राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेत

राज्यातील कमी पाऊस असलेल्या जिल्ह्यांमध्ये १५ आॅक्टोबरनंतर पंचनामे किंवा आवश्यक सर्वे केले जातील. पंचनामे झाल्याशिवाय राज्य सरकार दुष्काळी भाग जाहीर करू शकत नाही; परंतु सध्या परिस्थिती चिंताजनक आहे आणि राज्यातील जवळपास १७ जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश स्थिती आहे. - विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेत
राज्यातील १७ जिल्हे दुष्काळाच्या छायेत

मुंबई ः राज्यात मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर अनेक भागात पाऊस नव्हता मात्र आॅगस्ट महिन्यात काही दिवस चांगला पाऊस झाला. शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या; परंतु त्यानंतर राज्यभर पावसाने दडी मारली. त्यामुळे खरिपात धोक्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यात तर स्थिती बिकट बनली आहे. पावसातील तूट आणि ऊस पिकासाठी पाण्याचा अतिवापर यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील १७ जिल्ह्यांवर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यात यंदा मॉन्सूनने वेळेआधीच धडक दिली. भारतीय हवामान विभागानेही सरासरी पावसाचा अंदाज जाहीर केला; परंतु राज्यात सर्वदूर पावसासाठी आॅगस्ट उजाडावा लागला. आॅगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. त्यानंतर आजपर्यंत पाऊसच नाही. 

काही भागात धरणांमध्ये पाणी आले तर अनेक ठिकाणी धरणे, तलाव कोरडेच आहेत. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोर पिके वाचविण्याचे मोठे आव्हान आहे. अनेक ठिकाणी पाऊसच नसल्याने जनावरांना चाराही उपलब्ध होऊ शकला नाही. या भागात चारा आणि पाण्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागत आहे. मराठवाड्यातील महत्त्वाच्या नऊ प्रकल्पांपैकी दोन पर्ण कोरडे पडले आहेत आणि तीन प्रकल्पांमध्ये सरासरी २८.८१ टक्के पाणीसाठा आहे. विदर्भातील अमरावती विभागातील प्रकल्पांमध्ये सरासरी ५७.३७ टक्के पाणीसाठा आहे, तर नागपूर विभागातील धरणांमध्ये ५०.०२ टक्के पाणीसाठा आहे.   

उसामुळे ‘मांजरा’ कोरडा जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ऊस पिकाला जास्त पाणी लागते. मागील वर्षी बीड जिल्ह्यातील मांजरा प्रकल्पात पर्याप्त पाणीसाठा होता; परंतु यंदा प्रकल्पाचे पाणी ऊस पिकासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्याने प्रकल्प जवळपास कोरडा पडला आहे. जलसंपदा विभागाच्या सूत्रानुसार, सध्या मांजरा प्रकल्पात १.८० टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच काळात ८८.०४ टक्के पाणीसाठा होता. बीडमधीलच माजलगाव धरण पूर्ण कोरडे पडले आहे. मागील वर्षी ६०.४८ टक्के पाणीसाठा होता.  मराठवाड्यात कमी पाऊस मराठवाड्यातील अनेक भागांत यंदा सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या २८.८१ टक्के साठा शिल्लक आहे. मराठावाड्याचे जीवनदायी असलेल्या जायकवाडी धरणात मंगळवारी (ता.१८) उपयुक्त पाणीसाठा ४५.८८ टक्के होता. मागील वर्षी याच काळात धरणात ८७.६३ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती जल संसाधन विभागाच्या सूत्रांनी दिली.  बैठकीत होईल निर्णय राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते; परंतु एवढ्या लवकर पूर्ण अंदाज वर्तविणे अवघड आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणारी मदत आणि पुनर्वसन उपसमितीची बैठक अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील कमी पाऊस असलेले जिल्ह्यांना दुष्काळी घोषित करण्याची निर्णय  १५ आॅक्टोबरनंतरच होणार आहे, असे जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com