मुगाला हमीभावापेक्षा २५ टक्के कमी दर

मूग
मूग

मुंबई/अकोला :  राज्याच्या काही भागांत यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची आवक सुरू झाली आहे. या मुगाला किमान आधारभूत किमतीपेक्षा (हमीभाव) तब्बल २५ टक्के कमी दर मिळत आहे. मुगाला यंदाच्या हंगामासाठी प्रतिक्विंटल ६९७५ रूपये आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील लातूर या प्रमुख कडधान्य बाजारपेठेत मागच्या आठवडाभरात मुगाची रोजची आवक दोन ते अडीच हजार पोती इतकी राहिली. लातूर बाजारसमितीत प्रतिक्विंटल ४२०० ते ५२०० रूपये दर आहे, असे लातूर येथील कडधान्य व्यापारी नितीन कलंत्री यांनी सांगितले. तर अकोला बाजार समितीत प्रतिक्विंटल ४००० ते ४२५० दरम्यान खरेदी होत असल्याची माहिती मिळाली अाहे.

गेल्या वर्षीच्या भावपातळीपेक्षा (४५०० ते ५२०० रुपये) यंदा दर कमी आहेत, असे कलंत्री म्हणाले. मालात आर्द्रतेचे प्रमाण जास्त असणे हे त्यामागचे एक प्रमुख कारण असल्याचे त्यांना स्पष्ट केले. यंदा आवक होत असलेल्या मुगामध्ये १४ ते २३ टक्के आर्द्रता आढळून येत आहे. गेल्या वर्षी हे प्रमाणा १६ ते १८ टक्के होते. आधारभूत किमतीने केल्या जाणाऱ्या सरकारी खरेदीसाठी मालात आर्द्रतेचे प्रमाण १२ टक्के इतके निश्चित केले आहे.

मुगाचा एकंदरीत पुरवठा अतिरिक्त होणार असल्याने मुगातली आर्द्रता कमी झाली तरी दर वाढण्याची शक्यता नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. येत्या काही आठवड्यांत लातूर बाजार समितीत दररोज पाच ते सहा हजार पोती आवक होण्याची शक्यता आहे. आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना एक वर्ष तुरुंगावस आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा प्रस्तावित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात व्यापाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सध्या लातूरसह अनेक बाजार समित्यांमध्ये खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प आहेत. ही परिस्थिती आणखी आठवडाभर अशीच राहिली तर शेतकरी मातीमोल भावाने मुगाची विक्री सुरू करतील आणि दर आणखी कोसळतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

विदर्भातील कडधान्यांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या अकोला बाजार समितीत गेल्या दोन-तीन दिवसांतील मुगाची रोजची आवक सुमारे ७५ पोती आहे. तिथे प्रतिक्विंटल चार ते पाच हजार रुपये दर मिळत आहे, असे धान्य व कडधान्य डतदार मोहित केडिया यांनी सांगितले. नवीन मालामध्ये आर्द्रतेचे प्रमाण २५ ते ३० टक्के आहे. पाऊस आणि ढगाळ वातावरण ओसरण्याची लक्षणे असल्याने पुढील आठवड्यात अकोला बाजारपेठेत दररोज ५०० ते १००० पोती मुगाची आवक होण्याची शक्यता आहे. जळगाव या प्रमुख बाजारपेठेत आठवडाभरात मुगाची आवक सुरू होण्याची चिन्हे आहेत. अकोल्यात ४२५० रुपयांपर्यंत दर  या हंगामात लागवड झालेल्या मुगाची काढणी काही भागात सुरू झाली. मध्यंतरी अाठ दिवस संततधार पाऊस झाल्यानंतर अाता उघड मिळालेली अाहे. या काळात मुगाच्या शेंगांची तोडणी सुरू झाली अाहे. तोडणी केल्यानंतर शेतकरी बाजारात मूग विक्रीला घेऊन गेले असता, चार हजारांपासून मागणी होत अाहे. काही बाजार समित्यांमध्ये मूग खरेदीला सुरवात झाली असून, ४००० ते ४२५० यादरम्यान दर मिळत अाहे.  दरात मोठी तफावत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाला मंगळवारी (ता.२८) कमीत कमी ४२५१ व जास्तीत जास्त ५५०० रुपये दर मिळाला. सरासरी ४८७५ रुपये हा दर पडला. अाधारभूत किंमत ६९७५  रुपये असून, मिळणारा दर सुमारे दीड हजारानी कमी अाहे. शिवाय ५५०० रुपये हा दर अत्यल्प मालाला मिळाला. यामुळे मूग उत्पादक शेतकऱ्याला अाधारभूत किमत मिळणे सध्या तरी दुरापास्त असल्याचे दिसून येते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com