नाशिक विभागातील २५ तालुक्यांत भूजल पातळी घटली

पंचवीस तालुक्यांतील भूजल पातळी घटली
पंचवीस तालुक्यांतील भूजल पातळी घटली

नाशिक : सरासरीच्या १२७ टक्के इतका पाऊस होऊनही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील जवळपास निम्मे म्हणजे ५४ पैकी तब्बल २५ तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाल्याची माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अहवालातून उघड झाली आहे. नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील भूजल पातळी पाच वर्षांच्या भूजल पातळीच्या सरासरीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात घटली असून, त्याखालोखाल नाशिक जिल्ह्याचा क्रमांक आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सहा तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यातही विभागातील बहुतांश तालुक्यांतील गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नाशिक विभागात यंदा सरासरीच्या १२७ टक्के इतका पाऊस झाला. परतीचा पावसानेही मोठा मुक्काम ठोकला. त्यामुळे विभागातील मोठे व लघुप्रकल्प काठोकाठ भरण्यास मदत झाली. धरणांत मुबलक पाणीसाठा असला तरी विभागातील नगर वगळता उर्वरित नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या चारही जिल्ह्यांतील भूजल पातळीत घट झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त घट नोंदवली गेली. जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांतील भूजल पातळी घटली आहे. अमळनेर, पारोळा या दोन्ही तालुक्यांतील भूजल पातळीत दोन मीटरपेक्षा जास्त; तर एरंडोल, मुक्ताईनगर आणि जळगाव या तिन्ही तालुक्यांत दीड मीटरपेक्षा जास्त प्रमाणात भूजल पातळी घटली. त्यामुळे येत्या उन्हाळ्यात या जिल्ह्याचा घसा कोरडा पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, देवळा, नांदगाव, मालेगाव व येवला या सहा उत्तर पूर्वेकडील तालुक्यांतील भूजल पातळीत घट झाली आहे.

‘जलयुक्त शिवार’ फोल जलयुक्त शिवार योजनेमुळे मोठ्या प्रमाणात सिंचनक्षमता वाढल्याचा दावा भूजल पातळीत घट झाल्याने फोल ठरला आहे. खुद्द चांदवड तालुक्यात जलयुक्तच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या तालुक्याला राज्यस्तरावर सन्मानित करण्यात आले आहे. मात्र याच तालुक्यातील भूजल पातळी ०.९५ मीटरने घटली आहे. येथे वाढली पाणीपातळी नगर जिल्ह्यातील सर्व तालुके, नाशिकमधील दिंडोरी, सुरगाणा, पेठ, निफाड, त्र्यंबक, नाशिक, इगतपुरी, सिन्नर व कळवण, नंदुरबारमधील अक्राणी, नवापूर, नंदुरबार व शहादा; तर धुळेतील साक्री व शिरपूर अशा २९ तालुक्यांतील भूजल पातळीत वाढ झालेली आहे.  

नाशिक विभागातील भूजल पातळी (मीटरमध्ये)
जिल्हा पाच वर्षांची सरासरी    वाढ /घट
नगर ५.८१ २.१९
धुळे ५.०९ (-०.५१)
नंदुरबार ४.५१ (-०.०८)
जळगाव ७.१३ (-०.८७)
नाशिक ३.७०   (-०.०४)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com