दापोली कृषी विद्यापीठातील ३२ जणांचा अपघातात मृत्यू

दापोल : दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे सहलीला निघण्यापूर्वी घेतलेले छायाचित्र.
दापोल : दापोली कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे सहलीला निघण्यापूर्वी घेतलेले छायाचित्र.

सातारा: महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर आंबेनळी घाटात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना सहलीला घेऊन निघालेली खासगी बस शनिवारी (ता.२८) सकाळी दाभिक टोक येथे ८०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला. बस दरीत कोसळ्यानंतर यातील प्रकाश सावंत-देसाई हे कर्मचारी बसमधून बाहेर फेकले गेले. त्यांनी घाटातून वर येऊन या घटनेची माहिती विद्यापीठाला कळवली. त्यानंतर विविध ट्रेकर्सच्या मदतीने सायंकाळी पाच वाजेपर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले होते.  दापोली कृषी विद्यापीठाचे ३१ कर्मचारी आणि वाहक आणि चालक असे ३३ जण या बसमधून प्रवास करत होते. शनिवारी सकाळी साडेसहा वाजता दापोली येथील कोकण कृषी विद्यापीठातून कर्मचाऱ्यांना घेऊन बस महाबळेश्वरला सहलीसाठी निघाली. त्यानंतर सकाळी नऊ वाजता बस दाभेली खिंडीजवळ (वाडाकुंभरोशीपासून दोन ते तीन किलोमीटरवर) आल्यावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बस ८०० फूट खोल दरीत कोसळली. बस दरीत कोसळत असतानाच यातील प्रकाश सावंत-देसाई हे कर्मचारी बसमधून बाहेर फेकले गेले. त्यांनी दरीतून वर येऊन मोबाईलवरून अपघाताची माहिती दापोली विद्यापीठात दिल्यानंतर मदतीसाठी महाबळेश्‍वर, पोलादपूर येथून मदतकार्य करणारी पथके व प्रशासकीय अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले. घटनास्थळी पोलिसांचे बचाव पथक तसेच ट्रेकर्सची टीम दाखल झाली. घटनास्थळी पाऊस आणि धुके असल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. पावसामुळे खडकांवर शेवाळ तयार झाले असल्याने पाय घसरत होते. तसेच घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण होत होता. सायंकाळी पाचपर्यंत ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात ट्रेकर्स व बचाव पथकाला यश आले होते. धुके आणि जोराचा पाऊस यामुळे दरीतून मृतदेह काढण्यात अडचणी येत होत्या. मृतदेह ॲम्बुलन्सच्या साहाय्याने पोलादपूर व दापोलीकडे नेण्यात आले. मृतदेह काढण्याचे काम दिवसभर सुरू होते; पण काही मृतदेह दरीत अडकले असून काही बसखाली आहेत. बस सुमारे आठशे मीटरवर खोल दरीत अडकली आहे. बसखाली अडकलेल्या मृतदेहांना काढण्यासाठी मोठी क्रेन तसेच गिर्यारोहकांना बोलविण्यात आले आहे; परंतु सातत्याने पडणारा पाऊस आणि धुक्‍यामुळे मदत कार्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रशासकीय अधिकारी व पोलिस घटनास्थळी थांबून आहेत. सर्व मृतदेह पोलादपूर, दापोली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. तसेच नातेवाइकांनाही रुग्णालयातच थांबविण्यात आले आहे.  मृतांमध्ये संतोष झगडे, सचिन झगडे, राजीव झगडे, राजाराम गावडे, पंकज कदम, सचिन गिम्हवणेकर, रितेश जाधव, हेमंत सुर्वे, अजय सांवत, रोशन तबीब, किशोर चौगुले, विक्रांत शिंदे, रविकिरण साळवी, सुनील साठले, संतोष जळगावकर, राजू बडवे, जयंत चौगुले, संदीप भोसले, प्रमोद शिगवण, संदीप सुर्वे, प्रमोद जाधव, रत्नाकर पागडे, राजीव रिसवूड, प्रशांत भांबेड (चालक), संदीप झगडे, सुयश बाळ, नीलेश तांबे, सुनील कदम (सर्व राहणार चिपळूण) यांचा समावेश आहे, तर प्रकाश सावंत (देसाई) हे जखमी आहेत. या सहलीसाठी संजय सावंत हे ताप असल्याने गेले नसल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात आले.    मदतीसाठी आलेले ट्रेकर्स...  महाबळेश्‍वर ट्रेकर्स, सह्याद्री टेकर्स, यंग ब्लड ॲडव्हेंचर्स, कर्तव्य प्रतिष्ठान, महाडचे सह्याद्री मित्र, सिसकेप, कोकण कडा, खेड आणि दापोलीतील ट्रेकर्स आलेले आहेत. तसेच एनडीआरएफची टीम ही तहसीलदारांनी बोलावली आहे. ती रात्री उशिरापर्यंत पोचून मदतकार्य करणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com