कर्जमाफीचे सतरा हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा

कर्जमाफी योजना
कर्जमाफी योजना

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची एकूण ५० लाख ८५ हजार खाती मंजूर आहेत. या खात्यांसाठी २३ हजार ८१७ कोटी इतकी कर्जमाफीची रक्कम मंजूर करण्यात आली. तर प्रत्यक्षात आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १७ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.  सुरवातीपासून योजनेची पारदर्शक अंमलबजावणी केल्यामुळे राज्य शासनाचे सुमारे १० ते १२ हजार कोटी रुपये वाचले आहेत, असे सहकार विभागातील उच्चपदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले. योग्य आणि गरजू शेतकऱ्यांना व्हावा या हेतूने शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केली. शेतकरी, बँकांमध्ये समन्वय साधून ही प्रक्रिया करण्यात आली. शासकीय कर्मचारी, आयकर भरणाऱ्यांना यातून वगळले, त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या कमी झाली. योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी ५८ लाख खातेदारांनी अर्ज केले.  जुन्या कर्जमाफीवर भारताच्या महालेखापालांच्या अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत, असे गैरप्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले. त्यावेळच्या कॅगच्या अहवालात ६ लाख अपात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप झाल्याचे म्हटले आहे. तसेच सुमारे साडेनऊ लाख शेतकरी पात्र असूनही तेव्हाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले होते, असे सहकार विभागाकडील आकडेवारीतून दिसून येते.  योजनेअंतर्गत सध्या कर्जमाफीची एकूण ५० लाख ८५ हजार खाती मंजूर आहेत. या खात्यांसाठी २३ हजार ८१७ कोटी इतकी कर्जमाफीची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. प्रत्यक्षात आजअखेर शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये १७ हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. मंजूर रक्कम व खात्यामध्ये जमा रकमेतील फरक हा मुख्यत: एकरकमी परतफेड योजनेची (ओटीएस) खाती निकाली काढणे सुरू असल्याने दिसत असल्याचे सहकारमधील उच्चपदस्थांनी सांगितले.  आॅनलाइनमुळे पारदर्शकता सुरवातीला राज्यस्तरीय बँकर्स समितीने ८९ लाख शेतकऱ्यांकडे ३४ हजार कोटींचे कर्ज थकल्याची माहिती दिली होती. प्रत्यक्षात, ऑनलाइन अर्ज भरून घेतल्यानंतर बँकांकडील माहितीमध्येही मोठी विसंगती आढळून आली असल्याचे सहकार विभागातील सूत्रांचे म्हणणे आहे. सर्व तपासणी काटेकोरपणे केल्यामुळे राज्य शासनाचे सुमारे १० ते १२ हजार कोटी रुपये अपात्र व्यक्तींच्या हाती जाण्यापासून वाचले आहेत, असा दावा केला जात आहे. आकडे बोलतात...

  • कर्जमाफीसाठी ५८ लाख खातेदारांचे अर्ज
  • कर्जमाफीची एकूण ५० लाख ८५ हजार खाती मंजूर
  • २३ हजार ८१७ कोटी इतकी कर्जमाफीची रक्कम मंजूर
  • पारदर्शकतेमुळे १० ते १२ हजार कोटी रुपये वाचल्याचा दावा  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com