राज्यात तूरखरेदीत २५०० कोटींचा घोटाळा

राज्यात तूरखरेदीत २५०० कोटींचा घोटाळा
राज्यात तूरखरेदीत २५०० कोटींचा घोटाळा

मुंबई : राज्यात तूरखरेदी आणि भरडाईत अडीच हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मंगळवारी (ता.२७) केला. विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते बोलत होते.  ते म्हणाले, तूर भरडाईसाठी क्षमता आणि यंत्रणा नसताना नाशिकच्या राठी यांच्या मालकीच्या सप्तशृंगी कंपनीला पणन महामंडळाने कंत्राट दिले. यामुळे चांगल्या दर्जाची तूर असतानाही भरड निघाल्यानंतर क्विंटलमागे ७ किलोचे नुकसान झाले. यामुळे ठेकेदाराला १३९ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या मिळाले असा आरोप त्यांनी केला. तूर खरेदीसाठी पणन महामंडळाने १,४०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले आणि त्याला सरकारने हमी दिली. मात्र, या कर्जाच्या व्याजापोटी आणि इतर खर्चामुळे सरकारला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हे १,४०० कोटी रुपये पाण्यात गेल्याचे मुंडे या वेळी म्हणाले. हे कंत्राट देताना मुख्य सचिवांनी सांगूनसुद्धा एकाच कंपनीला हे काम देण्यात आले. तसेच नाफेड आणि अन्न नागरी पुरवठा विभागाचे नियम डावलण्यात आले, असेही ते म्हणाले.

यासंदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि या कंपनीला दिलेले कंत्राट तत्काळ रद्द करावे; तसेच या प्रकरणात पणन महामंडळाचे सहव्यवस्थापक अनिल देशमुख यांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी या वेळी केली. गोदामे उपलब्ध नसल्यामुळे सरकारची तूर साठवणीची क्षमता संपली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून धीम्यागतीने आणि जाचक अटी, निकष लावून तूर खरेदी सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली. यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे ते म्हणाले. म्हाडातही मोठा भूखंड झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी या वेळी चर्चेत केला. जनताच त्यांना धडा शिकवेल सरकारमधले काही मंत्री सराईत घोटाळेबाज झाले आहेत, कुठल्याच घोटाळ्याबाबत काहीच कारवाई आतापर्यंत झालेली नाही, असे सांगत पारदर्शक कारभाराची स्वप्नं दाखवणाऱ्या भाजपचे मंत्री भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, घोटाळ्याचे पुरावे देऊनही मुख्यमंत्री मंत्र्यांना क्लीन चिट देतात. मात्र, आता जनताच त्यांना याचा धडा शिकवेल, असा इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला. मुंडे यांच्या आरोपातील मुद्दे....

  • तूर भरडाईसाठी क्षमता आणि यंत्रणा नसताना नाशिकच्या सप्तशृंगी कंपनीला कंत्राट 
  • चांगल्या दर्जाची तूर असतानाही भरड निघाल्यानंतर क्विंटलमागे ७ किलोचे नुकसान 
  • ठेकेदाराला १३९ कोटी रुपये बेकायदेशीररीत्या मिळाले 
  • तूर खरेदीसाठी पणन मंडळाने १,४०० कोटींचे कर्ज घेतले आणि सरकारने हमी दिली
  • कर्ज व्याज, इतर खर्चामुळे सरकारला कोट्यवधींचा तोटा, १,४०० कोटी पाण्यात
  • कंत्राट देताना मुख्य सचिवांनी सांगूनसुद्धा एकाच कंपनीला काम दिले
  • नाफेड आणि अन्न नागरी पुरवठा विभागाचे नियम डावलण्यात आले
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com