बळिराजा जलसंजीवनी योजनेतून मिळाले २० हजार कोटी : मुख्यमंत्री

बळिराजा जलसंजीवनी योजनेतून मिळाले २० हजार कोटी : मुख्यमंत्री

नांदुरा, जि. बुलडाणा : बळिराजा जलसंजीवनी योजनेतून २० हजार कोटी मिळाले आहेत. त्यापैकी सहा हजार ६१ कोटींच्या निधीतून बुलडाणा जिल्ह्यातील रखडलेल्या जिगाव या मोठ्या प्रकल्पासह एकूण नऊ प्रकल्पांचे काम पूर्णत्वास जाणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. १७) दिली.

नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय जलसंपदा, रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, जलसंधारणमंत्री गिरीश महाजन, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायड़े, खासदार रक्षा खडसे, खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, डॉ. संजय कुटे, डॉ. शशिकांत खेडेकर, आकाश फुंडकर, संजय रायमुलकर उपस्थित होते. या वेळी विविध कामांच्या कार्यान्वयनाची सुरवात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळ दाबून केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की आघाडी सरकारच्या काळात प्रकल्पाचे भूमिपूजन झालेली अनेक कामे बंद पडली होती. निधीअभावी जिगावसारखा प्रकल्पाचे काम संथ गतीने सुरू होते. इतरही प्रकल्प रखडलेल्या अवस्थेत होते. या सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला. मिळलेल्या वीस हजार कोटींच्या पॅकेजमधून बुलडाणा जिल्ह्यात ६०६१ कोटी रुपये आता दिले. येत्या दोन वर्षांत यातील प्रकल्पाचे काम पूर्ण होईल. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमुक्तीचे विदर्भात ५५०० कोटी़, तर मराठवाड्यात ६ हजार कोटी जमा झाले. राज्यात ४२ लाख शेतकऱ्यांची खाती मुक्त केली आहेत. राज्याने केंद्राच्या मदतीशिवाय २० हजार कोटी स्वतःच्या खात्यातून दिले. खारपाण पट्ट्यात जमीन सुधारणा व शेतकऱ्यांच्या विकासासाठी जागतिक बॅंकेने ६ हजार कोटी दिले अाहेत. शेतकऱ्यांची सध्याची अवस्था ही विरोधक वर्षानुवर्षे सत्तेत असताना काहीच न केल्यामुळे बनली आहे. आज तेच विरोधक आम्हाला तीन वर्षांचा हिशोब मागत आहेत, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

नितीन गडकरी यांनी सध्या शेतकऱ्यांची स्थिती चांगली नसल्याचे मान्य करीत परिस्थिती बदलण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले, की शेतकरीही याबाबत प्रयत्न करीत आहेत. परंतु आता पारंपरिक पीकपद्धती बदलली पाहिजे. बायोइथेनॉल पिकवले पाहिजे. सरकार आता धोरणात बदल करीत आहे. सरकारने पाम तेलावर ड्यूटी ३५ टक्क्यांनी वाढवली. हरभरा आयात घटविली. यामुळे दरात थोड्या सुधारणा झाल्या आहेत.

कृषिमंत्री फुंडकर म्हणाले, की सरकारने राज्यातील ७७ लाख शेतकऱ्यांचे ३४ हजार कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. आता सरकार जिगाव व इतर नऊ प्रकल्प पूर्ण करीत आहे. लवकरच हा जिल्हा सर्वाधिक राष्ट्रीय महामार्ग बनलेला जिल्हा होणार आहे.

आमदार चैनसुख संचेती यांनी जिगाव प्रकल्पला ३५०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com