आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी कारागृहात

आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी कारागृहात
आत्मदहनाचा इशारा देणारे २३ शेतकरी कारागृहात

बुलडाणा: जिल्ह्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यासाठी शेती दिलेल्या व भूसंपादन होऊन २० वर्षे झाल्यानंतरही पुरेपूर मोबदला न मिळालेल्या शेतकऱ्यांनी अात्मदहनाचा इशारा दिला होता. इशारा देणाऱ्या २३ शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी केली अाहे. जानेफळ येथील गजानन तात्या कृपाळ यांच्यासह २३ शेतकऱ्यांचा समावेश अाहे.  याबाबत अधिक माहिती अशी, सन १९९८-९९ मध्ये पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यासाठी जानेफळ परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनींची संपादन करण्यात आले आहे. वीस वर्षांचा कालावधी लोटला अाहे. कालव्यामधून अनेक वर्ष पाणी सोडण्यात येत अाहे. पाणीपट्टीसुद्धा वसूल करण्यात आली आहे. परंतु, शासनाने जमीन भूसंपादित केलेल्या शेतकऱ्यांना मात्र अद्यापपर्यंत मोबदल्याची रक्कम पूर्णपणे दिलेली नाही. त्यामुळे अनेकवेळा विनंती अर्ज व उपोषणाचा इशारा देऊनही  शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी ५ नोव्हेंबर २०१८ रोजी एक लेखी पत्र देत २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत सदर प्रकरणाचा अंतिम निवाडा करून नियमानुसार असणारी रक्कम कास्तकारांना प्रदान करण्यात येईल असे कळविले होते, असे या शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे.  मात्र सदर पत्रानुसार शुक्रवार (ता. १५) पर्यंत कुठलीच कारवाई झाली नसल्याने केव्हाही आत्मदहनाचे पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत शेतकरी होते. हे पाहता जानेफळ येथील पोलिसांनी शुक्रवारी गजानन तात्या कृपाळ यांच्यासह २३ जणांना ताब्यात घेऊन मेहकर तहसीलदार संजय गरकल यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात हजर केले. या वेळी त्यांनी प्रकरणाचा लवकर निपटारा करून रक्कम देण्याचा प्रयत्न करण्यात येईल. तेव्हा आपण आत्मदहनाचा निर्णय मागे घेऊन तसे लेखी स्वरूपात लिहून द्या असे सांगितले. परंतु शेतकऱ्यांनी आता आश्वासने नको, मोबदल्याची रक्कम हवी, अशी भूमिका घेतली. तहसीलदारांनी या शेतकऱ्यांची बरीच समजूत काढण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे अखेर या २३ शेतकऱ्यांना जिल्हा कारागृहात बुलडाणा येथे पाठविण्यात अाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com