बोंड अळीवर लक्ष ठेवण्यासाठी यंदा १३ हजार 'स्काउट'

बोंडअळी
बोंडअळी

पुणे : राज्यात गेल्या खरिपात धुमाकूळ घालणारी बोंड अळी यंदा अकोल्याच्या तेल्हारा भागात दिसून आल्यामुळे कृषी विभाग सतर्क झाला आहे. यंदा २२ हजार गावांवर नजर ठेवण्यासाठी १३ हजार स्काउटचे जाळे तयार करण्यात आलेले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.  गेल्या हंगामात बोंड अळीने नुकसान झालेले शेतकरी अजूनही मदतीची वाट पहात आहेत. बोंड अळीमुळे कपाशीचे ३३ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी ६८०० रुपये दिले जाणार आहेत. ‘‘बागायती क्षेत्रासाठी प्रतिहेक्टरी १३५०० रुपये कमाल दोन हेक्टरपर्यंत मिळेल. मात्र, मदतीची किमान रक्कम एक हजारपेक्षा कमी असणार नाही,’’ असे राज्य शासनाने अलीकडेच पुन्हा स्पष्ट केले आहे.  राज्यात २१ जुलैपर्यंत कपाशीखाली सरासरी ४१ लाख ९१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ८८ टक्के क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कपाशीचा पेरा केलेला आहे. आतापर्यंत ३७ हजार हेक्टरवर पेरा झालेला असून, गेल्या हंगामात याच कालावधीत पेरा ३९ लाखांच्या आसपास होता. गेल्या हंगामात धुमाकूळ घातलेल्या बोंड अळीमुळे यंदा पेरा कमी होण्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने व्यक्त केला होता.  ‘‘कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) यंदा आम्ही नव्या स्वरूपात राबवित असून, आधीच्या ठेकेदार संस्थांना नव्याने ठेके देण्यात आलेले नाहीत. या ठेकेदारांकडून ८०० स्काउट नेमले जात होते. त्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले जात होते. मात्र, यंदा स्काउटची जबाबदारी १३ हजार ५०० कृषी कर्मचाऱ्यांवर देण्यात आली आहे. यामुळे २२ हजार गावांवरील कीडरोगावर नजर ठेवली जाईल,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.  राज्यातील २०४ कापूस उत्पादक तालुक्यांना स्काउटकडून निगराणीखाली ठेवले जाईल. पहिल्या टप्प्यात अकोटच्या तेल्हारा भागात गुलाबी बोंड अळी दिसून आली आहे. ‘‘गुलाबी बोंड अळीला रोखण्यासाठी स्काउट मंडळी थेट गावात जाऊन प्लॉटवर नजर ठेवतील. त्याची नोंद आम्ही जीपीएसद्वारे ठेवणार आहोत. त्यामुळे शहरात बसून गावात पाहणी करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही. संवेदनशील गावांमध्ये जास्त फेरोमन ट्रॅप लावले जाणार आहेत. या कामाची बिनचूक नोंद केली जाईल,’’ असेही सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com