्या प्रमाणात झाला असून, त्याचा परिणाम भूजल पातळीच्या स्थितीवर झाला आहे. 

विभागिहाय भूजलपातळी खालावलेल्या गावांची संख्या

विभाग   तीन मीटरहून अधिक   दोन ते तीन मीटर   एक ते दोन मीटर   एक मीटरपेक्षा जास्त  
ठाणे १४ ११३ १२७
नाशिक ३२ १७८ ६८४ ८९४
पुणे ३० ३२ २३८ ३००
औरंगाबाद ३५७ ७०७ १८०१ २८६५
अमरावती ४७८ १३७७ २३९१ ४२४६
नागपूर ७९ ३४१ १६६९ २०८९
एकूण ९७६ २६४९ ६८९६ १०,५२१ 

विहिरीच्या पाणीपातळीचा अभ्यास   भूगर्भातील पाणीपातळीचा अभ्यास करण्यासाठी राज्यात पाणलोट क्षेत्रनिहाय तीन हजार ९२० निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. गेल्या मार्च महिना अखेरमधील निरीक्षण विहिरीतील पाणी पातळीचा मागील पाच वर्षांतील मार्च महिन्यातील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक करण्यात आला. त्यामध्ये राज्यातील एकूण दहा हजार ५२१ गावात भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट आढळून आहे. त्यापैकी ९७६ गावांत तीन मीटरपेक्षा घट आढळून आली आहे. दोन हजार ६४९ गावांमध्ये दोन ते तीन मीटर, तर सहा हजार ८९६ गावांत एक ते दोन मीटरने घट आढळून आली आहे. 

विदर्भात सर्वाधिक खोल पाणीपातळी विदर्भात कमी झालेल्या पावसाचा परिणाम १११ तालुक्यांत मार्च महिन्यापासून दिसून आले. सध्या विदर्भातील सुमारे सहा हजार ३३५ गावांत एक मीटरहून अधिक खोल पाणीपातळी गेली आहे. यामध्ये नागपूर विभागातील दोन हजार ८९ तर अमरावती विभागातील चार हजार २४६ गावांचा समावेश आहे. त्यापैकी चार हजार ६० गावात एक ते दोन मीटर, तर एक हजार ७१८ गावात दोन ते तीन मीटर, तर ५५७ गावात तीन मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेली आहे. राज्यात यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे.      

मराठवाड्यात ५५ तालुक्यांचा समावेश विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही भूजलपातळीचा अधिक झालेल्या पाण्याच्या उपशामुळे मराठवाड्यातील ५५ तालुक्यांतील दोन हजार ८६५ गावांत एक मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेली आहे. यात औंरगाबाद व नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक गावांचा समावेश आहे. त्यापैकी एक हजार ८०१ गावांत एक ते दोन मीटर, तर ७०७ गावांत दोन ते तीन मीटर, तर ३५७ गावांत तीन मीटरहून अधिक खोल पाणी पातळी गेली आहे.    

कोकण, मध्य महाराष्ट्रात कमी गावे  चांगल्या पावसामुळे कोकण, मध्य महाराष्ट्रातील पाणीपातळी चांगलीच वाढ झाली होती. त्यातच कमी झालेला उपशामुळे या भागातील पाणी पातळी कमी झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातील एकूण १३२१ गावांत एक मीटरहून अधिक पाणीपातळी खोल गेल्याचे दिसून आले आहे. त्यापैकी एक हजार ३५ गावांत एक ते दोन मीटर, तर २२४ गावांत दोन ते तीन मीटर, तर ६२ गावात तीन मीटरहून अधिक पाणी पातळी खोल गेल्याचे स्पष्ट झाले आहे.   भूजल पातळी खोल जाण्याची कारणे 

  • पिकांसाठी पाणी देण्याच्या पारंपरिक पद्धती  
  • बारामही ऊस, केळी, संत्री, द्राक्षे अशा पिकांसाठी भूजलाचा अतिवापर 
  • भूजल व्यवस्थापनाचा अभाव 
  • कमी पर्जन्यमान पर्यायाने कमी भूजल पुनर्भरण 
  • पर्जन्यमानाची तीव्रता व त्याचा कालावधी 
  • गेल्या वर्षी झालेल्या चांगल्या पावसामुळे भूजल पातळीत वाढ झाली होती. गेल्या काही दिवसांपासून पाण्याच्या वाढलेल्या उपशामुळे पाणीपातळी झपाट्याने खाली गेली आहे. त्यामुळे सात हजार ३२२ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाईसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे.   - शेखर गायकवाड, संचालक,  भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे 

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com