राज्यात कर्जमाफीचे १५ हजार कोटी वितरित

कर्जमाफीचे आतापर्यंत १५ हजार कोटी वितरित
कर्जमाफीचे आतापर्यंत १५ हजार कोटी वितरित

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून राज्यात आतापर्यंत १५ हजार कोटी रुपये वाटण्यात आले असून जळगाव, नाशिक, पुणे, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांत सर्वाधिक रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीच्या रकमा वर्ग करण्यात जिल्हा सहकारी बॅंकांनी आघाडी घेतली आहे. जिल्हा बॅंकांनी २४ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सात हजार २८० कोटी रुपये वर्ग केले आहेत. याउलट राष्ट्रीयकृत बॅंकांनी १३ लाख ७० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात सात हजार ८०८ कोटी रुपये जमा केले आहेत.  राज्य शासनाने अलीकडेच राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या प्रतिनिधींशी पुण्यात एक बैठक घेऊन आढावा घेतला. या बैठकीस अपर मुख्य सचिव एस. एस. संधू उपस्थित होते. माहिती गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अजून किती शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे बाकी आहे याविषयी काहीही बोलण्यास उच्चपदस्थ सूत्रांनी नकार दिला. ‘‘निकषामध्ये करण्यात आलेल्या बदलांचा विचार करून कर्जमाफीच्या याद्या लवकरात लवकर हातावेगळ्या कराव्यात, बॅंकांनी केलेल्या चुकांची दुरुस्ती वेळेत करून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने कसा मिळेल हे बघावे,’’ अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.  सहकार विभागाचे आयुक्त डॉ. विजय झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी योजनेच्या कामकाजाला गती देण्याचा प्रयत्न शासन करीत असून ५६ लाख शेतकऱ्यांचे किमान ६९ लाख खाते तपासून कर्जमाफीच्या रकमा वर्ग करण्याचे काम सुरू आहे, असे सांगण्यात आले. कर्जमाफीसाठी तालुकास्तरीय समित्या महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. बॅंकांच्या संगणकामध्ये अफाट डाटा असून त्याची पडताळणी (व्हेरिफिकेशन) करून पोर्टलवर माहिती आणणे व त्यानंतर पात्र-अपात्र शेतकरी जाहीर करणे, अशी मोठी कसरत सहकार विभागाला करावी लागत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  २६ जूनपर्यंत राज्यात ३७ लाख ७१ हजार ११८ शेतकऱ्यांना १५ हजार ८९२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका पुढील वर्षी असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जास्त दिवस कर्जमाफीचे काम रेंगाळू देऊ नका, अशा सूचना राज्यकर्त्यांकडून सहकार विभागाला मिळाल्या आहेत.  जळगावमधील एक लाख ८८ हजार शेतकऱ्यांना ७०४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून राज्यात ती सर्वाधिक आहे. त्याखालोखाल नाशिक जिल्ह्यात एक लाख १४ हजार शेतकऱ्यांना ५७६ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली असून यवतमाळला एक लाख १३ हजार शेतकऱ्यांना ५९१ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील एक लाख ६६ हजार शेतकऱ्यांना ५५४ कोटी रुपये तर अकोला जिल्ह्यात ५४४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तेथे शेतकरी संख्या एक लाख ६६ हजार आहे.  पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचे लाभ देऊन अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करणे हे एक मोठे आव्हानात्मक काम सरकारपुढे आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनीदेखील ‘‘वेळ लागला तरी चालेल; पण खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल याची काळजी घ्या,’’ अशा सूचना दिल्याचे सांगण्यात आले.  ‘‘राज्य सरकारकडून वारंवार निकषांमध्ये बदल करण्यात आल्यामुळे कर्जमाफीचे काम रेंगाळले आहे. मात्र, खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणे, बोगस खात्यांवर पैसा वर्ग होणे, तसेच जास्त घटकांना (पीककर्जदार, मुदत कर्जदार, शेडनेट, पॉलिहाउस कर्जदार) लाभ मिळवून देण्यात राज्य शासन यशस्वी ठरले आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.  ऑनलाइन प्रक्रियेमुळे बनवाबनवीला आळा  कर्जमाफीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन आणताना काही तांत्रिक चुका निश्चित घडल्या असून वेळदेखील खूप गेला. मात्र, ही कामे केल्यामुळेच शेतकऱ्यांच्या नावे बोगस रकमा वर्ग होण्यास आळा बसला. त्यामुळेच बनवाबनवीची संधी गेल्यामुळे काही बॅंकांमधील अधिकाऱ्यांनीच कर्जमाफीच्या निकषांबाबत बोंब ठोकली. मात्र, सहकार विभागाला खरी गोम माहीत असल्यामुळे आम्ही शांतपणे काम सुरू ठेवले आहे,’’ असेही सहकार विभागातील सूत्रांनी स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com