परभणी जिल्ह्यात रब्बीचे ११ हजार क्विंटल बियाणे शिल्लक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी ः यंदाच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी बाजारपेठेत उपलब्ध झालेल्या ३१ हजार ९१९ क्विंटल बियाण्यांपैकी २० हजार ६९२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली असून, ११ हजार २२७ क्विंटल बियाणे शिल्लक आहे. अनेक शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरल्यामुळे बाजारपेठेतील बियाणे शिल्लक राहिले. विविध ग्रेडचा १७ हजार ३६३ मेट्रिक टन खतसाठा शिल्लक असून, ऊस लागवडीसाठी उपयोगी येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने महाबीजकडे १७ हजार १९४ क्विंटल आणि खासगी कंपन्यांकडे १८ हजार ६४२ क्विंटल दोन्ही मिळून ३५ हजार ८३६ क्विंटल बियाण्याची मागणी केली होती. यामध्ये महाबीजने १६ हजार ६६२ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला होता. तर खासगी कंपन्यांनीने एकूण ३१ हजार ९१९ क्विंटल बियाण्याचा पुरवठा केला होता.

२०,६९२ क्विंटल बियाण्याची विक्री महाबीजच्या ज्वारीच्या २५० क्विंटल, गव्हाच्या ६ हजार क्विंटल, हरभऱ्याच्या ७ हजार क्विंटल, करडईच्या २० क्विंटल, अन्य २ क्विंटल अशी एकूण १३ हजार २७२ क्विंटल, खासगी कंपन्यांच्या ज्वारीच्या ५५० क्विंटल, गव्हाच्या ९ हजार ५०० क्विंटल, हरभऱ्याच्या १० हजार ५०० क्विंटल, करडईच्या ६० क्विंटल, अन्य पिकांचे ३० क्विंटल अशी एकूण ७ हजार ४२० क्विंटल महाबीज आणि खासगी कंपन्यांचे मिळून २० हजार ६९२ क्विंटल बियाण्याची विक्री झाली.

जिल्ह्यात शुक्रवार(ता. २२)पर्यंत २ लाख ९ हजार ५११ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी पेरणीसाठी ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे घरचे बियाणे वापरले. त्यामुळे महाबीजचे ज्वारीचे १०९ क्विंटल, गव्हाचे २ हजार ४५९ क्विंटल, हरभऱ्याचे ८०९ क्विंटल, करडईचे १२ क्विंटल, अन्य पिकांचे १ क्विंटल असे एकूण ३ हजार ३९० क्विंटल आणि खासगी कंपन्यांचे ज्वारीचे २५० क्विंटल, गव्हाचे ५ हजार क्विंटल, हरभऱ्याचे २ हजार ५२५ क्विंटल, करडईचे १० क्विंटल, मकाचे ५० क्विंटल, अन्य पिकांचे २ क्विंटल असे ७ हजार ८३७ क्विंटल बियाणे शिल्लक राहिले.महाबीज आणि खासगी कंपन्यांचे मिळून एकूण ११ हजार २२७ क्विंटल बियाणे शिल्लक आहे.

कृषी विकास अधिकारी कार्यालयातर्फे यंदाच्या रब्बी हंगामासाठी विविध ग्रेडच्या ८५ हजार ४०० मेट्रिक टन खताची मागणी करण्यात आली होती. परंतु ५६ हजार ८०० टन खताचे आवटंन मंजूर झाले. खरीप हंगामातील १४ हजार ८५३ टन खत शिल्लक होते. रब्बीमध्ये १३ हजार ७१० मेट्रिक टन खताचा पुरवठा झाला होता. त्यामुळे एकूण २८ हजार ५६३ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध होता. यापैकी ११ हजार २०० टन खताची विक्री झाली. १७ हजार ३६३ मेट्रिक टन खत साठा शिल्लक राहिला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com