फवारणीतून विषबाधा, बोंडअळीवर ४० आमदारांची ‘लक्ष्यवेधी’

बोंडअळी
बोंडअळी

यवतमाळ: फवारणीतून झालेल्या विषबाधेमुळे जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता बोंडअळीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव दिसून येत आहे. हे दोन प्रश्‍न राज्यभरात गाजत आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याच प्रश्‍नांवर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत असून, राज्यातील तब्बल ४० आमदारांनी कृषी विभागाकडे माहिती मागितली आहे. जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाशी दोन हात करीत असतानाच आता नवे संकट शेतकऱ्यांसमोर आले आहे. कपाशीवर फवारणी करीत असताना फवारणीतून विषबाधा झाल्याने जिल्ह्यातील २२ शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाला. ८०० पेक्षा जास्त जणांना बाधा झाली. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात फवारणीचे दुष्परिणाम समोर आले. हे संकट कमी होत नाही, तोच कपाशीवर बोंडअळीचे संकट आल्याचे समोर आले. या संकटाने शेतकऱ्यांचे कबंरडेच मोडले. एकरच्या -एकर कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाल्याने हातात आलेले पीक निघून गेले. जिल्ह्यातील या दोन्ही समस्या देशपातळीवर चर्चेचा विषय ठरल्या. त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांपासून तर सत्ताधारी पक्षातील नेत्यांपर्यंत सर्वांनीच जिल्ह्याचा दौरा केला. मात्र, या दौऱ्यातून म्हणावे तसे शेतकरी, शेतमजुरांच्या हाती काहीच आलेले नाही.   याच प्रश्‍नावर आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकरी प्रश्‍नावर ‘राष्ट्रवादी’ने हल्लाबोल केला आहे, तर कॉंग्रेसही ‘जनआक्रोश’च्या माध्यमातून सभागृहाबाहेर लढा देत आहे. सभागृहात याच प्रश्‍नावर सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याची तयारी सुरू आहे. फवारणीतून विषबाधा तसेच बोंडअळीच्या प्रश्‍नावर राज्यातील तब्बल ४० आमदारांनी प्रश्‍न उपस्थित केला आहे. तसे पत्र जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडकले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत शिवसेना आमदारांनी या मुद्याला हात घातल्याने विधिमंडळात फवारणी, बोंडअळीचे पडसाद उमटण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ‘कृषी’चा ताप वाढला फवारणी प्रकरण तसेच आता बोंडअळीने कृषी विभागाचा ताप वाढला आहे. अशातच आता ‘लक्ष्यवेधी’ व ‘तारांकित’ प्रश्‍नाच्या पत्रामुळे अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. ४० आमदारांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना अधिकाऱ्यांची दमछाक होत असल्याची चर्चा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com