मराठवाड्यातील ३१२ गावांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : शासनाच्या निर्णयाप्रमाणे गाव हा घटक माणून मराठवाड्यातील ८ हजार ५२५ गावांची हंगामी पैसेवारी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली. त्यामध्ये ३१९ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत, तर तब्बल ८,२१३ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या हंगामी पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी असलेल्या गावांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील १३५३ गावांपैकी ९३ गावांचा समावेश आहे. दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्‍यातील १०६, पालम तालुक्‍यातील ५५, पाथरी तालुक्‍यातील ५८ मिळून सर्वाधिक २१९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे.

दुसरीकडे जालना जिल्ह्यातील ९७१, औरंगाबाद जिल्ह्यातील १२६०, परभणी जिल्ह्यातील ६३०, हिंगोली जिल्ह्यातील ७०७, नांदेड जिल्ह्यातील १५६२, बीड जिल्ह्यातील १४०३, लातूर जिल्ह्यातील ९४३, उस्मानाबाद जिल्ह्यातील ७७३ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा जास्त आहे.

शासनाच्या ३ नोव्हेंबर २०१५ च्या निर्णयानुसार लागवडीखालील एकूण पिकाच्या २/३ किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र खरीप असल्यास रब्बी हंगामाची वाट न पाहता पैसेवारी जाहीर करण्याच्या सुचनेनुसार ही हंगामी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच मराठवाड्यात ३० सप्टेंबरला हंगामी, ३१ ऑक्‍टोबरला सुधारित व १५ डिसेंबरला अंतिम खरीप हंगाम पैसेवारी जाहीर करणे आवश्‍यक आहे; तर रब्बी हंगामासाठी ३१ डिसेंबरला हंगामी, ३१ जानेवारीला सुधारित व १५ मार्चला अंतिम पैसेवारी जाहीर करणे अपेक्षित आहे. यंदा पावसाचा प्रदीर्घ खंड, उडीद, मुगासह सोयाबीन या मुख्य पिकाच्या उत्पादकतेवर पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेले प्रश्नचिन्ह पाहता सुधारीत व अंतिम पैसेवारीनंतरच पैसेवारीचे चित्र स्पष्ट होईल.

२७ तालुक्‍यांची पैसेवारी ५०.७ ते ६० पैशांदरम्यान मराठवाड्यातील ७६ तालुक्‍यांपैकी २६ तालुक्‍याची हंगामी पैसेवारी ५०.७ ते ६० पैशांदरम्यान आली आहे. त्यामध्ये औरंगाबाद, परभणी  जिल्ह्यातील प्रत्येकी पाच, जालन्याती चार, हिंगोलीतील एक, नांदेड व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी सहा तालुक्‍यांचा समावेश आहे. तर २७ तालुक्‍यांची पैसेवारी ६१ ते ७० पैशांदरम्यान,  जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्‍याची पैसेवारी ५०.७ पैसे, औरंगाबादमधील वैजापूर तालुक्‍याची ५१ पैसे आली आहे. १४ तालुक्‍यांची पैसेवारी ७०.१४ पैसे ते ८० पैशांदरम्यान आली आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा व हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्‍याची हंगामी पैसेवारी ८० पैशांच्या पुढे आहे.

पाच तालुक्‍यांत ५० टक्‍केही पाऊस नाही मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील पाथरी, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व नांदेड जिल्ह्यातील माहूर, हिमायतनगर आणि देगलूर या तीन तालुक्‍यांत ४ ऑक्‍टोबरअखेरपर्यंत अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत ५० टक्‍केही पाऊस पडला नाही. विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी वगळता हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील एकाही तालुक्‍याची हंगामी पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली नसल्याचे हंगामी पैसेवारीचे आकडे सांगतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com