राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त

राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त
राज्यातील ३४ हजार गावे हागणदारीमुक्त

मुंबई : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षांत पाच कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षात ५० लाख ८ हजार ६०१ शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे, तर राज्यातील १६ जिल्हे व ३४ हजार गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने देशाच्या ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या कामाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार २०१५-१६ या वर्षात ६०५३ गावे राज्यात हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आली होती. ही संख्या २०१६-१७ मध्ये २१ हजार ७०२ इतकी झाली. आजअखेर महाराष्ट्रातील ३४ हजार १५७ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. राज्यातील गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, जालना, बीड, नगर, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, पालघर व रायगड हे जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांत उल्लेखनीय कार्य ग्रामीण महाराष्ट्रात घरगुती शौचालय निर्मितीमध्ये उल्लेखनीय काम झाले आहे. राज्यातल्या ३० जिल्ह्यांतील ग्रामीण भागात १०० टक्के शौचालय उभारणी झाली आहे. नंदुरबार, जळगाव, वाशीम, यवतमाळ, बुलडाणा व गडचिरोली या सहा जिल्ह्यांत घरगुती शौचालय उभारणीचे काम ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाले आहे. लवकरच या जिल्ह्यांतील घरगुती शौचालय उभारणीचे काम पूर्ण होणार आहे.

महाराष्ट्राचा स्वच्छता आलेख गेल्या तीन वर्षांत महाराष्ट्रात ५० लाख ८ हजार ६०१ घरगुती शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१४- १५ या वर्षात राज्यात ४ लाख ३१ हजार ३४ शौचालये बांधण्यात आली. २०१५-१६ या वर्षात ८ लाख ८२ हजार ८८, सन २०१६-१७ या वर्षात १९ लाख १७ हजार १९१ तर २०१७-१८ या वर्षात १७ लाख ७८ हजार २८८ शौचालये बांधण्यात आली आहेत. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातील १४.९४ टक्के गावे हागणदारीमुक्त होती. आता ८४.३० टक्के गावे हागणदारीमुक्त झाली आहेत.

   देशात तीन लाख गावे हागणदारीमुक्त   २ ऑक्टोबर २०१४ रोजी देशातल्या ग्रामीण भागात ३८.७० टक्के घरगुती शौचालये होती, १४ जानेवारी २०१८ अखेर ही टक्केवारी ७६.२६ टक्क्यांवर पोचली आहे. आजअखेर देशात ५ कोटी ९४ लाख ४५ हजार शौचालयांची निर्मिती झाली आहे, तर देशातील ३ लाख ९ हजार १६१ गावे हागणदारीमुक्त झाली आहेत. देशातील ३०३ जिल्हे हागणदारीमुक्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com